Wednesday, May 6, 2026

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार

अंधारल्या दिशांना दु:खाची सल सलीला घायाळ जखमांचे भय भयाला भयावह अनामिक चिंता चिंतेच्या जोडीला चितेची वाट वाटेशी दटावत वृत्तींचा घाट घाटावर ऐकवत नाही चित्कार देहाला सोसवत नाही वार अंगाखांद्यावर स्पर्शाचा भार ऐ माय मी मरते वारंवार.

लहान-मोठ्या मुली ते विधवा, परित्यक्ता, वयोवृद्ध महिलांवर वैमनस्यातून होणारे अन्याय, अत्याचार, घरंदाज विवाहितांचे संशयास्पद मृत्यू, आत्महत्या प्रकरण म्हणजे समस्त स्त्री वर्गाची शारीरिक, मानसिक चाळण करण्याचे दरमहा वाढीस लागलेले प्रकार. या छिन्नविछिन्न करणाऱ्या मरणासन्न अवस्थेतून जाणं यासारखी क्लेषकारक घटना नाही. आजची उद्विग्न परिस्थिती ही याचं उत्तम द्योतक आहे. ढासळलेली व्यवस्था, बंदिस्त चौकट, राजकारणातले कैक डावपेच, न्यायप्रतीक्षेच्या विलंबित सहयोगामुळे विदारक स्थिती निर्माण झाली आहे, जी स्त्री-पुरुष समानता निवाड्याच्या संदर्भात उलटी खेळी खेळते. आचार-विचारांच्या सदाचारी मूल्यांना पायदळी तुडवण्याचे प्रकार वारंवार घडतात. जेव्हा यंत्रणा चौकटी बाहेरचा न्याय देऊ शकत नाही, तेव्हा समाजाभिमुख मानसिक संतुलनाचा विषय मुख्य ठरतो. आजच्या घडीला मानसिक स्वास्थ्याकडे गांभीर्याने पाहण्याची, तिची मशागत करण्याची गरज आहे.

एकविसाव्या शतकात आपण स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे गातो. ते गाताना आपण थकत नाही. स्त्री म्हणजे माता, भगिनी ते देवस्वरूप भवानी आई. नारायणी रूपात आपण तिची पूजा बांधतो. कवन रचतो, गुणगान गातो. पण एका मोहाच्या क्षणी अमानवी अजगरी पाशात तिला अडकवलं जातं. वाममार्गे गुंगीच्या औषधांचा उतारा दिला जातो. राक्षसी वृत्तीचे व्रण शरीरभर उमटताना गुप्तांगावर वार करत अश्लील व्हिडीओ समाजमाध्यमात पसरवण्याची धमकी दिली जाते. शेवटी बलात्कार करून, खून करून तिची विल्हेवाट लावली जाते. ओळख मिटवली जाते. हा बदल एका दिवसातला नसतो, तर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं तेव्हा तो जाणवू लागतो. शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या विटंबना भयंकर कृत्याच्या मालिका षंढ समाजात रुजत आहेत. समाजात जेव्हा काही वेगळं घडतं तेव्हा त्याची सुरुवात चार भिंतीतल्या कुटुंबाच्या आत होत असते. लैंगिक शोषण असो वा अनैतिकता, व्यभिचार वा विवाहबाह्य संबंध असो नराधमाला पाठीशी घालणारी घरची देखील यात सामील असू शकतात. यास्तव बाईकडे पाहण्याचा दृष्टिकोनहीन आणि समस्त स्त्रीवर्गाला अधाशी वासनांध नजरेतून पाहण्याची जणू मुभा प्राप्त झाली असावी असा झाला आहे. संशय निर्माण करणाऱ्या नात्यातली तेढ वाढत जाऊन अनैतिक संबंध, पुनर्विवाह, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी त्रिकोण, कुणाचा पायपोस कुणाला नसल्याने कुणीही यावे टपली मारून जावे, बघू नये, बोलू नये, गुपचूप बसावे अशा प्रकारच्या कर्मकांडाला आपणचं खतपाणी घालत आहोत.

कुस्करली कोवळी काया दाह भरले भेदरले अंग देहाचे भग्न अवशेष मुग्धकलिका छिन्नविछिन्न दल नाजूक भावकळ्यांचे पाऊले चिमुकली सानुली कळी खुलण्याआधी परतली न मागे फिरली, परतली न मागे फिरली.

नसरापूर घटनेतील छोट्या चिमुकलीवर शब्दांत भावना व्यक्त करणं कठीण आहे. जो अत्याचार झाला त्याची जखम खोलवर आहे. आतून काही तुटल्यासारखं होताना वेदनेचा आवाज गपगार झाला आहे. आज पाशवी अत्याचार करणारे विकृत नराधम आणि उर्वरित व्यवस्था बाईचा आवाज दडपून टाकतील, पण उद्या हाच आवाज प्रतिरोधाच्या आगीत तुम्हाला भस्म करेल. आजची स्त्री सुरक्षित आहे का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. सर्वांच्या नजरा त्याकडे लागून राहिल्या आहेत. माणूस माणसापासून दूर जात आहे. सहनशक्तीचा कडेलोट होतोय. प्रश्नमंजूषा पेटून उठली आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? मानसिक विकृती की भाग्यशाली संस्कृती याची जाणीवपूर्वक विचार करून उत्तरं देण्याची वेळ आली आहे. फाशी देऊन, बंदुकीच्या गोळ्या घालून, रस्त्यात जमावाकडे सुपूर्द करून, कडेलोट, जन्मठेप देऊन नराधम माणूस मरेल, पण शिक्षा इतकी भयंकर हवी की ही नालायक ‘वृत्तीचं’ मरायला हवी. माजलेल्या भेकड वाकडतोंड्या नराधमाला आलेली हिम्मत मारायला हवी. याला फाशी देणं म्हणजे याची क्षणात सुटका करणे, असे न करता याच्याच मार्गांवर असणाऱ्यांना हादरवून सोडणारा भयंकर मृत्यू याला द्यायला हवा. अखेर मृत्यू म्हणजे सुटका वाटायला हवी.

मर्यादा ओलांडणाऱ्या महिन्याभरातल्या घटना पाहता हे जग आपल्यासाठी नाही याची खात्री पटत चालली आहे. मानवी मनातली गुंतागुंत पाहता माणसं विरुद्ध वाढत चाललेल्या विकार विकृतीची नशा जोर धरू लागली आहे. अशा क्रूर निर्दयी मानसिकतेला बदलणं अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण जगात माणूसपण संपत चाललंय तसा चांगुलपणा पानावरील मिठासारखा केवळ नावालाचं उरलाय. पुढच्या काळात बाईच्या जातीला काय काय वाढून ठेवलं असेल सांगता यायचं नाही. स्पर्श न कळण्याइतपत ती बधिर नाही पण अव्यक्त जळजळीत नजरेचा स्पर्श किती खोल रुततो हे तीच तिचं जाणो. लहानपणापासूनच्या अनेक स्पर्शात वासना, कित्येक चाळे कशावरून तिने अनुभवले नसतील? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जागोजागी अंगाखांद्यावर रुळलेले, रस्तोरस्ती, घरादारांत, शाळा, कॉलेजमध्ये अनामिक चाटून गेलेल्या कितीतरी स्पर्शांची कथा विचार करायला लावणारी आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःच्या आणि मुलीच्या सुरक्षिततेची उपाययोजना हवी. काळ सोकावला असता मुलींच्या जन्मामागे पुरुष वर्ग विचाराधीन होईल. काळजी करेल. आई-बापाच्या पोटी कन्या युक्त भीतीच्या भिंती उभ्या राहतील. हीच भीती मनात घेऊन मुली जन्म घेतील. बाप आणि आजोबा सोडला तर कुठेही कुणाबरोबर जाण्याची भीती कन्या बाळगतील. न्यायप्रवीष्ट व्यक्त होण्याचे सारे मार्ग बंद होतील. एव्हाना व्यक्ततेत बदल झाला असता, तर सगळं चित्र पालटलं असतं. पण असं होत नाही, उलट आवाज दडपवण्याच्या प्रयत्नात नराधम रातोरात सुटल्याचे आपण पाहतोय. त्यांचाच जय होतोय. अशा घटनेतून पृथ्वीचा विनाश काळ जवळ येण्याचे संकेत खऱ्या अर्थाने मिळू लागले आहेत. खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार, बलात्कार, अब्रूचे धिंडवडे, व्यभिचार, भ्रष्टाचार या साऱ्यांनी डोकं वर काढलं आहे. अत्र तत्र सर्वत्र अराजकतेचं राज्य पसरलंय. मोर्चे, आंदोलन, नैसर्गिक हानी, जाळपोळ, आगीच्या घटना या सगळ्या हानिकारक गोष्टी मानवाला, चराचराला संपुष्टात आणतील. मरण दाराशी येऊन थांबलंय तसे आपण डोक्यावर जास्तीचा भार घेऊन जगतोय. यामध्ये ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चा परिणाम भयंकर असेल. यात आपल्या कित्येक पिढ्या जळून खाक होतील. तेव्हा आता खरी गरज आहे शांततेची, मग्नतेची, स्वत:मध्ये डोकावण्याची. जग बदलायच्या प्रयत्नात आपण बिघडत चाललो आहोत. सुधारणा करून चांगलं वागण्याचा प्रयत्न तरी करून पाहूया. आत असलेला काळाकुट्ट अंधार नाहीसा करू या. मनातल्या जळमटीला तिलांजली वाहू या. अति रागलोभाचे निरसन करू या. हिंसक विचार प्रयत्नपूर्वक सोडू या. स्वतःपासून केलेली सुरुवात हीच खरी सुरुवात असेल. नांदी असेल. जोवर पृथ्वी आहे तोवर जग आहे. जगावेगळी सृष्टी स्थावर आहे. तेव्हा हे सुंदर जग सानुल्या चिमुकल्या जीवांसाठी विश्वासार्ह जगण्यालायक आणि आनंदी राहण्यायोग्य बनवण्याच्या प्रयत्नात माणूस म्हणून जगताना या साऱ्या गोष्टींचं भान ठेवू या.

Comments
Add Comment