Thursday, May 9, 2024

पाणी

कथा: प्रा. देवबा पाटील

सात दिवसांपासून ज्ञानवर्धिनी शाळेतील देशमुख सर आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना “आपल्या पृथ्वीचे वातावरण” हे प्रकरण शिकवत होते. रोजच तास संपल्यामुळे ते प्रकरण अपूर्णच राहत होते. आजचा आठवा दिवस अर्थात आठवा तास होता. त्या दिवशीही सारी मुले डोळ्यांत प्राण आणून सरांची प्रतीक्षा करीत होते. एवढ्यात सर वर्गावर आले नि हजेरी झाल्यावर म्हणाले, “काल आपण हवेविषयीची माहिती समजून घेत होतो ना.”

“हो सर. पण सर हवेतील पाण्याच्या वाफेपासून धुके कसे बनते?” धर्मेंद्रने प्रश्न विचारला. “हवेत पाणी व पाण्याची वाफसुद्धा असते. हवेतील वाफ एकदम थंड झाली, तर पाण्याचे थेंब होण्याऐवजी त्याचे सूक्ष्म कण बनतात. असे सूक्ष्म कण हवेत, तरंगत राहतात. अशा कणांनी वातावरण भरून जाते. त्याचे धुके तयार होते.” सरांनी सांगितले.

“सर पाणी कसे बनते? ते कसे असते?” जितेंद्रने प्रश्न केले. सर म्हणाले, “ऑक्सिजनचा एक व हायड्रोजनचे दोन अणू मिळून पाणी बनते. सुरुवातीला पृथ्वीच्या आत हायड्रोजन व ऑक्सिजनचा संयोग होऊन पाणी निर्माण झाले व ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून वाफेच्या रूपात बाहेर आले. या वाफेपासून ढग बनलेत व त्यातून पुढे पाऊस पडला. हे पाणी पृथ्वीवरील खड्ड्यांत साचले व त्यांचे तळे, सरोवरे व समुद्र बनले. पावसाचे पाणी हे शुद्ध असते. त्यामुळे ते बेचव असते. पाणी हे सर्व सजीवांना अत्यंत आवश्यक असते. त्याच्याअभावी प्राण्यांचा घसा कोरडा होतो व वनस्पती सुकतात.”

“सर, पाण्याची कोणकोणती रूपे असतात?” वृंदाने प्रश्न केला. “ऑक्सिजन व हायड्रोजन या वायूंच्या मिश्रणापासून पाणी बनले आहे. पाणी हे संयुग आहे. ते वायुरूपात वाफेच्या रूपात, द्रवरूपात पाण्याच्या रूपात, तर घनरूपात बर्फाच्या रूपात असते.” सर उत्तरले. “पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे?” मंदाने विचारणा केली. “ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो आणि हायड्रोजन हा स्वत: जळत असतो; परंतु पाणी जळतही नाही आणि ज्वलनाला मदतही करत नाही. पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटकांच्या गुणधर्माहून वेगळे आहेत. पाणी हे आम्ल किंवा अल्कलीही नसून ते उदासीन आहे. तसेच पाण्यालाही रंग, वास व चवही नाही.” सरांनी सांगितले.

“सजीवांना पाण्याची गरज का भासते सर?” प्रियवंदाने विचारले. “फारच छान प्रश्न विचारला बेटा तू.” सर म्हणाले, “सजीवांच्या शरीरातील प्रत्येक पेशीला पाणी आवश्यक असते. शरीरातील रक्तामध्ये, तर साठ टक्के पाणी असते. शरीरातील सर्व इंद्रियांमधून पाणी सतत खेळते राहत असते. शरीरातील प्रत्येक घटकांमध्ये पाण्याचे ठरावीक प्रमाण असते. या सर्व गोष्टींमुळे सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. माणसाला दररोज सहसा तीन लिटर पाणी पिण्याची गरज असते. पाणी पिल्याने रक्त अधिक पातळ न होता उलट शरीरात रक्त व पाण्याचे प्रमाण कायम राहते जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते.”

“पाण्याला चव नाही, मग वेगवेगळ्या भागातील पाण्याची चव वेगवेगळी का लागते?” देवेंद्राने विचारले. सर म्हणाले, “पाण्याला चव ही त्यात विरघळलेल्या वायू व क्षारांमुळे येत असते. पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागातील क्षारांचे प्रमाण हे वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांचे पाण्यात मिसळण्याचे प्रमाणही वेगवेगळे असते. म्हणूनच वेगवेगळ्या भागांतील नद्या, विहिरी, तलाव यांच्या पाण्याची चव वेगवेगळी असते.” “सर, पाणी आपणास पिताना गोडसर कसे वाटते?” नंदा म्हणाली.

“हो, सर आणि काही ठिकाणचे पाणी खारटही कसे लागते?” कुंदाने दुस­ऱ्या पूरक प्रश्नाची पुस्ती जोडली. “पावसाचे पाणी हे शुद्धच असते. पाण्यात अतिशय अल्प प्रमाणात कर्बवायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतो त्यामुळे त्याला थोडीशी गोडसर चव येते. म्हणूनच ते पाणी आपणास प्यावेसे वाटते. पण ते जमिनीवर पडल्यावर मात्र त्यात जमिनीवरचे क्षार मिसळतात नि त्याला त्या क्षारांच्या कमी-जास्त प्रमाणानुसार खारट चव प्राप्त होते.” सरांनी सांगितले.
तास संपला तशी मुलेही चूपचाप नाराज होऊन बसली कारण, त्या सा­ऱ्यांना वैज्ञानिक माहिती जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागून राहली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -