Sunday, March 15, 2026

आत्मप्रतिष्ठेचं भान

आत्मप्रतिष्ठेचं भान

स्मृतिपटल; अनिल तोरणे

कोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका प्रतिभावान संगीत दिग्दर्शकाच्या बाबतीत असेच काहीसे घडले होते. मद्यपान ही त्या संगीतकाराची कमकुवत बाजू होती. दारूच्या नशेत असतानाही त्यांचे संगीत श्रवणीयच असे; पण त्यांचा आपल्या जिभेवर अजिबात ताबा राहात नसे आणि अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे. त्यांचे संगीत लाभलेल्या एका चित्रपटातील एक गीत गाण्यासाठी त्यांनी एका नवोदित; परंतु अत्यंत स्वाभिमानी पार्श्वगायिकेला बोलाविले आणि... ही घटना १९४९ सालातील आहे. त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लाहोर’ या चित्रपटातील “बहारें फिर भी आएंगी मगर हम तुम जुदा होंगे...” हे गीत गाण्यासाठी त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांनी नवोदित लता मंगेशकर यांना पाचारण केले. लता मंगेशकर गीताची रंगीत तालीम करू लागल्या आणि इकडे श्याम सुंदर यांनी मद्यपान सुरू केले. रंगीत तालमीच्या वेळी लता मंगेशकर यांच्याकडून झालेल्या किरकोळ चुकीवर ते म्हणायचे, श्याम सुंदरचे गीत गाणे म्हणजे पोरखेळ नव्हे ! असे म्हणत असतानाच नको ते अपशब्दही ते वापरत असत. दारूची गुंगी चढली की त्यांचा स्वत:वर ताबा राहात नसे आणि शिवीगाळीची भाषा त्यांच्या तोंडी येई आणि हा सगळा प्रकार गीताला चाल लावताना, गीत शिकविताना व गीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीही होत असे. लता मंगेशकर नव्या होत्या तरी त्या स्वाभिमानी असल्यामुळे श्याम सुंदर यांची भाषा ऐकून त्या रंगीत तालीम सोडून निघून गेल्या; परंतु श्याम सुंदर यांना पक्के ठाऊक होते की त्यांच्या गीताला केवळ लता मंगेशकरच न्याय देऊ शकत होत्या. म्हणून त्यांनी लता मंगेशकर यांना बोलाविणे पाठविले. पण श्याम सुंदर यांनी वारंवार बोलावणे पाठवूनही लता मंगेशकर आल्याच नाहीत. लता मंगेशकर न आल्याने काही लोकांनी श्याम सुंदर यांना ते गीत अन्य पार्श्वगायिकेकडून गाऊन घ्यावे, असे सुचविले; परंतु मद्यपान करणे ही श्याम सुंदर यांची जशी कमकुवत बाजू होती त्याचप्रमाणे संगीताच्या बाबतीत कसलीही तडजोड न करण्यावरही ते तितकेच ठाम होते. त्यामुळे अन्य पार्श्वगायिकेकडून गीत गाऊन घेण्याचा सल्ला देणाऱ्याना ते म्हणाले, जर लता मंगेशकर हे गीत गाणार नसतील तर ते कोणीच गाणार नाही! मी हे गीत चित्रपटातूनच काढून टाकेन. श्याम सुंदर यांनी असे म्हटल्यावर त्या चित्रपटाच्या निर्मात्याची द्विधा अवस्था झाली. ते लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांची समजूत घालण्यासाठी त्यांना म्हणाले, दारूच्या नशेत उच्चारल्या गेलेल्या शब्दांकडे काणाडोळा करा आणि येऊन ते गीत गा. निर्मात्याचे म्हणणे ऐकून घेऊन लता मंगेशकर त्यांना म्हणाल्या, माझ्या गीतगायनातील त्रुटी जर कोणी दाखविल्या तर त्याला माझी काहीच हरकत नाही. गीत ध्वनिमुद्रित झाल्यावरही जर गरज भासली, तर मी शंभर वेळा येऊन गीत पुन्हा ध्वनिमुद्रित करेन पण अशा प्रकारची वागणूक मिळाली तर माझ्यासाठी चूक सुधारणेही कठीण होऊन बसते आणि मी हा अपमान का सहन करावा? ते मोठे संगीतकार आहेत आणि मी त्यांच्यापुढे काहीच नाही. मी गीत गाऊ इच्छिते पण आपण त्यांची शिवीगाळ बंद करावी. लता मंगेशकर यांचे म्हणणे ऐकल्यावर निर्मात्याने त्यांना हमी दिली आणि ते गीत ध्वनिमुद्रित झाले. या घटनेनंतर काही कालावधी लोटला आणि लता मंगेशकर यांनी काही कारणाने श्याम सुंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीत गाणे पुन्हा एकदा बंद केले. त्यांनी असे करताच श्याम सुंदर यांनीही त्याच क्षणी मनाशी पक्के ठरवून टाकले की, मी लता मंगेशकर यांच्याशिवाय माझी गीते लोकप्रिय करून दाखवेन; परंतु त्यांनी ज्या दोन चित्रपटांना संगीत दिले होते ते चालले नाहीत आणि त्यांचे संगीतही लोकप्रिय झाले नाही. त्यानंतर श्याम सुंदर ‘अलिफ लैला’ या चित्रपटाला संगीत देत होते. गीतांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी श्याम सुंदर मद्याच्या नशेत असत आणि त्यामुळे ध्वनिमुद्रणात अडथळे निर्माण होऊ लागले. ही बाब त्या चित्रपटाच्या निर्मात्याच्या कानावर गेली. श्याम सुंदर आपल्या चित्रपटाचे संगीतकार असल्याने लता मंगेशकर यांचे गीत आपल्या चित्रपटात असणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे श्याम सुंदर यांना बदलून अन्य संगीत दिग्दर्शकाला करारबद्ध करावे असा विचार निर्मात्याच्या मनात आला. लता मंगेशकर यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना वाईट वाटले. त्यांनी निर्मात्याला अशी अट घातली की, मी तुमच्या चित्रपटासाठी गीत गाईन पण श्याम सुंदरच संगीतकार हवेत ! मात्र तोपर्यंत श्याम सुंदर यांनी केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर मुंबईही सोडली होती ! लता मंगेशकर निर्मात्याला म्हणाल्या, दिलेल्या वचनानुसार मी गीत अवश्य गाईन पण श्याम सुंदर यांना पुन्हा बोलाविण्याची व्यवस्था केली जावी. अखेर लता मंगेशकर यांनी जसे सांगितले होते तसेच घडले. श्याम सुंदर यांच्याशी झालेला वाद विसरून त्यांनी गीताचे ध्वनिमुद्रण केले.
Comments
Add Comment