विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील
शिवम आणि त्याची मित्रमंडळी सहलीवर गेले होते. ते भुका लागल्याने दुपारच्या वेळी महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणात डबे खात बसले होते. जेवता जेवता त्यांच्या ज्ञानदायी अशा विज्ञानावरील प्रश्नोत्तरांच्या गप्पाही सुरू होत्या. शिवमने विचारलेल्या प्रश्नावरून त्यांच्या गप्पा पृथ्वीच्या सात खंडांवर येऊन पोहोचल्या होत्या व ते जेवायला बसले होते. “अमेरिका (उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका), आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका (दक्षिण ध्रुव) नि आÐक्टका ओ (उत्तर ध्रुव) हे पृथ्वीचे सात खंड आहेत.” मित्रांनी एकेकाने आळीपाळीने जसे ज्याला सुचले तसे सातही खंडांची नावे सांगितली.
“छान मित्रांनो, मला वाटले की तुम्हाला मी प्रश्न विचारला तर कदाचित कुणाचा गैरसमज होईल किंवा एखाद्याला रागही येईल. पण तसे काही न होता तुम्ही आनंदाने सातही खंडांची नावे सांगितलेली बघून माझाही आता तुम्हाला माहिती सांगण्याचा आनंद वाढला.” शिवम आनंदाने बोलला.
“आम्ही असे ऐकले आहे की, फार प्राचीन काळात हे सारे खंड एकमेकांना जोडलेले होते. हे खरे आहे काय?” सोबतच्या यात्रेकरूनी विचारले.
“होय, काका,” शिवम सांगू लागला,“फार प्राचीन काळी खंड एकमेकांना जोडलेले होते. खंडांच्या भौगोलिक रचनेच्या अभ्यासावरून असे लक्षात येते, की काही खंड हे एकमेकांना जोडलेले होते. दक्षिण अमेरिका व आफ्रिका हे दोन खंड अति प्राचीन काळी एकमेकांना जोडलेले होते. पृथ्वीमधील काही घडामोडींमुळे ते एकमेकांपासून अलग होऊन दूर वाहत गेले. दक्षिण अमेरिका आफ्रिकेपासून तुटून निघाली व दूर गेली. दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा व आफ्रिकेचा पश्चिम किनारा या जुळणीचे उत्तम उदाहरण आहेत. तसेच उत्तर अमेरिका पश्चिम युरोपपासून वेगळी झाली व पश्चिमेकडे तरंगत गेली. ग्रानलँड व नॉर्वे यांचे विभाजन झाले. भारतीय उपखंड आस्ट्रेलिया व आफ्रिका यांच्याशी जोडलेले होते ते त्यांच्यापासून वेगळे होऊन ईशान्येकडील आशिया खंडाशी जुळलेत व त्याचवेळी हिमालय, आल्पस् व अॅटलास यांसारखे पर्वत निर्माण झाले. ह्या विभाजनाच्यावेळी मध्येमध्ये सागर तयार झालेत.”
“बरे मग माती कशी तयार होते?” विपुलने प्रश्न विचारला.
“अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलास मित्रा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमिनीचा बारीक कणांनी बनलेला जो वरचा स्तर असतो त्याला माती म्हणतात. माती ही दगड-खडकांची अतिशय बारीक भुकटी आणि अनेक लहान लहान निरनिराळ्या आकारांच्या आणि निरनिराळ्या रंगांच्या खनिज कणांपासून बनलेली असते.”
शिवम पुढे म्हणाला, “आपली पृथ्वी आधी अतिशय उष्ण वायूचा गोळा होती. आताही ती भूपृष्ठावर जरी थंड व घन झाली आहे तरी तिच्या गर्भात खूप उष्णद्रव आहेच. तर भूगर्भातील ह्या अति उष्णतेने तिचा पृष्ठभागही सदैव खूप उष्ण असतो. ऊन, वारा, पाऊस यांचा या संपूर्ण भूपृष्ठावर सतत मारा होत असतो. उष्णता व थंडावा ह्या एकमेकींच्या विरोधी प्रक्रिया आहेत. त्यामुळे त्या माराने काही उष्ण पण मृदू भूपृष्ठाचे, उष्ण पण नरम खडकांचे चूर्ण होते. त्या चुऱ्यापासून माती बनते. अर्थात माती म्हणजे खडकांचा भुगा असते पण तीत मृत वनस्पती व प्राण्यांचेही चुरा झालेले अंश असतात.”
“ही मातीच मानवासाठी खूप उपयोगी आहे मुलांनो. मी सांगू का कशी तर?” यात्रेकरू म्हणाला.
“सांगा ना काका.” शुभमने यात्रेकरूला आदराने परवानगी दिली.
शुभमने सांगा म्हटल्याने त्या यात्रेकरूला आनंद झाला. तो म्हणाला, “या मातीत अनेक खनिजे, क्षार मिसळलेले असतात. ही माती क्षार झाडांना अन्नरसाच्या स्वरूपात पुरविते. मातीच झाडांना आधार देते. पिकांना जगविते व आपणाला भरपूर अन्नधान्य देते. त्या अन्नधान्यावरच आपण जगतो. अशी माती मानवासाठी खूप उपयोगी आहे.”
“खरे अहे काका ते.”
साऱ्यांनी दिलेला प्रतिसाद बघून त्या यात्रेकरूला खूप आनंद झाला.






