नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याऱ्या जगजीत सिंगजींच्या आवाजात वेगळीच शक्ती होती. ते गायला लागले की श्रोत्यांच्या ‘वाह व्वा!’, ‘क्या बात हैं,’ अशा उद्गारांनी सभागृह दुमदुमून जायचे. मधेच एखादा चुटकुला सांगून ते गझलेच्या मैफलीत हंशा-टाळ्यांचे एखादे ‘आंतरपीकही’ घेत. गझलेची प्रत्येक ओळ खर्जातल्या त्यांच्या हिप्नॉटिक आवाजात सरळ ऐकणाऱ्याच्या हृदयात उतरायची!
त्यांनी चित्राजींबरोबर गायलेली एक गझल मला फार आवडायची. खरे तर त्या दोन गझला होत्या. दोन्ही गझला ‘हमरदीफ’ म्हणजे सारख्याच वृत्ताच्या असल्याने त्यांनी त्या एकत्र गुंफल्या. शायर ‘सुदर्शन फाकीर’ यांच्या गझलेची एक ओळ चित्राजींनी गायल्यावर लगेच जगजीतजी ‘ख्वाजा हैदर अली आतिश’ यांची दुसरी ओळ म्हणायचे. आपण दोन वेगवेगळ्या गझला ऐकत आहोत हे श्रोत्यांच्या लक्षातच येत नसे इतका त्यांचा आशय एकमेकात विरघळणारा होता. सुदर्शन फाकीर यांची पहिली ओळ -
“इश्कमे गैरत-ए-जजबातने, रोने ना दिया.. वरना क्या बात थी, किस बातने रोने ना दिया.” चित्राजींनी म्हणाली की जगजीतजींच्या आवाजात ख्वाजा हैदर अली यांची पुढची ओळ यायची - “यारको मैने, मुझे यारने सोने ना दिया.. रातभर ताले-ए-बेदारने सोने ना दिया.” ‘ताले-ए-बेदार’ने म्हणजे ‘तिचा होकार मिळाल्याने माझ्या नशिबाच्या सुखद जाणिवेत मी रात्रभर जागाच होतो.’ मग चित्राजींचा गोड, काहीसा अनुनासिक, आवाज यायचा - “आप कहते थे के, रोनेसे ना बदलेंगे नसीब उम्रभर आपकी इस बातने रोने ना दिया.”
जिवलगाच्या आश्वासनावर कसला हा अतर्क्य विश्वास! म्हणजे ‘तू म्हणालास ना, की रडण्याने नशीब बदलत नसते मग आयुष्यभर मी दु:ख आवरूनच धरले. डोळ्यांतून अश्रूचा थेंबही गळू दिला नाही!’ असे ती सांगते. अशा गझला म्हणजे कवीने त्याच्या मनस्वितेला दिलेली पूर्ण मोकळीक असते. सुदर्शनजींची पुढची ओळ तर कहर होता. ते म्हणतात -
“रोनेवालो से कहो उनका भी रोना रो ले, जिनको मजबुरी ए हालात ने रोने ना दिया..”
ज्यांना परिस्थितीमुळे रडता आले नाही, त्यांचा रडणाऱ्यांसाठी एक अजीजीचा निरोप आहे - ‘बाबांनो, आमच्या वाट्याचे रडणेही तुम्हीच रडून टाका रे, प्लीज! कारण आम्ही इतक्या अगतिक परिस्थितीत आहोत की आम्हाला रडणेही शक्य नाही.’ कसली ही विनंती आणि केवढा हळवा प्रस्ताव! रडण्याचे ऑउटसोर्सिंग! ही ओळ कधीही ऐकली तरी मनाला हळवे करून टाकते!
सुदर्शनसाहेबांच्या निरीक्षणशक्तीची ओळख देणारा शेवटचा शेर लाँगप्ले तबकडीत नव्हता. ते शेवटी म्हणतात - एक दो रोज़का सदमा हो तो रो लें ‘फ़ाकिर’ हमको हर रोज़के सदमातने रोने न दिया’ दु:ख एखादे वेळी झाले तर माणसाला रडू आवरत नाही पण आयुष्यात ते इतके नियमित धक्के देत राहिले की आम्ही रडण्याचे विसरूनच गेलो. तब्बल ९२ वर्षांपूर्वी जालंदर इथे जन्मलेले सुदर्शन कामरा एक मनस्वी कवी होते. जालंदरच्या डी.ए.व्ही. महाविद्यालयात शिकताना त्यांची मैत्री जगजीतसिंगांशी झाली आणि त्यांची - “ये दौलत भी ले लो, ये शौहरत भी ले लो, भले छीनलो मुझसे मेरी जवानी, मग़र मुझको लौटा दो वो बचपनका सावन, वो क़ाग़ज़ की कश्ती, वो बारिशका पानी” जेव्हा जगजीतजींनी गायली तेव्हा दोघे एका रात्रीत देशभर प्रसिद्ध झाले. त्या गाण्याने हळवा झाला नाही असा रसिक सापडणार नाही. ती मैत्री पुढे आयुष्यभर टिकली आणि सुदर्शनजींच्या कविता, गझला बेगम अख्तर यांच्याशिवाय प्रामुख्याने जगजीतजींनीच गायल्या. काही दिवस जालंदर आकाशवाणी केंद्रासाठी काम केलेल्या फाकीरसाहेबांनी सिनेमासाठी गाणी आणि संवादही लिहिले. त्यात १९७९साली आलेला ‘दूरियाँ’, १९९२चा ‘यल्गार’, १९९८चा ‘प्रेम-अगन’ हे चित्रपट होते. संकोची स्वभावाच्या सुदर्शनसाहेबांनी कधी कुणाकडे स्वत:हुन काम मागितले नाही त्यामुळे ते प्रसिद्धीपासून दूर राहिले पण जगप्रसिद्ध उर्दू शायर फैझ अहमद ‘फैझ’ त्यांना फार मोठा शायर मानत असत. अशीच त्यांची एक गझल त्यांच्या चित्रमय लेखनशैलीची आणि मनस्वी स्वभावाची ओळख बनली. त्या गझलेच्या पहिल्याच ओळी ऐकताना मला नेहमी संजय दत्तच्या ‘वास्तव’चा शेवटचा सीन आणि ख्रिस्तोफर मार्लोव्हच्या ‘डॉ.फॉस्टस’ या नाटकाचा शेवट आठवतो.
पोलीस गँगस्टर रघुला (संजय दत्त) चकमकीत उडवायलाच येणार असतात. प्रेमळ मराठी कुटुंबात पण टोकाच्या गरिबीत वाढलेला आणि वहावत गेल्याने गँगस्टर बनलेला संजय मृत्यूच्या भीतीने पुरता हादरलेला असतो. प्रचंड भीतीने घेरलेल्या अवस्थेत आपल्याला कुणीतरी लपवून ठेवावे आणि आपला जीव वाचवावा असे अगदी घायकुतीला आलेल्या रघुला वाटत असते.
तशीच भावना पण अतिशय हळुवारपणे सुदर्शनजीनी या गझलेत मांडली. ते मित्राला म्हणतात, ‘सगळी दु:खे एखाद्या मारेक-यासारखी माझ्याकडे चालून येताहेत रे! मला आपल्या पापांसारखे कुठेतरी अगदी खोल लपवून टाक. मी आता जीवघेण्या दु:खाला सामोरा जावू शकत नाही रे - “ग़म बढे़ आते हैं क़ातिलकी निगाहोंकी तरह, तुम छिपा लो मुझे, ऐ दोस्त, गुनाहोंकी तरह.”
संवेदनशील माणसाला दुहेरी दु:ख सहन करावे लागते. आपल्या चुकांच्या शिक्षेचे अनामिक भय आणि अपराधीपणाची आतून सलत राहणारी भावना. त्यामुळे कवी म्हणतो ‘माझे मनही शत्रूला फितुर झाले आहे. तेच आता शत्रूचा साक्षीदार बनले आहे.’ “अपनी नज़रोंमें गुनाहगार न होते क्योंकर, दिलही दुश्मन हैं मुख़ालिफ़के गवाहोंकी तरह.” आयुष्याचे सगळे मार्ग उजाड झाले आहेत. सगळ्या वाटांवर असह्य ऊन धगधगते आहे, मित्रा, तुही बरोबर नाहीस. फक्त तुझ्या आठवणीच्या सावल्याच तेवढ्या आहेत.
“हर तरफ़ ज़ीस्तकी राहोंमें कड़ी धूप है दोस्त, बस तेरी यादके साये हैं पनाहोंकी तरह.” आणि जीवनाची एकंदरच बाजी हरलेल्या कवीचे सर्वात मोठे दु:ख! तो म्हणतो, ‘जिच्यासाठी मी सगळे आरोप स्वत:वर ओढवून घेतले, सगळी बदनामी पत्करली आज तीच एखाद्या न्यायाधीशासारखी माझे दोष मला सांगतीये- “जिनके ख़ातिर कभी इल्ज़ाम उठाये, फ़ाकिर’, वो भी पेश आये हैं इंसाफ़के शाहोंकी तरह.”आजच्या एकंदर मानवी संबंधातल्या रुक्षतेमुळे कमालीचे निराश झालेले सुदर्शनजी त्यांच्या दुसऱ्या एका रचनेत या सगळ्याबाबत एक जळजळीत भाष्य करून जातात - “पत्थरके ख़ुदा, पत्थरके सनम, पत्थरकेही इंसां पाए हैं, तुम शहर-ए-मुहब्बत कहते हो, हम जान बचाकर आए हैं।”






