Saturday, May 23, 2026

आनंद देऊ या आणि घेऊ या!

आनंद देऊ या आणि घेऊ या!

प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ

लहानपणापासून एका कर्मठ कुटुंबामध्ये मी वाढले. माझे लग्न झाल्यावर माझे मिस्टर मला त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर घाटकोपर येथील ‘पोलीस परेड ग्राउंड’ या एका भव्य मैदानावर गरबा पाहायला घेऊन गेले. खरंतर गरबासाठी ज्या प्रकारचे कपडे घालायला पाहिजे, तसे कपडे मी घातलेले नव्हते. मैदानात हळूहळू ऑर्केस्ट्रा चालू झाला. त्याच्या तालावर छोटे छोटे ग्रुप तयार झाले आणि ते गोल गोल फिरत नाचू लागले. प्रत्येक ग्रुप आपापल्या पद्धतीने सरळ, गोल, उलटे सुलटे फिरत होते. आपण हिंदीत म्हणतो ना, ‘माहौल बनता गया!’ तसा एक वेगळाच माहोल तिथे तयार झाला. गरब्याचा रंग चढेल अशी सुंदर गाणी वाजत होती. त्याचा आवाज वाढत होता. सभोवती सुंदर रंगीत दिवे लावलेले होते. त्यांचा उघडझाप होणारा आणि रंग बदलणारा प्रकाश खूप आकर्षक होता. आम्ही थोडा वेळ मैदानाच्या कोपऱ्यात उभे राहून हे सर्व दृश्य पाहत होतो. हळूहळू एकमेकांना खेचून सगळ्यांनी गोल केला आणि नाचायला सुरुवात केली. आमच्याकडे टिपऱ्याही नव्हत्या. मी ‘नाही नाही...’ म्हणत बाहेरच उभी राहिले. पाय थिरकत नव्हते पण मन थिरकायला लागले होते. लहानपणापासून ‘नाच’ म्हणजे थिल्लर, असे सातत्याने मनावर बिंबवलेले होते. म्हणजे सोसायटीमध्ये गणपतीच्या पुढे किंवा कोणाच्या लग्नात आमच्या मैत्रिणी नाचायच्या तेव्हा ते नाचणे, आईला आवडायचे नाही आणि मग तेच कुठेतरी मनामध्ये दडून बसले की नाचणे म्हणजे थिल्लर असते. नाचताना होणारे अंगविक्षेप यातूनही वेगवेगळे अर्थ मन काढत राहिले. खरे सांगायचे तर चुकीचेच अर्थ! इतक्यात हा सहज म्हणाला, “असं दुरून नाचणं पाहणं यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन नाचणं फार वेगळं असतं... येतेस का नाचायला?”

“अरे, नाचणं मला अजिबातच येत नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी असं या वयात नाचणं?” मी थोडं का कू करत होते. तो म्हणाला, “तू तेवीसाव्या वर्षी अशा गोष्टी करत आहेस. इथे तर समोर ऐंशीच्या वयाच्या स्त्रियासुद्धा किती आनंदाने नाचत आहेत, पाहा.”

इतक्यात आमची मैत्रीण दोघांचे दोन हात धरून आम्हाला त्या गोलात घेऊन गेली. उजवी -डावीकडे पाहून मी पाय उचलायला सुरुवात केली. हाताने काय फक्त टाळ्या वाजवायच्या होत्या. जमू लागले. काही वेळानंतर तर अशी झिंग चढली की म्युझिक थांबले तरी हात-पाय हलतच होते कितीतरी वेळ. नाचताना आम्ही सर्व एकमेकांकडे बघून हसत होतो. माझ्या आयुष्यातले ताणतणाव, डोळ्यांसमोर असलेली सगळी कामे मी अक्षरशः विसरून गेले होते. बेभान होऊन नाचणे-हसणे आणि स्वाभाविक त्यामुळे आनंद होणे, हे आपोआप घडत होते. ‘नाचणे’ ही क्रिया आनंददायी असतेच; परंतु समूहाबरोबर नाचणे, आपल्या माणसांबरोबर नाचणे, असे आनंदाच्या प्रसंगी नाचणे हे खूपच वेगळे होते. त्या प्रसंगाचे वर्णन करणे कठीण आहे. आयुष्यात नाचण्याची ही झिंग त्यानंतर अनेकदा अनुभवली. आम्ही जवळजवळ दहा-पंधरा वर्षे नवरात्रीत कमीत कमी चार ते पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळायला जायचो. गरबामध्ये घालतात तसे विशिष्ट ड्रेस आणि दागिनेही मी खरेदी केले. नवीन वर्ष साजरे करताना नाचायला सुरुवात केली. होय, गणपतीच्या विसर्जनात आणि काही लग्नातसुद्धा निश्चितपणे नाचण्याचा अनुभव घेतला. अजूनही ‘नाचणे’ मनापासून आवडते.

खरं तर खूप नंतर नाचण्याचे फायदे कुठेतरी वाचले. नाचण्यामुळे शरीरात ऊर्जा उत्पन्न होते. स्नायूंना एक वेगळा व्यायाम मिळतो. रक्ताभिसरण सुधारून हृदयविकाराचा धोका कमी होतो. आपल्या कॅलरीज जळून वजन नियंत्रित राहते. हाडांची घनता वाढते त्यामुळे ऑस्टोपेराॅसिससारखे आजार आपल्याला होत नाहीत. शरीराची चपळाई वाढते. शरीर सुडोल होते. चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते. पिंपल्स आदी त्वचाविकार जवळ फिरकत नाहीत. ही यादी कितीही मोठी होऊ शकते. नाचण्याची इतकी आवड निर्माण झाली आहे की, टीव्हीवर कोणते तरी छान गाणे लागले की आपोआप हात-पाय थिरकायला लागतात. असो. या लेखाचा मुद्दा वेगळा आहे. माणसांमध्ये मिसळणे आणि त्यांच्यातलेच एक होऊन जाणे ही गंमत, नाचणे सोडून अनेक संदर्भात आपणही अनुभवली असेल! माणसात मिसळून जाऊन स्वतःचे अस्तित्व त्यांच्याशीच एकरूप करणे, हे महत्त्वाचे आहे पण तसे सगळ्यांना जमतेच असे नाही. काही माणसांना सातत्याने आपण काहीतरी वेगळे आहोत, इतर सगळी माणसे फालतुगिरी करत आहेत, वाटेल त्या गप्पा करत आहेत आणि उगाचच हसत आहेत असेही वाटते. पण तरीही ज्या माणसांसोबत आपण त्यावेळेस तिथे असतो त्यांच्यात मिसळून जाणे फार महत्त्वाचे असते, याचे आणखी एक उदाहरण देते.

आम्ही मित्र-मैत्रिणी वांद्रेच्या एका तरुण मुलांच्या आवडत्या ‘नास्टो’ या हॉटेलमध्ये गेलो होतो. तरुण मुले सहसा हॉटेल शब्द वापरत नाहीत, ते रेस्टॉरंट/ रेस्तराँ वगैरे म्हणतात. तर तिथे एका गोल टेबलाभोवती आम्ही पन्नाशीचे मध्यमवयीन मित्र-मैत्रिणी चहा/कॉफी पिण्यासाठी गेलो होतो. आमच्या एका मित्राने सांगितले की, इथे मिळणारे सर्वात उत्तम पेय म्हणजे ‘कोल्ड ड्रुव’ तर सगळ्यांनी ‘आमच्यासाठी पण तेच मागव’ असे सांगितले. मी मेन्यूकार्डवरून नजर फिरवली तर ती सर्वात महागडी कॉफी होती. मनात आले की काहीतरी नक्कीच वेगळे असणार! कॉफीचे आठ मग समोर आले. दोन-चार कोनातून आम्ही सर्वांनी त्याचे फोटो काढले आणि ‘चिअर्स’ म्हणून ते मग हातात घेतले. मी गप्पांमध्ये रंगले होते आणि पहिला घोट घेतला, तोंड वेडेवाकडे केले. मी सहज सगळ्यांकडे कटाक्ष टाकला तर खूप आनंदाने ते सर्व पीत होते, त्यामुळे मी शांत बसले. मनात म्हटले, पहिला घोट बरा नसेल, दुसरा घोट घेतला. तरी तेच. या क्षणी मात्र माझे तोंड वेडेवाकडे करणे, हे माझ्या मैत्रिणीने बरोबर हेरले. तिने माझ्या मगकडे पाहिले आणि मला म्हणाली, “कडू लागतंय ना? अगं बाई बाजूला जो चमचा दिला आहे तो फिरव, ढवळ व्यवस्थित आणि मग पी.” हे तिने अतिशय हळू आवाजात तसेच कोणालाही ऐकू जाणार नाही अशा तऱ्हेने सांगितले. त्यामुळे माझे अडाणीपण कोणाच्या लक्षात आले नाही. मी व्यवस्थित ढवळले आणि घोट घेतला. काय सांगू? अजूनही ती स्वर्गीय चव तशीच तशी जिभेवर रेंगाळतेय, अगदी आज हा लेख लिहितानाही जाणवतेय. परतून कधी त्या हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला नाही.

तर मला हेच सांगायचे आहे, आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आपल्या आसपास उपलब्ध असतात, सहज शक्य असतात पण आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपण अनेक गोष्टींपासून वंचित राहतो. माझ्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे नाचण्याची आणि दुसरी कॉफीची मूळ चव चाखण्याची!

तर आता आपल्या मिसळणे, ढवळणे याबरोबर यासारखे अनेक शब्द मुळापासून जाणून घेऊ या. त्याला आनंदाशी कसे निगडित करता येईल हे पाहू या. जिथून मिळेल तिथून आनंद घेऊ या आणि देऊ या! pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment