Wednesday, May 8, 2024
Homeअध्यात्मनामात राहणे हा सरळ मार्ग आहे

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे

  • ब्रह्मचैतन्य, श्री गाेंदवलेकर महाराज

एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते.

एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे. नुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे. नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.

खरोखर, नाम किती निरूपाधिक आहे! आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. विलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो. तिथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते फार लांब आहे. शिवाय, वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे. तेव्हा, पायाला श्रम न होऊ देता, आपल्याला बुडू न देता, समुद्राचे पाणी पायाला न लागता, समुद्रपार नेणारी जशी आगबोट आहे, त्याचप्रमाणे भगवंताकडे पोहोचविणारे त्याचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय, प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात, तो त्यांपैकी कोणत्याही नावाला ‘ओ’ देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ‘ओ’ देतो. निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदीपत्रातल्या नामनिर्देशाने मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर, नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे. आपण सर्वांनी ‘मी भगवंताकरिता आहे’ असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामात राहावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -