Wednesday, May 8, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखरशिया आणि युक्रेन युद्ध चिघळणार...

रशिया आणि युक्रेन युद्ध चिघळणार…

रशियाची राजधानी मॉस्कोच्या एका बाह्य भागात आयसीसच्या दहशतवाद्यांनी भीषण असा हल्ला चढवला आणि त्यांच्या सुसाट गोळीबारात १३३ जण ठार झाले. रशियातील गेल्या काही वर्षांतील हा सर्वात भीषण हल्ला होता. गेल्या काही वर्षांपासून आयसीसच्या कारवायांत खंड पडला होता. पण कालच्या मॉस्कोवरील हल्ल्यातून आयसीसने आम्ही अद्यापही कार्यरत आहोत, हे सिद्ध केले आहे. एका रॉक बँडच्या कार्यक्रमात सारे रसिक गुंग झाले असताना अचानक अतिरेकी लष्करी गणवेषात आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात १३३ जण ठार झाले.

अमेरिकेने या हल्ल्यासाठी जिहादी तत्त्वे जबाबदार असल्याचे पुरावे दिल्यानंतरही रशिया आणि युक्रेन यांनी एकमेकांवर हल्ल्यासाठी आरोप केले आहेत. हल्लेखोरांना लगेच पकडण्यात आले आणि त्यातील चार जणांनी आपल्या दोषाची कबुली दिली आहे. रशियात अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची राजवट असल्याने काही हल्लेखोरांचा तुरुंगात छळ केल्याचा आरोप रशियन माध्यमांनी केला आहे आणि काहींचे चेहरे जखमांनी विद्रुप झालेले होते. चार हल्लेखोर युक्रेनला पळून जाताना पकडण्यात आले, असे पुतिन यांनी सांगितले, असल्याने युक्रेनने त्याचा जोरदार इन्कार केला आहे.

हा हल्ला नक्की कोणत्या दहशतवाद्यांनी केला असल्याचे समजले असले तरीही आयसीसची इतकी ताकद कशी वाढली याचा अचंबा जगाला वाटत आहे. मॉस्कोतील मैफल सुरू असताना तिचा शेवट रक्तबंबाळ अवस्थेत व्हावा, यामुळे अवघ्या जगाला धक्का बसला आहे. हल्ला झाल्यावर लगेच रशियाने आणि पुतीन यांनी युक्रेनवर या हल्ल्याची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील सध्या सुरू असलेला संघर्ष अत्यंत अधिक विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांना युक्रेनमध्ये सेफ पॅसेज मिळण्याची शक्यता पुतिन यांनी लगेच व्यक्त केली आहे. मॉस्को हल्ल्यानंतर दोन काळजीचे प्रमुख मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यातील पहिला हा आहे की, दहशतवादी संघटना ज्या सरकारच्या पाठिंब्याशिवाय राजकीय लाभासाठी दहशतवादी कृत्ये करत आहेत, त्या अगोदरच अस्तित्वात असलेला संघर्षाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करू शकतात आणि त्यामुळे त्यांना आवश्यक ते माध्यमांचे लक्षही वेधून घेता येते. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या दहशतवादी संघटना अस्तित्वात असलेला संघर्ष जसे की रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी भडकवू शकतात. अनेक देश सब स्टेट संस्था किंवा व्यक्ती यांचा उपयोग करून आपली उद्दिष्टे साध्य करतात. त्यासाठी अशा दहशतवादी संघटनांचा उपयोग करतात. रशिया आणि युक्रेनने हेच भूतकाळात केले आहे.

मॉस्कोतील ताज्या हल्ल्यांमुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातील सध्याचा संघर्ष आणखी भडकण्याचा धोका आहे आणि तोच जास्त गंभीर आहे. अगोदरच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. पुतिन या हल्ल्याचा उपयोग युक्रेनविरोधात आणखी तीव्र हल्ले करण्यासाठी वापर करणार, याची धास्ती जगाला पडली आहे. कारण या हल्ल्याचा तोच परिणाम आहे. ब्रिटनने तर रशियाला हल्ल्याचा उपयोग करून युक्रेनमध्ये तीव्र हल्ले करू नका, असे आवाहन केले आहे. अर्थात रशिया किंवा पुतिन ते कितपत गांभीर्याने घेतात, यावर सारे पुढील भवितव्य ठरणार आहे. कारण पुतिन यांनी या अगोदर युक्रेनविरोधात युद्ध थांबवण्याचे आवाहन केले होते आणि ते पुतिन यांनी कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिले होते. त्यामुळे हे आवाहन तरी ते गांभीर्याने घेतील, अशी शक्यता नाहीच.

ब्रिटनने पुतिन यांना सक्त इशारा दिला आहे की, युक्रेनविरोधातील युद्ध आणखी तीव्र करण्यासाठी या हल्ल्याचा उपयोग करू नका. युक्रेन पकडलेल्या हल्लेखोरांना आपल्या देशात पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहे, असे पुतिन यांनी काल राष्ट्राला दिलेल्या संदेशात म्हटले होते. पुतिन यांनी हल्लेखोरांसाठी ‘नाझी’ हा शब्द वापरला जो रशिया सहसा युक्रेनियनसाठी वापरतो. याचा अर्थ उघड आहे की, आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी तीव्र होणार आहे. कारण पुतिन हे जगाने कितीही आवाहन केले तरीही या हल्ल्याचा उपयोग अधिक जोमाने लढण्यासाठी करणार आहेत.

रशियन अध्यक्ष पुतिन हे या हल्ल्याचे खापर युक्रेनवर फोडण्यासाठी अत्यंत उतावीळ झाले आहेत. अर्थात याचे कारण उघड आहे. पुतिन यांना युक्रेनविरोधात कांगावा करून आणखी तीव्र आणि जबरदस्त हल्ले करण्यासाठी कारण हवेच होते. ते त्यांना आयसीसच्या दहशतवाद्यांनी दिले आहे. शिवाय रशियात पुतिन यांचे जे विरोधक आहेत त्यांचा आवाज दाबण्यासाठी हा हल्ला त्यांना वापरता येणार आहे. युक्रेनचा या हल्ल्याशी संबंध आहे की नाही, त्याचे पुरावे अद्याप समोर आले नाहीत. पण काही रशियन माध्यमे युक्रेन यात गुंतल्याचे डीप फेक व्हीडिओ व्हायरल करून पुतिन यांना आणखी भयानक हल्ले करण्यासाठी समर्थन पुरवत आहेत.

रशियातील हल्ला असा जगासाठी भयंकर धोकादायक ठरणार आहे. कारण युक्रेनने हल्लेखोरांना मदत केली की नाही, ते समजले नसले तरीही या हल्ल्याची किंमत युक्रेन मोजणार आहे. अनेक देशांनी अशीच भीती व्यक्त केली आहे की, हल्ला रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी भडकण्यासाठी कारण म्हणून वापरला जाऊ नये. त्यांची भीती सार्थ आहे कारण पुतिन यांचा आतापर्यंतचा इतिहास तसाच आहे. रशियाची स्थिती आता जास्त स्फोटक आहे आणि सारे जग आता पुतिन यांच्या पुढील निर्णयावर बसले आहे. केव्हा युरोपात भयंकर भडका उडेल, हे सांगता येणे अवघड आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -