Monday, May 25, 2026

Aatmanirbhar Bharat : कधीकाळी याचकाच्या भूमिकेत असलेल्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

Aatmanirbhar Bharat : कधीकाळी याचकाच्या भूमिकेत असलेल्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

मुंबई : जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पहावयास मिळत आहे. एखाद्या देशाचा अभिमान आणि आत्माभिमान जागृत करून एक मोठे परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते ते गेल्या बारा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या काळात मोदींनी या देशाचा असा भक्कम पाया रचला आहे की यापुढे सातत्याने त्यावरच्या इमारतीवर मजलेच चढत आपण पुढेच जाणार. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली ही प्रगती थक्क करणारी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले. रविंद्र नाट्य मंदिर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. निरंजन डावखरे, राजेश पांडे, आ. संजय कुटे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला मंगळवारी एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेषांकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या १२ वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन बारा वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत गरिबांना घर, शौचालय उपलब्ध करून देणे असा गरीब केंद्रित कारभार झाला. त्यामुळे दहा वर्षांमध्ये भारताने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात कौतुक केले. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे.

यूपीए सरकारची मानसिकता अशी होती की लोकांना अनुदान देऊन त्यांच्यावर अवलंबून ठेवायचे, पण नवीन संधी, विकास आणि पायाभूत सुविधांवर भर द्यायचा नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण वाढला आणि रोजगारनिर्मिती कमी झाली. मोदी सरकारने गुंतवणूक आणि विकासाच्या माध्यमातून संधी निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे अर्थव्यवस्था विस्तारली, सरकारी महसूल वाढला आणि त्यातून गरीब कल्याणाच्या योजना राबवून लोकांना स्वावलंबी करण्याचे काम झाले. आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. हा विकास केवळ घोषणांमुळे नाही, तर ठोस धोरणे आणि विकास कार्यक्रमांमुळे शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळी दिशा कशी देता येईल, जगासमोर भारत देश सर्वश्रेष्ठ म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे करता येऊ शकते ते ते करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरोधात एक जनआंदोलन उभे केले. देशात या काळात पारदर्शक कारभार कसा होईल याची दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्थेकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांच्यामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना जात आहेत. त्यांच्या असंख्य योजना एका पुस्तकात मांडता येणार नाहीत इतक्या त्या व्यापक आहेत. स्वच्छ भारत योजनेपासून एलपीजी लाभार्थ्यांना लाभ सोडून देण्याचे आवाहन करत तो लाभ त्यांनी देशाला मिळवून दिला हे क्रांतिकारी आहे.

Comments
Add Comment