Wednesday, June 26, 2024
Homeमहत्वाची बातमीकाँग्रेसची वाटचाल अस्ताकडे…

काँग्रेसची वाटचाल अस्ताकडे…

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची प्रचंड धूळधाण झाली. पंजाबमधील असलेली सत्ता गमवावी लागली. पाच वर्षांपूर्वी गोव्यात नंबर एकवर असलेल्या काँग्रेसवर भाजपने मात केली. मोदींच्या झंझावातात काँग्रेस टिकू शकत नाही हाच अनुभव गेली सात वर्षे येतो आहे. लोकसभेत कधी नव्हे ती काँग्रेस एवढी दुर्बळ झाली आहे की, विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवायलाही काँग्रेस अपयशी ठरली आहे. काँग्रेस पक्ष गांधी परिवाराच्या भोवती गुरफटला गेला असून देशात बदललेले वातावरण काँग्रेस पचवू शकत नाही. देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेश राज्यात काँग्रेसने १९८५ पर्यंत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली. या राज्याने काँग्रेसला पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, असे मोठमोठे पंतप्रधान दिले. पक्षाच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी या सतत व सलग याच राज्यांतून लोकसभेवर निवडून येत आहेत. पण अमेठी व रायबरेली या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसची मक्तेदारी आता संपत चालली आहे, हाच संदेश यावेळच्या निवडणूक निकालाने दिला आहे. उत्तर प्रदेशने काँग्रेसला गेल्या साडेतीन दशकापासून झिडकारले आहे. यंदाच्या निवडणुकीत तर राज्याच्या ४०३ जागांच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाचे केवळ दोन आमदार निवडून आले आहेत व पक्षाला अवघी २.४ टक्के मते मिळाली आहेत. सर्वात कहर म्हणजे काँग्रेसच्या ९७ टक्के उमेदवारांचे डिपाॅझिट या निवडणुकीत जप्त झाले आहे. पक्षाने ३९९ जागा लढवल्या, पैकी ३८७ उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले. काँग्रेसचा एवढा दारुण पराभव झाल्यानंतरही पक्षाच्या हायकमांडला त्याचे गांभीर्य नाही, याचे मोठे आश्चर्य वाटते. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी घेतली होती. त्या पक्षाच्या एकमेव स्टार प्रचारक होत्या. महिला व युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. महिलांना चाळीस टक्के उमेदवारी देण्याची घोषणा केली. या निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असा चंग त्यांनी बांधला होता. प्रियंकासारखे प्रभावी अस्त्र प्रचारात उतरवले, पण पक्षाकडे केडर नाही, कार्यकर्ते नाहीत, सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचे आकर्षण राहिलेले नाही हाच या निकालाने संदेश दिला. प्रियंकाच्या आग्रहामुळे पक्षाने १५९ महिलांना उमेदवारी दिली, पण पक्षाला विधानसभेत खाते उघडताना नाकीनऊ आले. केवळ महिला म्हणून कोणी मतदान करीत नाही आणि काँग्रेसविषयी जनतेला काहीच स्वारस्य उरलेले नाही. मोदी-योगींच्या झंझावातात काँग्रेसचा पालापाचोळा झाल्याचे बघायला मिळाले. स्वत: प्रियंकाने १६० प्रचार सभा घेतल्या, ४० रोड शो केले. राज्याच्या सर्व विभागातून प्रियंकाने प्रचार केला. पण मतदारांनी त्यांच्या परिश्रमावर पाणी ओतले. काँग्रेसने सन २०१७ मध्ये समाजवादी पक्षाशी युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा या दोन्ही पक्षांचा भाजपपुढे दारुण पराभव झालाच होता, आता दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. पण पुन्हा पराभवच पदरी पडला. २०१७ मध्ये काँग्रेसला ६.२५ टक्के मतदान झाले होते व काँग्रेसचे सात आमदार विजयी झाले होते. आता जेमतेम दोन कसे तरी निवडून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांचाही निवडणुकीत पराभव झाला. ते गेली दोन टर्म आमदार होते. काँग्रेसचे जे दोन आमदार निवडून आले, त्यापैकी आराधना मिश्रा या रामपूर खास (जिल्हा प्रतापगढ) आणि वीरेंद्र चौधरी महाराजगंजमधून निवडून आले. आराधना मिश्रा यांनी निवडणूक प्रचारात प्रियंका यांना संपूर्ण राज्यभर सोबत केली. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ…’ अशी घोषणा प्रियंका यांनी दिली होती. पण महिला मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली. देशात मोदी पर्व सुरू झाल्यापासून काँग्रेसला गळती लागली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आक्रमक नेतृत्वापुढे काँग्रेसचा निभाव लागू शकत नाही हे प्रत्येक निवडणुकीत सिद्ध होत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वत: राहुल गांधी यांचा अमेठीमधून पराभव झाला होता. केवळ रायबरेलीतून सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गांधी परिवाराचे या दोन्ही मतदारसंघावरील वर्चस्व संपष्टात आले आहे. दोन वर्षांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे, सध्याचा कल बघता २०२४ मध्ये उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी एकाही काँग्रेसचा खासदार निवडून येण्याची शक्यता नाही. एवढेच नव्हे, तर गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या पंजाबमधेही काँग्रेसला काही स्थान राहील, अशी चिन्हे नाहीत. या वर्षी गुजरात व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथे आम आदमी पक्षाने निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. जेवढे आपला यश मिळेल तेवढी काँग्रेसची घसरण होईल, असे वातावण आहे.

