Wednesday, May 1, 2024
Homeमहत्वाची बातमीNarayan Rane : भाजपशी गद्दारी करणाऱ्यांनी हिंदुत्व हा शब्दही उच्चारू नये

Narayan Rane : भाजपशी गद्दारी करणाऱ्यांनी हिंदुत्व हा शब्दही उच्चारू नये

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (Narayan Rane) उद्धव ठाकरेंना खडसावले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मोदी-शाहांच्या नावांचा वापर करून मते मिळवली, सत्तेची फळे चाखली, नंतर भाजपशी गद्दारी करून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली नाही. हिंदुत्वाची गद्दारी करून ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गेले. त्यांनी यापुढे हिंदुत्व हा शब्दही उच्चारायला नको, असे खडेबोल केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरेंना सुनावले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जो आदर होता तो उद्धव ठाकरेंना आहे का? ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकारच नाही. सावरकरांवर बोलणारे ते राहुल गांधी येथे येऊन गेले. आदित्यला मिठी मारून गेले. तेव्हा आदित्य काय म्हणाले हे कळले नाही. कदाचित वेल्डन… म्हणाले असतील. कारण पिल्लू आहेत ते… काहीही बोलू शकतात, अशी टीकाही नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

यांची सत्ता गेली. त्यामुळे यांना पोटदुखी झाली. ही निराशा आहे. त्यापोटी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीवर वाट्टेल ते आरोप करत सुटले आहेत. यावर आता उद्धव ठाकरेंनी आवर घालावा. नाही तर आम्ही त्यांच्या हातात कधी कधी काय काय दिले, याचा तपशील जाहीर करू आणि ती वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. शिंदे- फडणवीस यांचे सरकार कसे काम करते ते बघा. किती योजना ते आणत आहेत ते बघा. तुम्ही अडीच वर्षांत काय केले? मेट्रो, ब्रिज अशा सगळ्या कामांना स्थगिती दिली आणि मग एकेकांना बोलावले. तेव्हा काय घेतले? असा सवाल त्यांनी केला. हा सगळा तपशील ईडीकडे आहे. ईडी कसा गेम करतो हे त्या संपादकांना विचारा. संजय राऊत सगळे काही सांगतील, असे राणे म्हणाले.

राज्यपालांच्या कथित वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र बंद करू असा इशारा दिला आहे. ताकद आहे का? राष्ट्रवादीला बोलव, काँग्रेसला बोलव, त्या प्रकाश आंबेडकरांना घे… आता या गोष्टी कराव्या लागतात. शिवसैनिक आहेत कुठे सोबत? दुकानात नाही माल आणि मार्केटिंग करायला निघाले. वैचारिक क्षमता नाही, बौद्धिक क्षमता नाही. आक्रमकता नाही. शिवसेना राहणार कशी, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सध्या चाललेल्या वादावर बोलताना संजय राऊत यांनी आपण शहीद व्हायला तयार असल्याचे सांगितले. किती वेळा होणार शहीद? दर आठवड्याला शहीद होतात… नेहमी म्हणतात, मी मरायला तयार आहे. कोण मारणार? कोणाला तुमचा जीव हवा आहे. हां… उद्धव ठाकरेंना तुम्ही नको असाल तर गोष्ट वेगळी… रमेश मोरे यांचे काय झाले? जया जाधवचे काय झाले? माझा, एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न फसला. आम्ही पुरून उरलो. तेव्हा सांभाळायचे असेल तर उद्धव ठाकरेंपासून सांभाळा, असेही नारायण राणे म्हणाले.

सोडून गेलेल्या आपल्या सहकाऱ्यांना हे रेडे म्हणतात. काय म्हणता… तुम्ही मुख्यमंत्री होताना… तेव्हा मातोश्रीवर याच रेड्यांना मिटिंगला बोलवत होता का? मग, या रेड्यांचे कॅप्टन तुम्ही… ठीक आहे. वैचारिक भिन्नता असते. नाही पटले सोडून गेले. म्हणून काय वाट्टेल ते बोलायचे असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी सीमा प्रश्नावर बोलताना बेळगाव-कारवार देत असाल तर कर्नाटकाला काही गावे देण्याबाबत विचार करता येईल, असे भाष्य केले. काय म्हणताय तुम्ही? चार वेळा मुख्यमंत्री होता ना… भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राची एक इंचही जागा कर्नाटकाला सोडा… इतर कोणत्याही राज्याला जाऊ देणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन

केंद्र सरकारच्या औद्योगिक प्रोत्साहन व अंतर्गत व्यापार खात्याने नुकतीच परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली. महाराष्ट्रात देशात सर्वांधिक म्हणजे ६२,४२५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे. त्यानंतर कर्नाटकात ४१ हजार कोटी व गुजरातमध्ये २६ हजार कोटींची गुंतवणूक झाली. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन आहे, असे नारायण राणे यांनी आकडेवारी देऊन स्पष्ट केले.

दिशा व सुशांत यांची हत्याच

दिशा सॅलियन व सुशांतसिंग राजपूत यांची हत्याच झाली आहे. त्यांच्या मृत्यूचा तपास सुरू आहे. आमच्याकडे आलेले पुरावे आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवले आहेत, असे नारायण राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

संबंधित बातम्या…

दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणाची फाइल पोलिसांकडून गायब

दिशा सालियनला ८ जूनच्या रात्री पार्टीतून घरी घेऊन गेलेली ती कार सचिन वाझेची?

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

राज ठाकरेंकडून आघाडी सरकारचा पंचनामा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -