Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रहिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ: माधव भंडारी

हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ: माधव भंडारी

पनवेल (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे पनवेल येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले आहे.

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुंडगिरीची भाषा केली जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शोधा आणि फोडा, असे आवाहन कार्यकर्त्याना केले गेले. हे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या मूक संमतीनेच मविआ सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला आहे की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही माधव भंडारी यांनी दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून, संयमी राजकारण करणारे पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. सत्ताधारी पुरस्कृत दहशतवादामुळे राज्यात अशांतता माजली असून विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपविण्याचा कुटिल डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -