- कथा; रमेश तांबे
माझे आठवी ते दहावीचे शिक्षण एका कडक शिस्तीच्या शाळेत पार पडले. महानगरपालिकेच्या शाळेतून एकदम उच्चभ्रू अशा शाळेत मी प्रवेश घेतला खरा, पण तिथे मी अगदीच बुजून गेलो. शाळेची ती भव्य इमारत, तिथला शिक्षकवर्ग, तिथले विद्यार्थी, त्यांचं बोलणं-वागणं हे सर्वार्थाने माझ्यासाठी नवीनच होतं. अशा या एकदम वेगळ्या वातावरणात माझं पुढचं शिक्षण सुरू झालं. भले मला परीक्षेत सर्वसाधारण गुण मिळत होते, पण काही गोष्टींचा संस्कार माझ्यावर नकळत होत होता. शिक्षण हे केवळ पुस्तकातूनच होत असते, त्यापेक्षाही एखादी घटना आपल्याला जास्त आणि कायमस्वरूपी शिकून जाते असे मला वाटते. आयुष्यभरासाठी त्या घटनेचा, शिकवणीचा ठसा आपल्यावर उमटून जातो हेही लक्षात आले.
त्याचं असं झालं. आठवीत असताना घाटे नावाच्या बाई आम्हाला हिंदी शिकवायला होत्या. तसा हिंदी काही माझा आवडता विषय नव्हता किंवा पुढच्या आयुष्यातदेखील मी कधीही हिंदी या विषयाचा विशेष अभ्यास केला नाही. पण हिंदीच्या तासाला घडलेली घटना मला आयुष्यभरासाठी कशी एक शिकवण देऊन गेली, याचीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे.
आमच्या हिंदी शिकवणाऱ्या घाटेबाईंची एक सवय होती. धडा, कविता शिकवून झाल्यानंतर त्या हिंदीचं वाचन घ्यायच्या. तेही अगदी मोठ्याने. शिवाय भरवर्गात प्रत्येकाने मोठ्याने वाचायचं. पण त्यांचा एक नियम ठरलेला होता. तो म्हणजे वाचताना उच्चार चुकला की खाली बसायचं. सुप्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांच्या एका धड्याचं वाचन वर्गात सुरू झाले होते. पहिला विद्यार्थी एका वाक्यात चुकला अन् मग खाली बसला. वाचताना विद्यार्थ्यांची चूक काय झाली याविषयी घाटेबाई साऱ्या वर्गाला सांगत, तेही अगदी प्रेमाने!
मी त्यावेळी पाचव्या रांगेत, तुलनेने मागेच बसत असे. वर्गात वाचन सुरू होते. कोण एका शब्दात, तर कोण एक वाक्य वाचून खाली बसत होते, तर कुणाची मजल पंधरा शब्द वाचण्यापर्यंत पोहोचत होती. मी मनातल्या मनात धडा वाचू लागलो. कमीतकमी तीन वाक्ये तरी वाचणारच असा ठाम निश्चय मी मनातल्या मनात केला. पुढच्या पाचच मिनिटात माझ्या शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रमांक आला. त्या बहाद्दराने तब्बल तीन वाक्ये धडधड वाचून दाखवली. नंतर चुकला म्हणून खाली बसला. आता माझी जबाबदारी वाढली होती.
मग माझाच क्रमांक आला. मी उभा राहिलो. हातात पुस्तक घेतलं आणि आत्मविश्वासाने वाचायला सुरुवात केली. पण काय घडलं कुणास ठाऊक? दुसऱ्या शब्दालाच बाईंनी मला खाली बसवलं आणि म्हणाल्या, “लिहिताना “बहुत” असे लिहायचं आणि वाचताना “बहोत” असं वाचायचं.” माझा चेहरा साफ पडला. किमान तीन वाक्य न चुकता वाचायची असा निश्चय करणारा मी केवळ एकच शब्द नीट वाचू शकलो. याचे मला कमालीचे वाईट वाटले. वर्ग संपला, दिवस संपला पण खरी गंमत पुढेच आली. हा वर्गात घडलेला “बहुत-बहोत”चा प्रसंग माझ्या मनावर कायमचा करला गेला, कधीही न पुसला जाण्यासाठी! आज शाळा सोडून पन्नास वर्षे झाली पण “बहोत” शब्द कानाशी गुंजतो आहे. आज कुणी हिंदी भाषिकसुद्धा बोलताना “बहुत” म्हणाला, तर मी मोठ्या अभ्यासकाच्या थाटात “बहुत” नाही “बहोत” म्हणायचं असं म्हणून त्याची चूक दुरुस्त करतो. अशावेळी समोरचा हिंदी भाषिकसुद्धा माझ्या हिंदी भाषेच्या ज्ञानावर खूश होऊन जातो.
व्याकरणाची कितीही पुस्तकं मी घोकून घोकून पाठ केली असती तरी माझं असं शिक्षण झालं नसतं. पण हा केवळ एक वाचन प्रसंग वर्गात घडला, अगदी साधासा, पण त्यातून मिळालेलं शिक्षण मला आयुष्यभर पुरलं. म्हणून म्हणतात, “अनुभवातून जे शिक्षण मिळतं तेच खरं शिक्षण...!






