Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीस्वामीच देवी अन्नपूर्णा

स्वामीच देवी अन्नपूर्णा

समर्थ कृपा – विलास खानोलकर

श्री स्वामी समर्थ हे श्री गुरुदेवदत्तांचे अवतार आहेत. ही सारी सृष्टी त्यांच्याच अधीन आहे. जन्ममृत्यूचा फेरा हा त्यांच्याच हातात आहे. श्री स्वामींची कृपा झाली, तर काहीही कठीण नाही, हे श्री स्वामी समर्थांचे भक्त जाणत होते. त्यामुळेच श्री स्वामींचा भक्त परिवार वाढतच होता.

अक्कलकोटमध्ये तर भक्तीच्या पताका घराघरावर फडकत होत्या. अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे भक्त भारावले होते. अक्कलकोटात श्री स्वामींच्या परम भक्तांमध्ये भगवंत अप्पा सुतार नावाचा भक्त होता. श्री स्वामींवर त्याची श्रद्धा होती. तो सदैव त्यांच्या सेवेत असायचा. भगवंत अप्पा शेतकरी होता. शेतात कष्ट करून तो पोट भरत असे. भगवंताने आपल्या शेतात विहीर खणली होती. तिचे बांधकामही केले होते. त्या विहिरीला भरपूर पाणी आले होते. हे सारे श्री स्वामी कृपेनेच झाले असे भगवंत मानत होता. श्री स्वामींना एकदा आपल्या शेतात घेऊन जावे. त्यांची पूजा-अर्चा करून त्यांना जेवू घालावे व त्यांचे उष्टे अन्न आपण प्रसाद म्हणून खावे अशी भगवंताची इच्छा होती. त्या दृष्टीने त्याने प्रयत्नही केले होते. एकदा स्वामी मोदी यांच्या कट्ट्यावर बसलेले होते. ते सेवेकऱ्यांशी हास्यविनोद करत बोलत होते. ही संधी साधून भगवंताने श्री स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवली आणि आपल्या शेतावर येण्याची विनंती केली. ‘थोडा वेळ थांब! मग जाऊ’ असे स्वामी त्याला म्हणाले. असे तीनदा घडले.

ते बघून भगवंत सुतार निराश झाला आणि शांत बसला. तेवढ्यात तिथे काशिनाथराव म्हसवडकर आले. त्यांच्यावर श्री स्वामींचे विशेष प्रेम होते. काशिनाथरावांना त्याने आपली इच्छा बोलून दाखवली. काशिनाथरावांनी विनंती करताच स्वामी ताडकन उठले आणि भगवंताच्या शेताकडे चालू लागले. भगवंताला मोठा आनंद झाला. श्री स्वामींच्या मागे तोही निघाला. त्याने आपल्या मित्रांना स्वयंपाकाचे साहित्य आणायला सांगितले. शेतावर पोहोचल्यावर श्री स्वामींनी भगवंताच्या शेतात फेरफटका मारला. विहीर बघितली. आनंद व्यक्त केला.

तेवढ्यात तेथे काशिनाथराव, सबनीस आदी मंडळी आली. त्यांनी सुग्रास स्वयंपाक केला. विहिरीच्या पाण्याने भगवंताने श्री स्वामींना मंगलस्नान घातले. त्यानंतर त्यांची षोडशोपचारे पूजा करून त्यांना फुलांच्या माळा घातल्या. नंतर भक्तिभावाने जेवू घातले. महाराज पोटभर जेवले. तृप्त झाले. महाराजांचे जेवण होताच भगवंत, काशिनाथराव, सबनीस असे पाच-सहा लोक जेवायला बसणार तेवढ्यात आठ-दहा गावकरी तिथे आले. ‘यांनाही जेवू घाला!’ स्वामींनी आज्ञा केली. ते बोलणे ऐकून सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. कारण भांड्यात फक्त चार-पाच लोकांना पुरेल एवढंच अन्न शिल्लक होतं. स्वामींची आज्ञा मानून त्यांनी त्या लोकांना जेवायला वाढले. ते जेवतात न जेवतात तोच आणखी काही लोक दर्शनाला आले. त्यांनाही जेवू घातले गेले. अशा प्रकारे पन्नासपेक्षा जास्त लोक जेवले. पण अन्न जराही कमी पडले नाही. सर्वांनी जेवून सुद्धा अन्न उरले. अशी होती श्री स्वामींची लीला!

स्वामी संकट निवारक

आप्पा सुतार नको करू काळजी
स्वामी घेतात भक्तांची काळजी ||१||
आहे मीच देवी अन्नपूर्णा
हजारोंना भरवणारा अन्नपूर्णा ||२||
आत्मकंदीलाची दूर करतो काजळी
पुण्य तुझे सोडून ये गंगाजळी ||३||
स्वामी उभे नर्मदाजळी
सारे पुण्य उभे अक्कलकोटी ||४||
मातीची लोटी होईल सोन्याची लोटी
पवित्र ते स्वामी तीर्थलोटी ||५||
स्वामी घेई भक्ताची कसोटी
स्वामीनाम, स्वामी-उदी,
नाही खोटी ||६||
स्वामी देती लढा येता कसोटी
संकट राक्षसाची ओढती कास्टी ||७||
भूतप्रेत समंधांची बंद बोलती
संकटाला घालती लाथा ||८||
शत्रूच्या बंद बाता
येईल कानी सुवार्ता ||९||
सुखी पुत्रपौत्र भ्राता
अनाथा प्राप्त नाथा ||१०||
नापासाच्या हाती गाथा
ईश्वरी गाणी गाता गाता ||११||
होईल पंडीत हृदयनाथ आता
असूर बकासूर होईल सूर ||१२||
मावळा शिवाजीचा होईल शूर
चोर लुटारूना मिळणार नाही
तूर ||१३||
संकटे सारी जातील दूर दूर
आनंदाचा येईल महापूर ||१४||
अश्वमेधाचा घोडा उधळत येईल खूर
सारे सुख येईल भरपूर ||१५||
बंगला घरदार सारे भरपूर
स्वामीनाम श्रमदान करा भरपूर ||१६||
संसारात सापडेल आनंदाचा सूर
रंगपंचमीचा सप्तरंगी सूर ||१७||
राजा पौरस होईल शूर
विलासाचे गीत अमर सूर ||१८||

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -