प्रतिभारंग; प्रतिभा सराफ
एक मुलगी चॉकलेटच्या दुकानात जाते आणि ती त्या दुकानातील चॉकलेट्स विक्रेत्या बाईला चॉकलेट्सच्या खरेदीसाठी दहा रुपयांची नोट देते. चॉकलेट विकणारी बाई तिला म्हणते, “तू चॉकलेटच्या कोणत्याही बरणीत हात घाल आणि तुझ्या हातात येतील तितकी चॉकलेट्स घे.” तिला खूप आनंद होतो. सगळे चॉकलेट्स रंगीबेरंगी आणि आकर्षक असतात. शेवटी सगळ्या चॉकलेट्सची चव गोडच असते ना! ती त्या चॉकलेटवाल्या बाईला म्हणते, “मला माझ्या आवडीची चॉकलेट्स खाऊन कंटाळा आला आहे, तर तुम्ही प्रेमाने जी चॉकलेट्स मला द्याल ती मी घेईन म्हणजे मला वेगळ्या चवीची चॉकलेट्स मिळाल्याचा आनंदही होईल!” आपल्याला निर्णय घेण्यास सांगितल्याचा बाईला आनंद झाला आणि ती म्हणाली, “ठीक आहे.”
ती मुलगी आपली पिशवी पुढे करते. चॉकलेटवाली बाई त्या गोड मुलीकडे बघून गोड हसते आणि एका चॉकलेटच्या बरणीत हात घालून मूठभर चॉकलेट्स तिच्या हातातल्या पिशवीत टाकते. हा प्रसंग पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की ती लहान मुलगी प्रचंड हुशार होती. जर तिने चॉकलेट्सच्या बरणीत हात घालून चॉकलेट्स उचलली असती तर चार किंवा पाच चॉकलेट्स तिच्या हातात आली असती; परंतु त्या बाईचा हात मोठा असल्यामुळे तिच्या मुठीत पंधरा-वीस चॉकलेट्स आली. त्या बाईला आनंद मिळाला; परंतु फार मोठा फायदा या छोट्या मुलीला झाला.
आता तुम्ही ही घटना लक्षात घ्या. आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्या हाताने प्रत्येक गोष्ट घेण्याची गरज नसते. तसे प्रत्येक वेळेस आपल्या विचारानेही चालण्याची गरज नसते. एखाद्या माणसाचा विचार आपल्या विचारांपेक्षा मोठा असेल, तर त्याच्या विचाराने मार्गक्रमणा करून पाहायला काय हरकत आहे? .... मी सी.ए.कडे जाते आणि त्यांना विचारते की माझ्याकडे या महिन्यात एवढी रक्कम जास्त आलेली आहे, तर मी त्याची कुठे गुंतवणूक करू, कारण त्यासंबंधीचे ज्ञान माझ्याकडे नाही. माझ्यापेक्षा त्यांच्याकडे असलेला ज्ञानाचा आणि त्या क्षेत्रातील अनुभवाचा मला नेहमीच फायदा झालेला आहे.
जेव्हा माझी स्वयंपाकीण घरी येते. ती मला विचारते की काय स्वयंपाक करू? मी खूपदा तिला सांगते की, तू तुला आवडतं ते कर आणि मग ती खूप मेहनतीने तिचा आवडीचा पदार्थ बनवते, जो मलाही खूप आवडतो. कारण माझ्या आवडीचे आणि माझ्या चवीचे मी नेहमीच खात असते त्यामुळे तिने तिच्या पद्धतीने बनवलेला एखादा पदार्थ मला जास्त आवडून जातो. मला खाण्याच्या बाबतीत कोणता तरी बदल सहज मिळून जातो. यापलीकडे जाऊन तिला तो पदार्थ बनवताना मिळालेला आनंद आणि मला खाताना मिळालेला आनंद हा निश्चितपणे वेगळा आणि जास्त असतो.
माझ्याकडे रोज सकाळी एक मदतनीस बाई येते. ती जेव्हा माझ्याकडे नोकरीला लागली तेव्हा मी तिला सांगायचे की, आज हे काचेचे कपाट साफ करून घे किंवा आज ही भिंत पुसून घे. तेव्हा ती ते काम करायची; परंतु मी तिला जेव्हा सांगायला सुरुवात केली की हे संपूर्ण घरच तुझे आहे आणि तुझ्या पद्धतीने तुला साफ ठेवायचे आहे, तू मला रोज घेऊन विचारत जाऊ नकोस, काय काम करायचं? मी हे सांगितल्यावर तिला झालेला आनंद मला स्पष्ट दिसला. रोज सकाळी ती घरी आल्यावर कधी पंखे पुसायची, कधी काचेच्या खिडक्या, कधी माळ्यावरचे सामान काढून साफ करून ठेवून द्यायची, तर कधी टॉयलेट-बाथरूम स्वच्छ करायची. एकंदरीत महिनाभरात तिचा हात घरातल्या प्रत्येक वस्तूला, कोपऱ्याला लागायला लागला आणि वर्षभर घर स्वच्छ चकचकीत दिसू लागले. मी सांगून तिने काम करण्यापेक्षा ती जेव्हा स्वतःहून काम करते तेव्हा तिचे घरात बारीक लक्ष असते की कोणती वस्तू खराब झाली आहे? अस्वच्छ झाली आहे? मग त्याप्रमाणे ते स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळ आणि तिच्याकडे असणारा वेळ लक्षात घेऊन ती कमी-जास्त वेळ देऊन घरसफाई करते.
हेच मला वाटतं मुलांच्या बाबतीतही आपण केले तर कदाचित त्याचा चांगला परिणाम होईल! म्हणजे ‘तू आता अभ्यास कर आणि मग खेळायला जा’, असे जेव्हा घरातून सांगितले जाते तेव्हा त्याचे लक्ष खेळाकडे असते आणि अभ्यासात तो मन लावू शकत नाही. तो कसातरी अभ्यास उरकतो आणि मग खेळायला जातो; परंतु जर त्याला सांगितले की तुला आज अभ्यासही पूर्ण करायचा आहे आणि खेळायलाही जायचे आहे, तर तू ठरव आधी काय करायचे आणि नंतर काय करायचे. तो मुलगा थोडासा स्वतःच्या वेळेच्या नियोजनाचाही विचार करतो आणि बरोबर आधी खेळ नंतर अभ्यास किंवा आधी अभ्यास आणि नंतर खेळ, याचा ताळमेळ बसवून स्वावलंबी होतो. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपणच उचलली पाहिजे, असे नाही. एखाद्या संस्थेत, ऑफिसमध्ये आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना, आपल्या मदतीसांना, आपल्या मुलांना आपण त्यांच्यावर लादलेल्या विशिष्ट कामाचा येणारा ताण यापेक्षा आपल्याला येणारा ताण जास्त असतो. म्हणूनच आपण आपली जबाबदारी विभागून दिली, समोरच्यावर विश्वास ठेवला, तर तेही काळजीपूर्वक आणि वेळेवर व्यवस्थित जबाबदारी पार पडतात. आपला विश्वास सार्थ ठरवतात. मग आपण आपला ताण कमी करणार ना? pratibha.saraph@ gmail.com






