Wednesday, May 8, 2024
Homeदेशसुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवार...

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवार नाराज?

शरद पवार यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्लीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होत्या. यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे, अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांची नावे घेतली जात होती. शरद पवारांच्या घोषणेमुळे आता राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर राहील, हे स्पष्ट झाले आहे.

अजित पवारांकडे कोणतीच जबाबदारी नाही

प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करताना सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांच्याकडे ओदिशा, पश्चिम बंगाल, शेती, अल्पसंख्याक या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे तर जितेंद्र आव्हाडांकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, कामगार या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवारांना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

अजित पवारांची ‘नो कमेंट्स’ भूमिका

या सोहळ्यात जोरदार ढोलताशांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला अजित पवारदेखील उपस्थित असल्याने पत्रकारांनी या घोषणेसंबंधी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ‘या आवाजात मला काही ऐकू येत नाही आहे’ असे म्हणत अजित पवारांनी याबाबत बोलणे टाळले. यावर जितेंद्र आव्हाडांनी ‘दादा बोलणार नाहीत’ असे स्पष्टपणे सांगितले. यानंतर कार्यक्रमातून बाहेर पडत पत्रकारांच्या घोळक्याला काहीच उत्तर न देता अजित पवार थेट गाडीतून रवाना झाले. त्यामुळे ते या निर्णयाबद्दल नाराज आहेत की काय असा सूर उमटत आहे. दरम्यान सर्वचजण अजित पवारांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत.

साहेबांचा भार हलका होईल : जितेंद्र आव्हाड

ही चांगलीच बाब आहे. ताई फिरणार्‍या नेत्या आहेत आणि संपूर्ण देशात फिरून त्या पक्षबांधणी करतील, त्यामुळे साहेबांचा भार हलका होईल, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली.

सुप्रिया सुळे यांची ट्विट करत प्रतिक्रिया

दरम्यान या सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याने सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियामार्फत प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी पक्ष संघटनेचे आभार मानत माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवेन, असे ट्विट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -