Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनAkshaya Naik : ‘सुंदरा’ने चालवला ट्रक

Akshaya Naik : ‘सुंदरा’ने चालवला ट्रक

‘सुंदरा मनामध्ये भरली’या (Akshaya Naik) मालिकेतील कलाकार आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून या मालिकेमध्ये अक्षया आणि समीर यांच्या केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले.

या मालिकेतील कलाकार हे शूटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हीडिओ शेअर करतात. नुकताच अक्षया नाईकने एक व्हीडिओ शेअर केला असून या व्हीडिओमध्ये अक्षया ही ट्रक चालवताना दिसत आहे. अक्षयाने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये लतिका ही भूमिका साकारली आहे.

अक्षयानं शेअर केलेला व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षयानं शेअर केलेल्या व्हीडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अक्षया ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

येतोय ‘एकदम कडक’

पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत हे ‘एकदम कडक’ (Ekdam Kadak) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. विविध विषयांवरील मराठी चित्रपटांची रेलचेल सध्या वाढलेली दिसत आहे. ‘एकदम कडक’ चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते व आता चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ‘प्रेम द्यायचे असते, प्रेम घ्यायचे असते’ पासून ‘प्रेम बीम काय नाय बरं का’ या डायलॉगपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी घातलेला धुडगूस पाहणे रंजक ठरणार आहे. ‘एकदम कडक’ म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींना तरुण कलाकारांचा घोळका तोडीस तोड उत्तर देतोय हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसत आहे.

‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘एकदम कडक’ चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनूने ही गँग रूपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलली आहे, तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप यांचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी सांभाळली आहे, तर गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे.

चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी स्वरबद्ध केली आहेत. हा चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला असून चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. ‘एकदम कडक’ चित्रपटातील ‘मॅडम कडक हाय’ हे गाणे ‘ओ शेठ’ फेम सुप्रसिद्ध गायक उमेश गवळी यांनी त्यांच्या दमदार आवाजात सजवले आहे, तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी गायली असून या चित्रपटाला संगीत स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे.

‘स्मृतिभ्रंशा’चा विषयी जागरूकतेचा प्रयत्न

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच आप्पा गायब झाल्याचा प्रसंग दाखवण्यात आला. आप्पा नेमके गेले कुठे ही चिंता घरच्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही सतावत होती. विमलमुळे आप्पांचा शोध लागला खरा, मात्र आप्पा एकाएकी गायब होण्यामागचे कारण शोधत असतानाच आप्पांच्या आजाराविषयी घरच्यांना माहीत झाले असून आप्पांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभंश झाल्याचे निदान झाले आहे. आप्पांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोलेंसाठी हे एक नवे आव्हान आहे.

मालिकेतल्या या वळणाविषयी सांगताना किशोर महाबोले म्हणाले, ‘मालिकेतला हा प्रसंग साकारताना अभिनेता म्हणून माझा कसं लागतोय. सुरुवातीला या आजाराविषयी किरकोळ वाचनात आले होते. यासोबतच एखादी व्यक्ती हरवल्याच्या बातम्याही कानावर पडल्या होत्या. आप्पांना झालेला हा आजार साकारताना आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टींचा मला उपयोग झाला. मालिकेत खूप आधीपासून आप्पांच्या विस्मरणाचे प्रसंग पेरण्यात आले होते. मात्र आप्पा घरातून गायब झाल्यावर त्यांचा शोध घेतल्यानंतर या आजाराची कुटुंबीयांना तीव्रतेने जाणीव झाली.

औषधोपचारासोबतच कुटुंबाची खंबीर साथ या आजारातून त्यांना बाहेर काढू शकते. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून स्मृतिभंश या आजाराविषयी जागरूकता पसरवण्याचा हा प्रयत्न आहे’. अरुंधतीच्या आजवरच्या प्रवासात आप्पा तिच्यासोबत सावलीप्रमाणे उभे राहिले आहेत. आप्पांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी आता अरुंधतीला कंबर कसावी लागणार आहे. या सर्वात तिचे करिअर आणि तिचे आयुष्य पुन्हा एकदा पणाला लागणार आहे. आजवर अरुंधतीने कुटुंबासाठी नेहमीच त्याग केला आहे. आप्पांना या आजारपणातून अरुंधती कशी बाहेर काढणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

-दीपक परब

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -