Thursday, May 9, 2024
Homeमहत्वाची बातमीकाश्मीरमधील टार्गेट किलिंग

काश्मीरमधील टार्गेट किलिंग

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

केंद्र सरकारने जम्मू – काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या राज्याला दिलेले घटनेतील ३७०व्या कलमाचे कवच काढून घेतले. घटनेतील ३५ कलमाने दिलेले विशेषाधिकारही रद्द केले. देशातील कोणत्या राज्यातील भारतीय नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार दिला गेला. या राज्यात विकासाला गती मिळावी म्हणून केंद्राने भरीव निधी उपलब्ध करून विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या. पण गेल्या महिनाभरापासून काश्मीर खोऱ्यात बिगर काश्मिरी हिंदूंच्या हत्या होत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरच्या बाहेरून आलेल्या लोकांमध्ये दहशत व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा रक्ताचे सडे पडू लागले आहेत.

श्रीनगरच्या सुप्रसिद्ध दल लेकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हाऊस बोटी पुन्हा सजायला लागल्या होत्या. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली व देशाच्या अन्य भागांतून हाऊस बोटींवर राहण्यासाठी पर्यटकांचे बुकिंग सुरू झाले, कित्येक हजार पर्यटक श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्गला पोहोचले सुद्धा. पण अचानक काश्मीर खोऱ्यात बिगर काश्मिरी व तेही हिंदूंच्या हत्या सुरू झाल्याने पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवादाच्या भीतीने अनेकांना पुन्हा आपली घरे-दारे सोडून आपल्या राज्यात निघून जाण्याची पाळी आली आहे. आलेल्या पर्यटकांनाही आपला गाशा गुंडाळून माघारी फिरावे लागले. १९९० मध्ये खोऱ्यातील चार लाख पंडितांना आपला जीव वाचविण्यासाठी नेसत्या वस्त्रानिशी पलायन करावे लागले होते, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी फार मोठे कारस्थान रचले जात असावे. श्रीनगरमधील प्रसिद्ध औषध दुकानाचे मालक मलिक माखनलाल यांची ज्या क्रूर पद्धतीने दहशतवाद्यांनी हत्या केली, त्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा रक्ताचे सडे पडणार, याचे संकेत मिळाले होते. लाल बाजारमधील पाणीपुरी विकणाऱ्या वीरेंद्र पासवानची दहशतवाद्यांनी हत्या केली. तो बिहारी आहे म्हणून हत्या झाली, असे नव्हे तर, तो काश्मीरबाहेरचा म्हणून तो दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर होता. खरे तर, गर्दीने गजबजलेल्या लाल बाजारमध्ये कित्येक वर्षे पाणीपुरी विकून आपला उदरनिर्वाह करीत होता, त्याला ओळखणारे हजारो लोक होते, पण दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घालताना विचार केला नाही. एका क्षणात त्याच्या परिवाराला दहशतवाद्यांनी अनाथ करून सोडले. प्रिन्सिपॉल सतिंदर कौर व अध्यापक दीपक चंद हे केवळ बिगर-काश्मिरी आहेत, म्हणून त्यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. सतिंदर कौर या शिक्षण क्षेत्रातल्या आदरणीय व्यक्ती होत्या, समाजसेवेतही त्यांचे फार मोठे योगदान होते. सतिंदर कौर या आपले निम्मे वेतन अनाथ मुलांच्या पालन पोषणासाठी करीत होत्या. त्यांनी किती तरी मुस्लीम मुलांना आधार दिला होता. असंख्य मुस्लीम मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्या उचलत होत्या. त्यांच्या हत्येने किती अनाथ मुलांचे आणि गोरगरीब परिवारांचे नुकसान झाले असेल, याचा विचार त्यांना गोळ्या घालणाऱ्यांनी केला नाही.

काश्मीरच्या खोऱ्यात १९९० च्या दशकात थैमान घातलेला पुन्हा इस्लामिक दहशतवाद सुरू झाला आहे; पण काश्मीरमधील कोणीही मुस्लीम राजकारणी किंवा नेता त्याचा धिक्कार करायला पुढे सरसावला नाही. फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी व त्यांच्या घराण्याने या हिंसाचारावर मौन बाळगले आहे. फारुख अब्दुल्ला व मेहबुबा यांच्या मतानुसार, ‘ये जिहादी भटके हुए जवान है….’ सुरक्षा दलातील जवानांच्या आणि बिगर काश्मिरी नागरिकांच्या पाठोपाठ डझनभर हत्या झाल्यावरही काश्मीरमधील आणि देशपातळीवरील भाजपविरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूरमध्ये भरधाव मोटारीखाली चार शेतकरी चिरडून मरण पावले आणि जमावाने केलेल्या मारहाणीत ड्रायव्हरसह भाजपचे तीन कार्यकर्ते ठार झाले. लखीमपूरमधे शेतकरी चिरडले गेल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. पण काश्मीरमधील हत्याकांडानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांपैकी कोणीही ब्र काढला नाही किंवा काश्मीरमधील दहशतवादाचा निषेधही केला नाही. लखीमपूरच्या हत्येनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या इन-चार्ज प्रियंका वड्रा, पंजाब व छत्तीसगडचे मुख्यमंत्री आदी दिग्गजांची रिघ लागली होती. सपाचे अखिलेश यादव व बसपचे नेतेही वाजत-गाजत तेथे गेले होते. पण काश्मीरमध्ये हिंदूंचे शिरकाण होत असताना कोणाच्याही डोळ्यांतून अश्रू आले नाहीत. काश्मीरमधील हत्याकांडाच्या विरोधात देशात कुठेही विरोधी पक्षांनी धरणे धरले नाही, निदर्शने केली नाहीत, आंदोलन केले नाही, कोणीही मेणबत्त्या पेटवून मोर्चा काढला नाही.

मोदी सरकारने ३७०वे कलम रद्द करून इतिहास घडवला, त्यावेळी ज्यांनी नाके मुरडली ते आजही काश्मीरमधील रक्तपातानंतर तोंडावर पट्टी बांधून बसले आहेत. काश्मीर हत्याकांडाचा निषेध करून किंवा चर्चा घडवून आपल्याला काहीच राजकीय लाभ होणार नाही, म्हणून भाजपच्या विरोधकांनी मौन बाळगले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बिगर काश्मिरी आणि त्यातही हिंदूंना टार्गेट केले जात आहे. ३७०वे कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये किती नेत्यांना किती काळ स्थानबद्ध केले होते, किती जणांना घरात नजरकैदेत ठेवले होते, किती महिने इंटरनेट व मोबाईल सेवा बंद ठेवली होती, यावर आक्रोश करणारे नेते हिंदूंना वेचून ठार मारले जात असताना गप्प बसले आहेत.

काश्मीरमध्ये घुसून निरापराध नागरिकांना ठार मारणारे कोण आहेत, त्यांना कोणी पाठवले, ते नेमके कुठून आले, यांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत; पण हा पाकिस्तानप्रेरित दहशतवाद आहे, हे निश्चित. पाकव्याप्त काश्मीरमधूनच सशस्त्र दहशतवादी भारतात घुसले आहेत. त्यांचे अगोदर काश्मिरी पंडित लक्ष्य होते आणि आता बिगर काश्मिरी हिंदू हे त्यांचे टार्गेट किलिंग आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती मात्र, पाकिस्तानबरोबर संवाद साधला तरच शांतता लाभू शकते, असा केंद्राला सल्ला देत आहेत.

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -