Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedRajya Sabha Election 2024 : महायुतीकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची...

Rajya Sabha Election 2024 : महायुतीकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे बदलली राज्यसभेची गणितं

राष्ट्रवादीच्या एकाच जागेसाठी १० जण इच्छुक

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीमधील (Mahayuti) नावांवर शिक्कामोर्तब झाले असल्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. मध्यरात्री एक वाजेपर्यंत तब्बल अडीच तास महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या पार्श्वभूमीवर आज महायुतीकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. १५ फेब्रुवारी ही अखेरची तारीख आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा आहेत, या सर्व जागांवर उमेदवारी देण्याचा प्लॅन महायुतीने आखला आहे. त्यासाठी उमेदवार कोणते? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

भाजप राज्यसभेसाठी चार उमेदवार देण्याची तयारी करत आहे. त्याशिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना प्रत्येकी एक एक जागा मिळणार आहे. महाविकास आघाडीला राज्यसभेत एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. आज महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने क्रॉस वोटिंग करण्यासाठी भाजपची खेळी

दरम्यान, मागील निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये सध्या तरी प्रवेश करता येणार नसल्याने क्रॉस वोटिंग करण्यासाठी भाजपने खेळी सुरु केल्याची चर्चा आहे. भाजप प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना काही आमदारांनी समर्थन दिल्याने अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणं आमदारांना शक्य नाही. राज्यसभेच्या एका उमेदवाराला ४०.९ चा कोटा ठरलेला आहे तो काँग्रेस पूर्ण करते. सहावी जागा ही महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. महायुती सहापैकी पाच जागा जिंकत आहे.

अशोक चव्हाणांमुळे बदलली राज्यसभेची गणितं

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे राज्यातील राज्यसभेचं गणित बदललं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे २८८ सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे.

२८४ आमदार राहिल्याने मतांचा कोटा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ४०.५७ इतका आहे. भाजपकडे १०४ आणि अन्य १३ अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या ३ जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ३९ आमदार आणि १० अपक्षांची मतं असल्याने एक जागा निवडून येऊ शकेल. काँग्रेसकडे ४५ आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही. पण अशोक चव्हाण भाजपमध्ये आमदार जास्त घेऊन आल्यास हे गणित मात्र बिघडू शकतं.

राष्ट्रवादीच्या एकाच जागेसाठी १० जण इच्छुक

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून राज्यसभेसाठी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश अदिक, इद्रिस नायकवडी, माजी मंत्री नवाब मलिक तसेच नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या बाबा सिद्दिकी यांच्यासह आणखी ३ जण इच्छूक आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -