महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
श्रीमद्भागवतात श्रीभागवत कथे संदर्भात कथा श्रवणाचे प्रकार, उत्तम वक्ता व श्रोत्यांच्या प्रकारा संदर्भात माहिती सांगितलेली आहे. ही माहिती सुतानी शौनकांना सांगितल्याचा उल्लेख आहे. भागवत कथा संदर्भात कथा श्रवणाचे प्रकार सांगितलेले आहे. त्यानुसार सात्त्विक श्रवण, राजस श्रवण, तामस श्रवण व निर्गुण श्रवण असे प्रकार आहे. सात्त्विक श्रवण म्हणजे कथेचा आस्वाद घेत, जास्त परिश्रम न घेता, एक दोन महिनेपर्यंत श्रवण केले जाते, त्याला सात्त्विक श्रवण असे म्हणतात.
राजस श्रवण म्हणजे विविध प्रकारच्या पूजा साहित्यासह व उत्सव करून परिश्रमपूर्वक घाई गडबडीने सात दिवसांत आनंदाने पारायण करून श्रवण केलेल्याला राजस श्रवण म्हणतात. तामस श्रवण श्रद्धेने सुरुवात करून श्रवण थांबते व आठवण झाल्यानंतर पुन्हा सुरू केले व अशा प्रकारच्या आळसामुळे जे वर्षभर श्रवण केले जाते त्याला तामस श्रवण म्हणतात. हे सुद्धा सुखदायक मानले जाते. निर्गुण श्रवण म्हणजे कोणतीही कालमर्यादा न ठेवता केवळ प्रेम व श्रद्धापूर्वक अंत:करणाने श्रवण केले जाते त्या श्रवणाला निर्गुण श्रवण असे म्हणतात. शुकानी परीक्षित राजाला एकविलेले भागवत हे निर्गुण प्रकारातील होय; परंतु तेथील सात दिवसांची मर्यादा आहे ती केवळ परीक्षित राजाचे आयुष्य केवळ सात दिवसच राहिले होते व त्यानंतर सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होणार होता, त्या आधी भागवताचे पारायण पूर्ण व्हावे म्हणून आहे. सप्ताह कथेचा नियम म्हणून नाही.
उत्तम वक्ता उत्तम वक्ता कोणता तर ज्याचे चित्त नेहमी भगवंताच्या चरणी लागले असते, जो नि:स्वार्थ व अपेक्षा रहित वृत्तीने सर्व दीनावर दया करणारा असतो व तत्त्वाचा अर्थ सोदाहरण समजून सांगतो. त्याला उत्तम वक्ता म्हटले आहे.
श्रोत्यांचे प्रकार भागवतानुसार श्रोत्याचेही उत्तम श्रोता व अधम श्रोता असे दोन मुख्य प्रकार आहेत.
उत्तम श्रोता उत्तम श्रोता तो आहे जो भगवत कथा सांगणाऱ्या वक्त्याला नम्रपणे प्रणाम करून नम्र भावनेने हात जोडून श्रद्धेने व शिष्य भावनेने भगवंताच्या कथा ऐकतो व भगवंता वर प्रेम करतो. जे ऐकले त्याचे चिंतन करतो व जे समजले नसेल ते विचारतो त्याला उत्तम श्रोता म्हणतात.
उत्तम श्रोत्याचेही चातक, हंस, शुक व मीन असे प्रकार आहे. चातक श्रोता म्हणजे चातक ज्याप्रमाणे ढगातून पडणाऱ्या पावसाची वाट पाहतो, त्याचप्रमाणे फक्त श्रीकृष्णा संबंधीच्याच शास्त्राचे श्रवण करणाऱ्याला चातक श्रोता म्हणतात. असे म्हणतात की हंस ज्याप्रमाणे पाणी मिश्रित दुधातून केवळ दूधच घेतो त्याचप्रमाणे जो श्रोता अनेक गोष्टी ऐकून त्यामुळे सार तेवढेच घेतो त्याला हंस श्रोता असे म्हणतात. शुक श्रोता म्हणजे शिकविलेला पोपट ज्याप्रमाणे आपल्या वाणीने शिकवणाऱ्या शिक्षकाला तसेच इतरांना सुद्धा आनंदित करतो त्याला शुक्र श्रोता म्हणतात. मीन श्रोता म्हणजे, क्षीरसागरातील मासा ज्याप्रमाणे पापण्या न मिटता मौनपणे पोहत राहून दुग्धपान करतो त्याचप्रमाणे जो श्रोता कथा ऐकताना डोळ्यांच्या पापण्या न मिटता व तोंडातून शब्दही न काढता कथेचे श्रवण करतो त्याला मीन श्रोता म्हणतात.
अधम श्रोता अधम श्रोत्याचेही वृक, भुरंड, वृष आणि उंट असे चार प्रकार आहेत. कथा श्रवण करीत असलेल्या रसिक श्रोत्यांना डिवचून मध्येच जो मोठ्याने बोलतो तो वृक श्रोता म्हटला जातो. भुरंड-श्रोता दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या उक्तीनुसार जो कृष्ण कथांचा उपदेश ऐकतो व दुसऱ्यांना उपदेश करतो; परंतु स्वतः मात्र तसे आचरण करत नाही त्याला भुरंड-श्रोता म्हणतात. वृष श्रोता म्हणजे बैल ज्याप्रमाणे आपल्यासमोर टाकलेले द्राक्ष किंवा कडबा एकाच चवीने खातो त्याचप्रमाणे जो श्रोता सर्वच ऐकतो; परंतु घेण्याजोगे व टाकण्याजोगे काय हे ज्याला कळत नाही तो वृष श्रोता म्हटला जातो. उंट श्रोता म्हणजे उंट ज्याप्रमाणे आंबा सोडून कडुलिंबाचा पालाच चघळतो त्याप्रमाणे जो श्रोता भागवत कथेतील भगवंताच्या सुंदर कथा सोडून संसारातील गोष्टीतच रमतो, त्याला उंट श्रोता असे म्हणतात.
याशिवाय श्रोता वक्ता यांचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. एक श्रीकृष्णाची इच्छा करणारे व दुसरे धनाची इच्छा करणारे. जसा वक्ता तसाच श्रोता असेल तर त्या ठिकाणी कथेच्या सुखांमध्ये वाढ होते. जर दोघांचे विचार एकमेकांच्या विरुद्ध असतील तर कथेची गोडी वाढत नाही आणि फळ मिळत नाही; परंतु दोघेही श्रीकृष्ण प्राप्तीची इच्छा करणारे असतील तर त्यांना उशिरा का होईना सिद्धी अवश्य प्राप्त होते. धनाची अपेक्षा करण्याच्या विचाराने श्रवण करणाऱ्याचे अनुष्ठान व्यवस्थितरीत्या पार पडले तरच त्याला सिद्धी प्राप्त होते; परंतु श्रीकृष्णाची इच्छा करणाऱ्याच्या विधीमध्ये काही कमतरता राहिली तरी सुद्धा त्याच्या हृदयातील प्रेम हाच सर्वोत्तम विधी आहे असे भागवतात सांगितले आहे.
श्रीमद्भागवत कथा श्रवण करणाऱ्याला धन, पुत्र, स्त्री, वाहन, यश, घर व निष्कंटक राज्य सुद्धा मिळू शकते. ही कथा भक्तिभावनेने श्रवण करणारे मनाजोगते उत्तम भोग भोगून श्रीहरीचे परमधामपद प्राप्त करून घेतात. भागवत कथा श्रवण करण्याची सेवा करणाऱ्यांनाही भागवत कथा श्रवणाइतकेच पुण्य लाभते. व्यवहारातही अन्य कोणत्याही कथनासाठी व श्रवणासाठी वरील प्रकारेचे वर्गीकरण लागू होते.