२०१९ मध्ये अमेठीत पराभव झाल्यावर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण त्यानंतरही काँग्रेसची परिस्थिती सुधारली नाहीच. पण पक्षाला लागलेली घसरणही कोणाला थांबवता आली नाही. काँग्रेस पक्ष आता सुधारणा व दुरुस्तीच्या पलीकडे गेला आहे. गेल्या दोन वर्षांत जतीन प्रसाद, आरपीएन सिंग, ज्योतिरादित्य शिंदे असे प्रभावी नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. पक्षात न्याय मिळत नाही व पक्षाला भविष्य नाही, अशी भावना काँग्रेसमध्ये बळावत चालली आहे. राजस्थान व छत्तीसगड या दोनच राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री उरले आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, पण आतापासूनच अशोक गेहलोत व भुपेश बघेल या दोन्ही मुख्यमंत्र्यांवर पक्षाचे ओझे वाढले आहे. काँग्रेसकडे वाटचाल अस्ताकडे चालली असताना जी-२३ या नाराज गटातील ज्येष्ठांची खदखद प्रकट होऊ लागली आहे. काँग्रेसचा असा अंत आपण पाहू शकत नाही, असे उद्गार गुलाम नबी आजाद यांनी काढले. दिल्लीच्या जेएनयूमधील टुकडे टुकडे गँगचे समर्थन करणारा कन्हय्या कुमारला काँग्रेसमध्ये दिलेला प्रवेश, मुलींनी हिबाज परिधान करण्याचा अधिकार आहे अशी घेतलेली भूमिका, पंजाबमध्ये नेतृत्वबदल करताना कॅप्टन अमरिंदरसिंग यांची केलेली मानहानी, नवज्योत सिद्धूला पात्रता नसताना दिलेले अवास्तव महत्त्व, पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास चालवलेली टाळाटाळ व संघटना बांधणीकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यावर खलनायक म्हणून केलेली द्वेषपू्र्ण टीका याची किमत काँग्रेसला सतत मोजावी लागते आहे. पक्षाला संजिवनी देण्यात अपयशी ठरलेल्या सोनिया, राहुल आणि प्रियंका यांच्याविरोधात उघडपणे बंड करण्याची कोणाची हिंमत होत नाही आणि गांधी परिवारही पक्षावरील वर्चस्व सोडायला तयार नाही.

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -