Saturday, May 23, 2026

प्रबळ महत्वाकांक्षी बना

प्रबळ महत्वाकांक्षी बना

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर

मनुष्याच्या जीवनात प्रगती, यश आणि समाधान मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. महत्त्वाकांक्षा म्हणजे आयुष्यात काहीतरी मोठे, चांगले आणि अर्थपूर्ण करण्याची इच्छा. ज्याच्या मनात मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द असते, तीच व्यक्ती आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचते. म्हणूनच प्रत्येकाने प्रबळ महत्त्वाकांक्षी बनणे गरजेचे आहे.

प्रबळ महत्त्वाकांक्षा म्हणजे फक्त मोठी स्वप्ने पाहणे नव्हे, तर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेणे होय. अनेक लोक स्वप्ने पाहतात; परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिकाटी, संयम आणि कठोर परिश्रम यांची जोड आवश्यक असते. महत्त्वाकांक्षा जर योग्य दिशेने असेल, तर ती माणसाला उंच भरारी घेण्यास मदत करते.

विद्यार्थ्यांच्या जीवनात तर महत्त्वाकांक्षेला विशेष महत्त्व आहे. “मला डॉक्टर व्हायचे आहे”, “मला शिक्षक बनायचे आहे”, “मला अधिकारी व्हायचे आहे” – ही फक्त इच्छा नसून ती महत्त्वाकांक्षा आहे; परंतु केवळ बोलून उपयोग नाही; त्यासाठी अभ्यास, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. आपल्या इतिहासात आणि समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी प्रबळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर यश मिळवले.

उदाहरणार्थ, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन पाहिले तर ते लहानपणी अतिशय साध्या परिस्थितीत वाढले. वर्तमानपत्रे विकण्याचे काम करत असतानाही त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली. त्यांच्या मनात देशासाठी काहीतरी मोठे करण्याची महत्त्वाकांक्षा होती. कठोर परिश्रम, शिक्षण आणि चिकाटी यांच्या जोरावर ते देशाचे महान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती बनले. त्यांच्या यशामागे प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि अथक प्रयत्न होते.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे स्वराज्य स्थापनेची महान महत्त्वाकांक्षा होती. अनेक संकटे आणि अडचणी असूनही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. त्यांची जिद्द आणि दृढ निश्चय आजही प्रेरणादायी आहे.महत्त्वाकांक्षा ही सकारात्मक असावी. दुसऱ्यांना मागे टाकण्यापेक्षा स्वतःची प्रगती करण्याची भावना महत्त्वाची आहे. चुकीच्या मार्गाने मिळालेले यश टिकत नाही; परंतु प्रामाणिक प्रयत्नातून मिळालेले यश कायम आनंद देणारे असते.

शेवटी, प्रत्येकाने स्वतःसाठी मोठी स्वप्ने पाहावीत, ध्येय निश्चित करावे आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत. कारण प्रबळ महत्त्वाकांक्षा ही यशाची पहिली पायरी आहे. “मोठी स्वप्ने पाहा, त्यासाठी मेहनत करा आणि स्वतःचे भविष्य उज्ज्वल बनवा.” शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा साक्षेप। शिवरायांचा आठवावा प्रताप। भूमंडळी।। एका कवींने म्हटले आहे – “थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहा जरा. आपण त्यांच्यासमान व्हावे हाची सापडे बोध खरा.” आपण आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. त्या ध्येयाला अनुकूल असे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर आदर्श म्हणून ठेवले पाहिजे. समर्थ रामदासांनी असा एक गुणपुरुष आपणा सर्वांच्या समोर आदर्श म्हणून ठेवला आहे. तो महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी छत्तीस वर्षे अखंड प्रयत्न केले. या त्यांच्या प्रयत्नांना समर्थ साक्षेप असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे साहस, पराक्रम, गुणग्राहकता, माणसांची पारख, विनम्रता, धर्मनिष्ठा हे सद्गुण सतत आठवून आपण आत्मसात करायला हवेत.

मूठभर मावळ्यांच्या मदतीने शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचा उद्योग सुरू केला. सुमारे पस्तीस हजार फौज आणि प्रचंड दारूगोळा घेऊन आलेल्या अफजलखानाची अवघ्या दहा हजार सैन्याच्या मदतीने शिवाजी महाराज लढले व त्यांनी खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खुद्द अफजलखान मारला गेला. लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राहत्या घरात शाईस्तेखान उतरला होता. लाल महालातील पवित्र वास्तूत त्याने नाचगाणी आणि तमाशे यांचा थैमान चालवला होता. अशा वेळी महाराज फक्त चारशे स्वारांनिशी लाल महालात शिरले व शाईस्तेखानाची बोटे कापून पसार झाले.

त्यावेळी लाल महालाच्या भोवती शाईस्तेखानाची एक लाख तीस हजार फौज होती. पण सर्वांच्या हातावर तुरी देऊन महाराज सिंहगडावर पळून गेले. उजव्या हाताची बोटे तुटल्यामुळे जेवायला बसताना खानाला रोज शिवाजी महाराजांची आठवण होत असे.

औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैद केले तेव्हा दोन हजार माणसांचा पहारा त्यांच्याभोवती ठेवला होता. पण ज्याप्रमाणे तुरुंगात जन्मलेले श्रीकृष्ण तुरुंगातून जन्मत:च पसार झाले त्याप्रमाणे मोठ्या युक्तीने महाराज आग्र्याहून निसटले व राजगडावर सुखरूप पोहोचले. मुलगा परत आल्याचे पाहून जिजाबाईंना अतिशय आनंद झाला.

शिवाजी महाराजांनी तहाच्या वेळी औरंगजेबाला दिलेले तेवीस किल्ले पुन्हा जिंकून घेतले. आपल्या मनात विजयी होण्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. त्यासाठी शिवचरित्राचे स्मरण हवे.

Comments
Add Comment