Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेपाणीटंचाईवर विंधन विहिरींची मात्रा...

पाणीटंचाईवर विंधन विहिरींची मात्रा…

२५२ विंधन विहिरींना मंजुरी, ६९ विहिरी खोदून पूर्ण...

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असतात. त्यानुसार दर वर्षी पाणीटंचाई आराखडाही तयार करण्यात येत असतो. यंदाच्या वर्षीदेखील आराखड्यात पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी विंधन विहिरींवर विशेष भर देण्यात आला आहे. दोन टप्प्यात २५२ विंधन विहिरींना जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ६९ विंधन विहिरी खोदण्याची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

ग्रामीण भागातील भविष्यातील पाणीटंचाईची समस्या निवारण्यास मदत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात भातसा, तानसा आणि बारवी अशी मोठी धरणे आहेत. मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणांच्या साठ्यातदेखील वाढ झाली होती. त्यात मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे वाढलेली उष्णताव त्यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे तालुक्यांमधील अनेक गाव-पाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात दर वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने ऑक्टोंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यांपासून ते अगदी जून-जुलैपर्यंत पाणीटंचाईची सोडविण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येत असतो.

त्यानुसार यंदाच्या वर्षी पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात आला असून यामध्ये टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीरींचे खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या निवारण्यासाठी विंधन विहिरींवर विशेष भर देण्यात येत असतो. त्यात यंदाच्या वर्षी पहिल्या टप्प्यात ८८ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली होती.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १६४ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. ६९ विहिरींच्या खोदाईचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यास व पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या टँकरची संख्यादेखील कमी होण्यास मदत होणार आहे. पाणीटंचाई होणार नाही, यासाठी शासन लक्ष ठेवून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -