Saturday, May 2, 2026

विचारांचे स्वागत करताना…

विचारांचे स्वागत करताना…

विशेष : प्रल्हाद जाधव

आपण आहोत म्हणून विचार आहेत आणि विचार आहेत म्हणजे ते येणारच! अगदी साधी गोष्ट होती. आता हे मला कळून चुकले होते. तेव्हा विचारांना घाबरायचे नाही, तर त्यांना समजून घ्यायचे हे लक्षात आले आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.

माणसाच्या मनात सतत विचार येत असतात आणि ते स्वाभाविकच आहे कारण माणूस म्हणजे काय; तर बऱ्या-वाईट विचारांचे गाठोडे! जगताना त्याला जे अनुभव आलेले असतात ते विचारांचे रूप घेऊन त्याच्या अवतीभवती सतत वावरत असतात. या विचारांकडे माणूस कसे पाहतो यावर त्याच्या जगण्याची गुणवत्ता अवलंबून असते. अलीकडच्या काळात अशा काही क्षणांना मला सामोरे जावे लागले की त्यामुळे मी माझ्या विचारांकडे कसे पाहत आहे याची मला व्यवस्थित जाणीव झाली आणि हो, ही जाणीव म्हणजे काही अध्यात्मिक अनुभूती वगैरे नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातली गंमत म्हणूनच मी त्याकडे पाहत आहे.

एकदा सकाळी उठलो तेव्हा‌ मनात विचारांचे काहूर माजले होते. कारण काहीच नव्हते. कदाचित अस्वस्थ व्हावे असे एखादे स्वप्न पडले असेल. उलट-सुलट विचार इकडे तिकडे भरकटत होते. “कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला…” अशी बालकवींच्या कवितेसारखी काहीशी भावावस्था झाली होती. ते विचार कुठून येत आहेत हे लक्षात येत नव्हते. त्यांवर माझे काहीच नियंत्रण राहिले नव्हते. हवेत गोते खाणाऱ्या पतंगासारखी गत झाली होती. असा पतंग रस्त्यावर, इमारतीच्या गच्चीवर, टेरेसेवर फरफटत राहतो, कधी नाकावर आपटतो, कधी फाटतो, कधी त्याचा दोर तुटतो, कधी एखाद्या झाडावर अडकून लोंबकळत राहतो.

दिशाहीन भरकटणाऱ्या विचारांवर मी नेटाने काबू मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो. म्हणजे काय केले? तर एक गोष्ट केली. श्वासावर लक्ष केंद्रित केले. श्वास आत येत आहे, बाहेर जात आहे. फक्त तेवढेच निरीक्षण करत राहिलो आणि गंमत म्हणजे या प्रक्रियेत विचारांची गर्दी हळूहळू कमी होत गेली. ते दूर दूर होत गेले. मला बरे वाटले. थोडा सावरलो पण काही वेळाने ते पुन्हा येऊ लागले. त्यांच्या पुनरागमनाचा विचार करताना लक्षात आले की ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. आपण आहोत म्हणून विचार आहेत आणि विचार आहेत म्हणजे ते येणारच! अगदी साधी गोष्ट होती. मग थोडा शांत झालो. आता विचार येत होते पण पार्श्वभूमी बदलली होती, मी त्यांना महत्त्व देत नव्हतो, तडफड नव्हती, भीती नव्हती. आणखी एक फरक झाला होता. नंतर येणाऱ्या त्या विचारांचा पतंग आपोआप मोकळ्या हवेत, उंच आकाशात जाऊ लागला होता. आकाशात हवेच्या उलट्या झोतावर तो तोल सावरण्याचा प्रयत्न करू लागला. त्या तरंगण्याला एक शिस्त, एक डौल होता. प्रतिकूल वाऱ्याच्या छातीवर तो आत्मविश्वासाने डुलू लागला होता. प्रतीकूल परिस्थिती ही एक संधी आहे असे मानत पतंग तिच्यावरच स्वार झाला होता. संघर्षाशिवाय आयुष्य नाही, भरकटलो तर नष्ट होऊ, प्रतिकार करत राहिलो, तर अस्तित्व टिकवून ठेवू हे त्याला कळले होते! पुन्हा काही गडबड झाली तर श्वासावर लक्ष केंद्रित करायचे हे तोवर माझ्या लक्षात आले होते. खूप मोकळे मोकळे वाटले. विचारांना घाबरायचे नाही, तर त्यांना समजून घ्यायचे हे लक्षात आले आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.

असेच एकदा दुपारच्या वेळी निवांत बसलो होतो. तेवढ्यात एक विचार चोर पावलांनी मनात घुसला. काहीतरी उद्देश मनाशी बाळगून तो माझ्या आजूबाजूला घोटाळू लागला. मी त्याच्याकडे नीट निरखून पाहिले आणि लक्षात आले की हा ‘काहीतरी गडबड’ करणार आहे, तो नक्कीच मला भ्रमित करण्याच्या उद्देशाने आला आहे, त्याला माझी शांतता भंग करायची आहे, मला अस्वस्थ करून सोडायचे आहे. मी सावध झालो. काहीही झाले तरी चालेल, त्याच्या जाळ्यात अडकायचे नाही असा निर्धार केला. मग मी त्याला महत्त्व न देता, त्यात गुंतून न पडता, योग्य काय - अयोग्य काय; या भानगडीत न पडता निर्धारपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागलो.

तरीही तो जाण्याचे नाव काढीना. मग मला एक कल्पना सुचली. मी त्या विचाराला जवळ घेऊन थोपटले. त्याचा स्वीकार केला. त्याला म्हटले, “थोडा वेळ तिकडे बाजूला जाऊन बैस. माझी खूप कामे आहेत ती झाली की तुझ्याकडे बघतो!” त्यावर तो चक्क शांत झाला आणि बाजूला जाऊन बसला. त्या विचाराच्या मनात काय होते, तो कसा मला भ्रमित करू पाहत होता आणि मी त्याला कसे बाजूला केले ही प्रक्रिया अगदी पायरी पायरीने माझ्या लक्षात आली. मग स्वतःचे कौतुक करत, स्वतःची पाठ थोपटून घेत, आनंदाने भरून येत, समतोल वृत्तीने पुढील कामाला लागलो…. असेच एकदा रात्री दीड वाजता जाग आली. आधीची झोप निवांत झाली होती. बाहेर शांतता होती. हवाही छान पडली होती. बाथरूमला जाऊन आलो. अंथरुणावर पाठ टेकली, डोळे मिटले आणि क्षणात घोटाळा झाला. मेंदूतील विचारांच्या गाडीने दिशा बदलली होती. मनात दबून बसलेले विचार जागे झाले होते आणि एकेक करून वर येऊ लागले होते. सुरुवात अशी झाली : भिंतीवरून गुपचूप उडी मारून चोर आत यावा तसा आधी एक विचार आला, त्याच्या पाठोपाठ दुसरा, मग तिसरा अशी त्यांची गर्दी होऊ लागली. कसले विचार होते ते? तर आयुष्यभर केलेल्या बऱ्या-वाईट कामगिरीच्या आठवणी होत्या त्या! का येत होत्या त्या? तर अर्थातच माझ्यामुळे. माझ्या असण्यामुळेच त्या होत्या आणि विचार हे त्यांच्या अाविष्काराचे रूप होते. त्यांनी मला लपेटून घेतले होते. शांततेचा रस्ता चुकला होता. मी तळमळत, तटस्थपणे त्या विचारांचे निरीक्षण करू लागलो.

काही विचार सकारात्मक आणि काही नकारात्मक आहेत असे लक्षात आले. पण सकारात्मक आणि नकारात्मक ही विशेषणे मीच त्यांना लावत होतो. त्याची गरज नव्हती. पुढे लक्षात आले की चांगले आणि वाईट असे काहीच नसते, तो आपला एक भ्रम असतो. ते फक्त एक ‘असणे’ असते. स्वतंत्र विचार ही एक निर्जीव गोष्ट असते. आपण जेव्हा त्याला अर्थ देतो तेव्हा तो जिवंत होतो. विचारांना अर्थ दिला आणि प्रतिक्रिया व्यक्त करू लागलो की मग पुढची साखळी निर्माण होऊ लागते. ती आपल्याला अडकवत खोल खोल गर्तेत घेऊन जाऊ लागते. अशावेळी विचारांना थांबवण्याचा एकच मार्ग असतो, श्वासावर लक्ष केंद्रित करणे! श्वास येत आहे, श्वास जात आहे... तो मार्ग मी पुन्हा अवलंबला. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित केले. विचार थांबले नाहीत पण मी आता त्यांना काहीही अर्थ देत नव्हतो, प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांच्याकडे तटस्थपणे पाहत होतो. जग व्यवस्थित सुरू आहे हे लक्षात येत होते.

आकाश जसे ढगांच्या वर असते तसा मी अधिक उंचावरून विचारांकडे पाहू लागलो तसतसे मला छान, मोकळे, स्वतंत्र वाटू लागले आणि मग ते विचारही हळूहळू विरळ होत मनाच्या विशाल आसमंतात विरून जाऊ लागले… इतके की, नंतर ते विचार कोणते होते हेही मला आठवेनासे झाले. मी स्वतःवर खूश झालो. आकाशात ढग यावे आणि जावे पण आकाश मात्र तेथेच असावे तशा भावस्थितीत मी गेलो. विचारांचे ढग आता इकडून तिकडे, वरून खाली सर्वत्र फिरत होते पण आता मला त्यांचा त्रास होत नव्हता. मन आकाशासारखे स्थिर होते. त्या स्थिर आकाशाच्या गहन निळाईत मी शिरलो आणि कधी झोप लागली ते कळलेच नाही!

pralhadjadhav.one@gmail.com

Comments
Add Comment