Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाराजस्थानचे लक्ष्य टॉप-२

राजस्थानचे लक्ष्य टॉप-२

आज तळातील चेन्नईशी आमना-सामना

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल चा १५वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. लीगच्या शेवटच्या आठवड्यात २ संघ प्लेऑफमध्ये पोहोचल्याने अन्य २ संघ कोणते असतील? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यातच शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.

चेन्नई आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि आपला शेवटचा सामना औपचारिकता म्हणूनच खेळणार असल्याचे दिसते. पण राजस्थानसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या १६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेला राजस्थान आज टॉप-२ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल. दुसरीकडे, चेन्नईला या हंगामाचा सन्मानपूर्वक आणि आनंददायी शेवट करायला निश्चितच आवडेल. त्यामुळे तेही विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने संपूर्ण हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. मध्यंतरी संघाला दोन सलग पराभव पत्करावे लागले होते, परंतु असे असतानाही राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमधील स्थान सध्यातरी निश्चित असल्याचेच दिसत आहे. कारण १६ गुणांवर येऊन दुसरा कोणताही संघ रॉयल्सला स्पर्धा देताना दिसत नाही. पण हा सामना जिंकून आता संजू सॅमसनच्या नजरा पॉइंट टेबलमध्ये नंबर दोनचा संघ बनण्यावर असतील.

बुधवारच्या सामन्यात कोलकाताचा पराभव करून, लखनऊने १८ गुणांची कमाई केली आणि नंबर दोनचे स्थान मिळविले आहे. आता चेन्नईला हरवल्यास राजस्थान रॉयल्स १८ गुणांवरच येईल; परंतु राजस्थानचा नेट रनरेट लखनऊपेक्षा चांगला आहे. त्यामुळे ते दुसऱ्या स्थानासाठी दावा करू शकतात. प्लेऑफच्या स्वरूपानुसार, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जे संघ टॉप-२ मध्ये स्थान मिळवतात त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त २ संधी मिळतात. राजस्थानचा सध्याचा गोलंदाजी आणि फलंदाजीतील फॉर्म बघता त्यांना विजय मिळवणे अवघड वाटत नाही. ऑरेंज कॅप होल्डर जोस बटलरवर रॉयल्सच्या फलंदाजीची भिस्त आहे. सोबत कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल यशस्वीपणे फलंदाजी करत आहेत आणि गोलंदाजीही सर्वोत्तम आहे.

दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज शेवटच्या सामन्यात विजय मिळवून त्यांच्या चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करेल. या वर्षी चेन्नई संघासाठी अनेक गोष्टी त्यांच्या विरुद्ध गेलेल्याच दिसल्या आहेत. या वर्षी पहिल्यांदाच या फ्रँचायझीला मध्येच पुन्हा कर्णधार बदलावा लागला; परंतु असे सर्व प्रयत्न करूनही त्यांना फायदा झाला नाही.

यंदाचा हंगाम म्हणजे चेन्नई सुपर किंग्जसाठी भविष्यासाठी नवीन खेळाडूंना तयार करण्याची संधी आहे. अर्थात त्यांना यामुळे युवा गोलंदाज मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि मतिशा पाथिराना यांच्यासारखे खेळाडू मिळाले आहेत. आता या वर्षातील शेवटच्या सामन्यातही सुपर किंग्जला युवा खेळाडूंना आजमावता येऊ शकते; परंतु यंदाच्या या शेवटच्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला नक्कीच जिंकायला आवडेल.

त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा सामन्यावर अनेकांच्या नजरा आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ या स्पर्धेत २५ वेळा आमने-सामने आले आहेत. या २५ सामन्यांपैकी चेन्नईने १५ सामने जिंकले आहेत, तर राजस्थानने १० सामने जिंकले आहेत. हेड टू हेडनुसार, चेन्नईचा वरचष्मा दिसत असला तरी या वर्षी राजस्थान रॉयल्सने चांगली कामगिरी केली आहे. हे सर्व पाहता राजस्थान रॉयल्ससाठी जिंकण्याचे समीकरण सोपे आहे. एक सामना बाकी असताना, चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवल्यास ते दुसरे स्थान मिळवून आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचतील.

ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -