Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीRajesh Kumar : छोटा पडदा गाजवणारा अभिनेता ५ वर्षांपासून रमलाय शेती करण्यात

Rajesh Kumar : छोटा पडदा गाजवणारा अभिनेता ५ वर्षांपासून रमलाय शेती करण्यात

‘मी समाजासाठी काय केलं?’ म्हणत शेतीची धरली वाट…

पाटणा : असं म्हणतात, की एकदा चेहर्‍याला रंग लागला की पुन्हा माघार घेणं कठीण असतं. अभिनय क्षेत्राकडे पाऊल वळल्यानंतर दुसर्‍या क्षेत्राकडे वळणारी माणसं फार कमी पाहायला मिळतात. मात्र, छोटा पडदा गाजवणार्‍या एका प्रसिद्ध अभिनेत्याने हा धाडसी निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून थोडी विश्रांती घेत तो शेती करण्यात रमला आहे. हा अभिनेता म्हणजे ‘साराभाई वर्सेज साराभाई’ (Sarabhai Vs Sarabhai) या छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेतील रोशेसच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा राजेश कुमार (Rajesh Kumar).

सध्या राजेश कुमार बिहारमध्ये त्याच्या गावी शेती करत आहे. आपल्या या निर्णयाबद्दल एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, “२०१७ मध्ये छोट्या पडद्यावर मी राज्य करत होतो. त्यावेळी मी शेती करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मनात सतत एक प्रश्न सतावत होता की, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याव्यतिरिक्त पुढील पिढीसाठी मी काय करत आहे?समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या विचाराने खरं तर मी शेती करण्याचा निर्णय घेतला”.

राजेशने सांगितलं की, “अभिनेता असताना मी कोणतंही सामाजिक काम करत नव्हतो. माझी मुलं मला कशी लक्षात ठेवतील? अभिनय करणं हा माझा स्वार्थ होता. पैसे कमावणं हा त्यामागचा हेतू होता. पण लोक मला लक्षात ठेवतील असं काम मी करत नव्हतो. त्यामुळे मी गावी जाऊन पुन्हा एकदा शेती करण्याचा निर्णय घेतला”, असं राजेश म्हणाला.

पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात सक्रिय

दरम्यान, राजेश कुमार आता पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात सक्रिय झाला आहे. यावर्षात ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘हड्डी’ या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. शिवाय काही दिवसांपूर्वी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या सिनेमात तो झळकला होता. याआधी तो मेरी फॅमिली, कोटा फॅक्ट्री सारख्या अनेक कलाकृतींचा भाग राहिला आहे. ‘साराभाई वर्सेज साराभाई’ या मालिकेसह ‘यम किसी से कम नहीं’, ‘नीली छतरी वाले’, ‘ये मेरी फॅमिली’, ‘भूत राजा और रॉनी’ या कार्यक्रमांतदेखील राजेश कुमारने काम केलं आहे. त्याने आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात २००१ मध्ये प्रसारित झालेल्या ‘के कुसुम: एक आम लडकी की कहानी’ या मालिकेच्या माध्यमातून केली. त्यानंतर छोट्या पडद्यावर त्याचा प्रवास सुसाट सुटला. आज राजेश कुमारचा समावेश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांचा यादीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -