- क्राइम; अॅड. रिया करंजकर
सामान्य माणूस आजच्या वाढत्या महागाईमुळे बेजार झालेला आहे. लॉकडाऊनच्या नंतरची परिस्थिती बिकट आहे. काहींची तर नोकरी गेलेली आहे, अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत. सामान्य माणूस अशा अनेक प्रसंगाला सामोरे जात आयुष्य जगत आहे. हे आयुष्य जगताना त्यात अनेक चढउतार येतात पण हे चढउतार आपल्या जीवावर बेतून यात आपलं सर्वस्व गमावावे लागेल, याची या सामान्य माणसाला कल्पनाही नसते.
दिनकर हा सर्वांसारखा सर्वसामान्य माणूस, स्वतःच्या कुटुंबावर अतोनात प्रेम करणारा आणि तुटपुंज्या पगारामध्ये आपलं घर व्यवस्थित चालवणारा सर्वसामान्य माणूस. आपल्या अगोदरच्या नोकरीतून जे काही पैसे मिळाले होते त्याच्यातून आपल्या कुटुंबासाठी त्यांनी विरारला वन बीएचके रूम घेतलेला होता. नंतर येणाऱ्या पगारातून तो आपले घर चालवत होता.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी जसे आपल्या नोकऱ्या गमावल्या तसेच दिनकरनेही आपली नोकरी गमावली. तिथून त्याच्या जीवनाची परवड सुरू झाली. नोकरी नाही, घर कसं चालवायचं, या विचाराने तो व्यसनाकडे गेला. त्याला पैशाची जशी चणचण भासू लागली तसे त्याने बाजूला राहणाऱ्या ओळखीच्याच मित्राकडे तीन लाखांची मागणी केली. त्या मित्रानेही, तू घराचे पेपर गहाण ठेवत असशील तर मी तुला तीन लाख रुपये देतो असे सांगितले. पेपर ठेवून आपल्याला तीन लाख रुपये मिळत आहेत आणि आपली नड पूर्ण होतेय असा विचार करून त्याने त्या मित्राकडे पेपर ठेवले आणि तीन लाख रुपये घेतले. ज्यावेळी तो मित्र तीन लाख रुपये परत मागू लागला त्यावेळी दिनकरकडे पैसे नव्हते. यावेळीही त्या मित्रानेच त्याला एक युक्ती सुचविली की तुला मी बँकेचे लोन करून देतो. त्या लोनच्या पैशांतून तू माझे पैसे दे आणि बाकीचेे पैसे तुझ्याकडे ठेव.
दिनकरला वाटलं तर लोन होत असेल तर बरं होईल, आपलं कर्जही पूर्ण फिटेल आणि आपल्या घराचे पेपर मिळतील. आणि थोडे पैसे हातातही राहतील. म्हणून तो तयार झाला. त्या मित्राने त्याला एका रूम खरेदी-विक्री करणाऱ्या दलालाकडे नेले. दलालाने त्याचे पेपर बघितले आणि सांगितले की, याच्यावर लोन होणार नाही. तुमच्या बरोबर तिसऱ्या व्यक्तीला घेऊन कर्ज करावे लागेल. दिनकरलाही वाटलं की बँकेची काहीतरी प्रोसिजर असेल, तो तयार झाला. त्या दलालाने ज्याचं नाव सुधाकर होतं. या सुधाकरकडे मीना नावाची व्यक्ती रूम खरेदीसाठी आलेली होती. त्या मीनाला सुधाकरने या रूमबद्दल सांगताना हा रूम विकायचा आहे असे सांगितले. दिनकरला आणि मीनालाही अंधारात ठेवून त्या दलालाने रजिस्टर ऑफिसला जाऊन खरेदी-विक्रीचे रजिस्ट्रेशन करून घेतले आणि हेच पेपर समाजात मान्यता असलेल्या बँकेकडे जाऊन मोरगेज लोन करण्यात आले. पण दिनकर याला सोसायटीने रूम विक्रीसाठी जी परवानगी लागते, ती दिलेली नव्हती. कारण फक्त दिनकर यांनी लोन घ्यायचंय यासाठी सोसायटीमध्येे अर्ज केलेला होता, खरेदी-विक्रीसाठी केलेला नव्हता. कारण जेव्हा रूम विकला जातो त्यावेळी सोसायटीला सांगावे लागते. परवानगी घ्यावी लागते, जी त्यांने घेतलेली नव्हती. या सुधाकरने दिनकरकडून काही चेक घेतले होते. तीन लाख रुपये अगोदर दिनकर याला देण्यात आले होते, ते दिनकरने आपल्या मित्राचे तीन लाखाचं कर्ज होतं ते देऊन टाकलं आणि बँकेतून उरलेली रक्कम त्याच्या अकाउंटमध्ये आली आणि ते अकाउंटही दिनकरला नवीन काढायला सांगितलं गेलं होतं. ती बँकेची एक पद्धत आहे असं सांगितलं होतं.
त्या बँकेत उर्वरित रक्कम आल्यानंतर काही तासांमध्ये ती रक्कम सुधाकरला ट्रान्सफर झाली होती. हा काय प्रकार आहे हे दिनकरला कळलेच नाही. मी लोन मागितलं होतं मला लोनचे पैसे आले आणि परत सुधाकरकडे कसे गेले हे त्याला समजेना. रूम खरेदी केलेली मीना ही विरारला दोन महिन्यानंतर येऊ लागली. माझा रूम आहे खाली करा अशी ती धमकी देऊ लागली. दिनकरच्या बायकोला काही समजत नव्हतं, दिनकरलाही काही समजत नव्हतं कारण दिनकर बोलला की मी फक्त लोन घेतलेलं आहे, मी रूम विकलेला नाही. त्या व्यक्तीने खरेदी-विक्रीचा झालेला व्यवहार दिनकरला दाखवला. त्यावेळी दिनकरला धक्काच बसला. तो बोलला की मी लोन पाहिजे म्हणून गेलो होतो, रूम विकायला गेलो नव्हतो. मला तर रूम विक्री केलेल्याचे पैसे पण मिळाले नाहीत आणि माझं कुटुंब असताना मी कशासाठी विकू.
इकडे मात्र मीनाचे हप्ते जाऊ लागले होते. कारण तिने हा रूम विकत घेताना त्या रूमचे पेपर मॉर्गेज ठेवलेले होते आणि लोन केलेलं होतं. हा गोंधळ काय आहे हे मीनालाही कळले नाही आणि तिने हप्ते थांबवले. बँकेची लोकं आता दिनकरकडे हप्ते वसुलीसाठी येऊ लागली. दिनकरच्या बायकोला वाटलं नवऱ्याने कर्ज घेतलेले आहे म्हणून दोन-तीन हप्ते तिने फेडले. एक दोन वर्षे असंच चालू राहिलं. मीनाने हप्ते न भरल्यामुळे बँकेने तिच्याविरुद्ध केस केली आणि त्या सगळ्या नोटिसा मात्र विरारच्या रूमवर येत होत्या, जो रूम दिनकरचा होता आणि शेवटची नोटीस म्हणजे घर ताब्यात करण्याची आली. त्यावेळी मात्र दिनकरचे धाबे दणाणले आणि त्या धक्क्याने तो आजारी पडला.
त्याच्या पत्नीने आणि मुलाने त्याला अॅडमिट केल्यानंतर, घरातील सर्व घराचे कागदपत्र बघितले आणि शेजारच्या एका चांगल्या शिकलेल्या व्यक्तीला दाखवले. त्याने त्यांना समजावले आणि वकिलांचा सल्ला घेण्यास सांगितले. वकिलांना भेटल्यानंतर दिनकरच्या पत्नीला नेमकं काय प्रकार झाला आहे तो कळला. दिनकर यांना कर्ज पाहिजे होते आणि बँक कर्ज देते या हिशोबाने ते गेले होते. म्हणजे हे घराचे पेपर बँकेत ठेवल्यावर त्यांना कर्ज मिळेल असं त्यांना वाटलं होतं, पण सुधाकार नावाच्या दलालाने ते घर मीनाला विकलं आणि ते पेपर मॉरगेज ठेवून लोन केलं होतं. पण ते घर मीनाचंही होऊ शकलं नाही. कारण सोसायटीने कर्ज घेण्यासाठी एनओसी दिलेली होती; परंतु घर विक्रीसाठी नाही. त्यामुळे सोसायटीत अजूनही घर दिनकर यांचे नावे असलेले पुरावे होते. कारण अजूनपर्यंत दिनकर मेंटेनेस भरत होते. एवढेच नाही तर शेअर सर्टिफिकेटवरपण दिनकर यांचचं नाव होतं. कारण रूम विक्री झाल्यानंतर शेअर सर्टिफिकेटवर खरेदी करणाऱ्याचे नाव येतं; परंतु बँकेमध्ये जे सर्टिफिकेट देण्यात आलं होतं त्याच्यावर दिनकर यांचंच नाव होतं. जर खरेदी-विक्रीचा व्यवहार झालेला होता आणि त्या मीनाला जर कर्ज दिलं होतं तर शेअर सर्टिफिकेट दिनकरच्या नावाचं का? जोपर्यंत सोसायटी शेअर सर्टिफिकेट ट्रान्स्फर करत नाही तोपर्यंत मॉर्गेज लोन होत नाही. प्रॉपर्टी टॅक्सवर अजूनली दिनकर आणि दिनकरच्या पत्नीचं नाव आहे. शेअर सर्टिफिकेट अजूनही दिनकरच्या नावाचे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तो रूम अजूनही दिनकरच्या ताब्यात होता. कर्ज हे मीनाने घेतलेलं होतं आणि खरेदी-विक्रीसाठी ते दिनकर यांना देण्यासाठी घेतलेलं होतं. पण दिनकर यांच्या बँकेत आल्यानंतर ते ऑटोमॅटिकली सुधाकरच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर झालेलं होतं.
जे चेक सुधाकरला दिले होते ते दिनकरने बँकेला चेक द्यावे लागतात या समजुतीने दिले होते. या प्रकरणात मीना ही फसली होती. कारण तिला रूम विकली जातेय असं सांगितलं होतं आणि दिनकर याला लोन होतंय असं सांगितलं होतं. दोघांची बँकेचा अधिकारी आणि दलाल यांनी फसवणूक केलेली होती. कारण बँकेत मॉर्गेज करताना, जे प्रॉपर पेपर लागतात ते नसतानाही ते मॉर्गेज लोन झालेलं होतं आणि इकडे आलेली रक्कम परत सुधाकर या दलालाकडे गेलेली होती म्हणून दोघांनीही या दोघांची फसवणूक केलेली होती आणि आता हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे.
एखादा व्यवहार जर आपल्याला माहीत नसेल, तर समाजातील विकृत बुद्धीची लोक कशाप्रकारे सामान्य माणसाची फसवणूक करतात याचे हे जिवंत उदाहरण आहे आणि सामान्य लोकही अशा विकृत बुद्धीच्या लोकांच्या जाळ्यात अलगद फसतात आणि आयुष्याची पुंजी घालून बसतात. (सत्यघटनेवर आधारित)






