दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
कोईम्बतूरमधल्या एका आईला आपल्या लहान मुलीच्या त्वचेची काळजी वाटली. तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तिने स्वतः काही संशोधन करत साबण तयार केला. हा साबण फक्त तिच्या मुलीसाठीच नव्हे, तर तिच्या मुलीसारख्या असंख्य मुलींना एकप्रकारे वरदान ठरला. एका आईच्या चिकाटीतून सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील ब्रँड निर्माण झाला. हा ब्रँड म्हणजे ‘विल्व्ह’. हा ब्रँड निर्माण करणारी ब्रँडेड आई आहे कृतिका कुमारन. केवळ ८,००० ते १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेला त्यांचा ‘विल्व्ह’ हा ब्रँड आज २९ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे.
कृतिकाच्या या प्रवासाची सुरुवात एका आईच्या काळजीतून झाली. तिच्या लहान मुलीला एक्झिमामुळे त्वचेच्या गंभीर समस्या जाणवू लागल्या. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक सेंद्रिय उत्पादनांचा वापर करूनही अपेक्षित परिणाम मिळाला नाही. अखेरीस, कृतिकाने स्वतः नैसर्गिक घटकांचा वापर करून घरच्या घरी साबण तयार करण्याचा निर्णय घेतला. यूट्यूबवरील व्हिडीओंच्या मदतीने तिने साबण बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले. शास्त्रोक्त ज्ञान वाढवण्यासाठी कॉस्मेटोलॉजी विषयाचा दोन महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१७ मध्ये तिने शेळीचे दूध, ऑलिव्ह तेल आणि एरंडेल तेल यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून साबण तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला घरच्या स्वयंपाकघरात सुरू झालेल्या या उपक्रमाने हळूहळू आकार घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरून ऑर्डर येऊ लागल्या. सुरुवातीला प्रामुख्याने कोईम्बतूर आणि तामिळनाडूतील ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत होता.
मागणी वाढताच, कृतिकाने घरामागेच १,००० चौरस फुटांचे उत्पादन युनिट उभारले. यंत्रसामग्रीत सुमारे १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. दोन व्यक्तींच्या छोट्या चमूपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज १०० कर्मचाऱ्यांना रोजगार देणारा उद्योग बनला आहे. ‘विल्व्ह’ या ब्रँडचे नाव भगवान शिवाच्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या बेल वृक्षाच्या पानावरून ठेवण्यात आले आहे. हा ब्रँड त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी ७० हून अधिक उत्पादने तयार करतो. सुरुवातीला मालकी हक्काने सुरू झालेला 'विल्व्ह' हा ब्रँड २०२० मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून नोंदणीकृत झाला. या ब्रँडने पहिल्याच वर्षात १ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि तेव्हापासून त्यात सतत वाढ होत गेली असून, काहीच वर्षांत ही उलाढाल २९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
या उत्पादनांचे चार मुख्य गट आहेत. चेहऱ्याची काळजी घेणारे उत्पादन, केसांची काळजी घेणारे उत्पादन, शरीराची काळजी घेणारे उत्पादन आणि ‘मिल्क रेंज’. यापैकी ‘मिल्क रेंज’ ही कृतिकाची खास ओळख ठरली आहे. शेळीच्या दुधावर आधारित क्रीम, सीरम आणि शॅम्पू यांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज ‘विल्व्ह’ ब्रँडची उत्पादने ही स्वतःच्या वेबसाइटवर, विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर, चेन्नई आणि कोईम्बतूरमधील स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. कृतिकाच्या मते, त्यांच्या एकूण उत्पादन विक्रीपैकी ५०% विक्री वेबसाईटवरून, २०% प्रत्यक्ष स्टोअरमधून, ३०% ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून होते. कृतिकाचा जन्म तामिळनाडूतील गोबिचेट्टीपलायम नावाच्या एका लहानशा गावात झाला. तिचे वडील वकील आहेत आणि आई गृहिणी. तिचं गाव एक शेतीप्रधान गाव आहे. गावातील प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो. कृतिकाच्या घरी शेळ्या आणि गुरं आहेत. अशाच गावात ती लहानाची मोठी झाली. गावातील श्री विद्यालय मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. कोईम्बतूरला तिने कुमारगुरू कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बी. टेक. केले आणि २००७ मध्ये पदवी प्राप्त केली. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर, वयाच्या २१व्या वर्षी तिने तमिळ कुमारनशी लग्न केले आणि ती गृहिणी झाली. तमिळ त्याच्या कुटुंबाच्या सूत निर्मितीवर केंद्रित कापड व्यवसायात गुंतलेला होता. कृतिकाच्या या प्रवासात तमिळने मोठी साथ दिली. तो स्वतः एमबीए पदवीधर आहे. ‘विल्व्ह’चा व्यवसाय वाढू लागल्यानंतर तमिळने देखील या व्यवसायात उडी घेतली. आपल्या पत्नीच्या खांद्याला खांदा लावून तो वित्त आणि व्यवस्थापन सांभाळतो, तर कृतिका उत्पादन विभागाची जबाबदारी सांभाळते.
घराशेजारीच कारखाना असल्यामुळे कृतिकाला आई आणि उद्योजिका या दोन्ही भूमिका सहजपणे निभावता आल्या. छोट्या गावात वाढलेली कृतिका आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अमेरिका, युनायटेड किंगडम आणि सिंगापूरमधून मागणी येत असून, भविष्यात या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची तिची योजना आहे. कृतिका आपल्या व्यवसायातून समाजासाठी योगदान देण्यावर भर देते. तिची कंपनी स्थानिक शेतकरी आणि कारागिरांकडून कच्चा माल घेते. पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वापर करते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यावरही तिच्या कंपनीचा भर आहे. उद्योजिका म्हणून काम करताना कृतिकाने कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखले. कुटुंबाचा आधार आणि स्वतःची जिद्द यामुळेच ती हे साध्य करू शकली. संगीत, भरतनाट्यम आणि व्हायोलिन यांसारख्या कला जोपासणारी कृतिका आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाते. एक आई आपल्या मुलीच्या त्वचेच्या काळजीपोटी यूट्यूब पाहून सेंद्रिय साबण तयार करते. त्या विषयाचा अभ्यास करते. पदविका मिळवते. भविष्यात काही कोटींची उलाढाल करणाऱ्या उद्योगांची निर्मिती करते. हे सारे स्वप्नवत आहे. कृतिका कुमारने हे स्वप्न साकारलंय.






