Thursday, May 9, 2024

शोध

  • कथा: रमेश तांबे

संध्याकाळची वेळ. बाजारपेठेतला प्रत्येक रस्ता गर्दीने नुसता फुलून गेला होता. फेरीवाले, दुकानवाले ग्राहकांशी संवाद साधत होते. कपड्यांची, बॅगांची, पुस्तकांची, विविध खाद्यपदार्थांची अनेक प्रकारची दुकाने गर्दीने नुसती फुलून गेली होती. मी देखील याच गर्दीतून फिरत होतो. गर्दीची विविध रूपं बघत होतो. फिरता फिरता खमंग बटाटावड्याचा वास नाकात शिरला, तशी माझी भूक चाळवली गेली. लगेच दुकानात जाऊन भले मोठे वडे घेतले अन् उभ्या उभ्याच खायला सुरुवात केली. आजूबाजूला बरेच लोक आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थांवर ताव मारीत होते. वडेवाल्याचा कामगारवर्ग पटापट हात चालवित होता. कळकट मळकट कपडे घातलेली काही लहान मुलं आशाळभूत नजरेने खाणाऱ्यांकडे बघत होती. हात पसरत होती. एक-दोन कुत्री कचऱ्याच्या डब्याशी झुंजत होती. काही लोक त्या मुलांना खायला देत होते, तर काही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते. दुकानदारांची माणसं त्या मुलांवर खेकसायची. त्यावेळी ती मुलं थोडा वेळ दूर पळायची. अन् पुन्हा येऊन लोकांपुढे हात पसरायची.

अशा वेळी एक नऊ-दहा वर्षांचा मुलगा दुरून एकटक माझ्याकडे पाहत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याची ती नजर माझ्या मनात कालवाकालव करून गेली. मी क्षणभर घास चावायचा थांबलो. कुणी गरीब मूल असं केविलवाण्या नजरेने आपल्याकडे पाहत असताना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खात बसणं मला इष्ट वाटेना. मी लगेचच त्याच्या जवळ गेलो अन् माझ्या जवळची वड्याची प्लेट त्याच्यापुढे केली. क्षणभर तोही गोंधळलाच, कारण त्याने काही माझ्यापुढे हात पसरला नव्हता. अन् तरीही मी त्याला वडा देऊ केला होता. क्षण-दोन क्षण असेच गेले. मग मीच म्हटले, ‘अरे घे ना!’ तर तो मुलगा म्हणाला, ‘नको , खरंच नको.’

मग पुस्तकाच्या दुकानाकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘काका एक पुस्तक द्याल?’ त्याची ही जगावेगळी मागणी ऐकून माझ्या अंगावर झर्रकन काटा आला. उरलेला वडा न संपवता तो तसाच पिशवीत ठेवला अन् त्या मुलासोबत पुस्तकाच्या दुकानात गेलो.

दुकान पुस्तकांनी गच्च भरलेलं होतं. तो तडक बालविभागाच्या दालनाकडे गेला. अन् दोन-तीन मिनिटांतच पुस्तक निवडले. पुस्तकाचे नाव होतं ‘स्वामी विवेकानंद’. किंमत होती पंधरा रुपये! त्या मुलाच्या कृतीने मला अचंबित होण्याची नाही, तर वेड लागायची पाळी आली होती. गोष्टींची, रंगीत चित्रांची, कार्टूनची पुस्तकं सोडून तो मुलगा ‘विवेकानंद’ वाचू पाहत होता. मी भानावर आलो, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवराय अशी आणखी चार-पाच पुस्तके मी स्वतः माझ्या हाताने निवडली अन् त्या मुलाच्या हातावर ठेवली. एका पुस्तकाऐवजी एवढी पुस्तकं मिळाल्यावर त्या मुलाचा चेहरा समाधानाने उजळून निघाला. पैसे भरेपर्यंत तो मुलगा पुस्तकं छाताशी अगदी घट्ट धरून उभा होता.

दुकानासमोरच्या मोकळ्या आवारात येताच मुलगा म्हणाला, ‘काका, नमस्कार करतो!’ असं म्हणून त्यानं चक्क माझ्या दोन्ही पायांना हात लावला अन् क्षणार्धात तो समोरच्या गर्दीत नाहीसा देखील झाला. झाल्या प्रकाराने मी अगदी गहिवरून गेलो होतो. डोळे भरून आले होते. डोळ्यांत जमा झालेल्या पाण्यामुळे समोरच्या गर्दीत त्या मुलाला शोधणं मला जमलंच नाही. त्याचं नाव काय, कुठं राहतो या साध्या गोष्टीदेखील विचारायच्या राहून गेल्या. आजही मी जेव्हा वडेवाल्याच्या दुकानासमोरून जातो, तेव्हा तेव्हा माझी नजर त्या मुलाला शोधत असते. पण, आज इतकी वर्षं लोटली तरी तो मुलगा मला परत कधीच दिसला नाही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -