Saturday, May 23, 2026

रेती कशी बनते?

रेती कशी बनते?

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील

सहलीवर गेलेले असताना शिवमला त्याचे मित्र प्रश्न विचारीत होते. “कारे गड्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध ठिकाणच्या जमिनीचा रंग वेगवेगळा का असतो?” कैवल्यने विचारले. “त्याचे असे आहे दोस्ता,” शिवम म्हणाला, “काळी, पांढरट, पिवळी, पिंगट, लालसर, तांबूस असे जमिनीचे वेगवेगळे रंग आढळतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनीत वेगवेगळे रासायनिक घटक व द्रव्ये असतात, त्यांच्यात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया झालेल्या असतात. त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणच्या जमिनीचा रंग हा निरनिराळा असतो. उदा. लोह प्राणिदाच्या जास्त प्रमाणामुळे जमिनीस लाल-तांबडा रंग येतो.” “बरे, रेती कशी बनते रे?” कौशलने प्रश्न केला.

शिवम म्हणाला, “रेती ही खडकांपासून बनते. डोंगरांमध्ये मोठमोठे खडक असतात. ऊन, वारा व पावसामुळे हे खडक झिजतात, फुटतात नि त्यांचे बारीक कण बनतात. ते कण म्हणजचे रेती असते. पाण्यासोबत हे कण नदीत वाहत येतात. नदीतील रेतीमुळे नदीचे पाणी शुद्ध राहते. नदीसोबत वाहत ती रेती समुद्रात जाते.” “म्हणजे असे खडक खूप उपयोगी आहेत तर?” यात्रेकरू म्हणाला.

“हो काका.” शिवम म्हणाला, “खडकांपासून माती व रेती तर बनतेच; परंतु अनेक प्रकारची खनिजेसुद्धा मिळतात.” “खडकांपासून रेती बनते पण ती वेगवेगळ्या रंगांची कशी असते?”अमोलने विचारले.

“डोंगरातील खडक जर काळ्या दगडाचे असतील, तर रेती काळी बनते. डोंगरातील खडक जर चुनखडीचे असतील, तर रेती ही पिवळसर, पांढरट बनते. त्या खडकांमध्ये जर गारगोट्या असल्या तर रेती पांढरी चमकदार बनते. ते खडक जर लालसर-गुलाबी पखाणच्या दगडाचे असले तर रेती ही लालसर गुलाबी बनते. समुद्राकाठच्या वाळूत पांढ­ऱ्या शंखशिंपल्याचा व प्राण्यांच्या कवचांच्या पिवळसर, पांढ­ऱ्या चकचकीत तुकड्यांचा बारीक चुरा मिसळलेला असतो. म्हणून समुद्रकाठची रेती पांढरी चमकदार दिसते.” शिवमने सांगितले.

“पृथ्वीवर समुद्र कसे निर्माण झालेत ते तू सांगावे असे मला वाटते,” विपूल म्हणाला. “मित्रा, त्याआधी नद्या कशा तयार झाल्यात हे सांग.” कौशल म्हणाला. “तू म्हणतो तेही बरोबर आहे. आधी नद्यांबद्दल व नंतर समुद्राबद्दल सांगतो.” शिवमने बोलण्यास सुरुवात केली. “झुळझुळ झिरपणा­ऱ्या किंवा थोडीशी उसळी मारून जमिनीतून वर येणा­ऱ्या पाण्याला झरा म्हणतात. डोंगर-पर्वतावरील भूजलाला जेव्हा बाहेर येण्याला थोडीशी जागा सापडते तेव्हा झ­ऱ्याचा उगम होतो.”

“पण झ­ऱ्यात पाणी कोठून येते?” यात्रेकरूने मध्येच प्रश्न केला. शिवम सांगू लागला, “काका, आपल्या पृथ्वीवर ऋुतू सुरू झाले तेव्हापासूनच पावसाळा सुरू झाला. करोडो वर्षांपासून पावसाचे पाणी हे भूगर्भात जिरते व पाझरत असते. पृथ्वीच्या आतमध्ये अनेक पोकळ्या असतात. त्या पोकळ जागांमध्ये हे पाणी साचते. डोंगरात वा उतारावर वा खालच्या भागात, जेथे कोठे ह्या पोकळ्यांचे मुख उघडे असते किंवा पृथ्वीतील काही उलाढालींमुळे उघडे पडते तेथून ते पाणी बाहेर पाझरू लागते. त्यालाच पाझर वा झरा असे म्हणतात. तसेच डोंगरात पावसाळ्यात खडकांतील साचलेले पाणी पाझरून झरे निर्माण होतात. उतारावरून वाहणा­ऱ्या झ­ऱ्यांपासून छोटे छोटे ओहळ तयार होतात. असे काही ओहळ मिळून ओढा वा नाला बनतो, अनेक ओढे मिळतात नि नद्या बनतात. काही नद्या मिळून पुढे मोठी नदी बनते. ह्या नद्यांचा प्रवाह उताराच्या दिशेने वाहू लागतो. त्यामुळे डोंगरातील कडक मातीची, खडकांची झीज होते. तो खडकांचा बारीक चुरा व माती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागते व त्यामुळे सुद्धा काही नवीन नद्या तयार होतात.”

Comments
Add Comment