Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराणेंच्या झंझावाताने उबाठा सेनेला कापरे...

राणेंच्या झंझावाताने उबाठा सेनेला कापरे…

कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराने मतदारसंघ ढवळून निघाला आहे. राणे यांना दोन्ही जिल्ह्यांत जो अफाट प्रतिसाद मिळाला, त्याने उबाठा सेनेचे धाबे दणाणले आहेत. कोकणातून उबाठा सेनेचे अस्तित्व या निवडणुकीत पुसून जाणार, या कल्पनेनेच मातोश्रीला कापरे भरले आहे. खरं तर कोकण हा शिवसेनेचा वर्षानुवर्षे बालेिकल्ला म्हणून ओळखला जात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोकणासीयांचे दैवत होते व आजही कोकणातील जनतेच्या हृदयात त्यांना स्थान आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळेच कोकणातील मतदार उबाठा सेनेपासून दूर गेला आहे. कोकणात शिवसेना घराघरात पोहोचविण्यात राणे यांचे योगदान मोठे आहे. पण उद्धव यांनी ते कधी खुल्या मनाने मान्य केले नाही. केवळ स्वत:भोवती असलेल्या खुशमस्कऱ्यांवर विश्वास ठेवून, ते पक्ष चालवत असल्याने, सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ केव्हाच तुटली आहे. दुसरीकडे स्वत: नारायण राणे, त्यांचे दोन्ही पुत्र निलेश व नितेश हे सदैव लोकांमध्ये मिसळून असतात. त्यांचे दरवाजे लोकांना खुले असतात. राणे परिवार कोकणातील जनतेच्या सुख-दु:खात नेहमी सहभागी असतो. म्हणून आपले दादा ही भावना कोकणवासीयांमध्ये आहे. कुठे राणे यांचा जनसंपर्क व कुठे उबाठा सेनेचा कारभार यात जमीन- अास्मानाचा फरक आहे. म्हणूनच राणेंना प्रचंड मताधिक्य देऊन, लोकसभेत पाठविण्याचा निर्धार मतदारांनी यावेळी केला आहे.

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा विदर्भात पहिला टप्पा झाला, तेव्हा पाच मतदारसंघांत मतदान झाले. त्यात उबाठा सेनेचा उमेदवार नव्हता. दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली व परभणी मतदारसंघांत उबाठा रिंगणात आहे. कोकणातील मतदान झाले की, लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई परिसरातील ११ मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होणार आहे. कोकण आणि मुंबई यांचे नाते घट्ट आहे. कोकणातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील कोण ना कोण तरी नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत असतो. म्हणूनच मुंबईत जे घडते, त्याचा परिणाम कोकणात होतो आणि कोकणात जे घडते, त्याचे पडसाद मुंबईत उमटतात.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणूक मुंबईतील मतदारसंघांसाठी महत्त्वाची आहे. सन २०१९ प्रमाणेच यंदाही मुंबई कोकणात मोदींचीच लाट आहे. नारायण राणे यांना मोदींनी आपले दूत म्हणून कोकणात उमेदवार म्हणून उभे केले आहे. “भाजपाच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत.” असे स्वत: मोदींनी अनेकदा स्पष्ट केले आहे. ‘अब की बार ४०० पार’ हा संकल्प साध्य करण्यासाठी कोकणातील मतदारांनी राणे यांना मत द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकसभेत भाजपाचे ३७० उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी कमळ चिन्हावर बटण दाबावे, असे राणे यांनी केलेल्या आवाहनाला मतदार निश्चितच प्रतिसाद देतील व कोकणातून प्रथमच भाजपाचा खासदार प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर निवडून जाईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

गेले महिना-दीड महिना नारायण राणे यांच्या प्रचाराने महायुतीच्या कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळाली आहे. राणे जातील तिथे मिळणाऱ्या जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादाने उत्साहाला उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांनी मताधिक्य मोठे वाढणार, असे वातावरण आहे. अमित शहा यांनी तर त्यांच्या सभेत उबाठा सेनेचे व त्यांच्या नेतृत्वाचे अक्षरश: वस्त्रहरण करायचे बाकी ठेवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उबाठा सेना म्हणजे नकली सेना असे संबोधून ठाकरेंची अगोदरच खिल्ली उडवली. त्यानंतर अमित शहा यांनी नारायण राणे, एकनाथ शिंदे व राज ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत, असे जाहीर करून उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

प्रत्येक सभेत उद्धव ठाकरे हे आपण शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आहोत, त्यांचे रक्त आपल्या अंगात आहे, असे सांगून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. ते त्यांचे पुत्र असले तरी त्यांच्या विचारांचे वारसदार हे राणे, शिंदे व राज ठाकरे हेच आहेत, ही लोकांच्या मनातील भावनाच अमित शहा यांनी कोकणच्या भूमीवर बोलून दाखवली. २५ वर्षे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अविभाजित शिवसेनेने भाजपाशी युती ठेवली होती; पण केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने ही युती तोडली व तेव्हापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव यांना जवळचे वाटू लागले. उद्धव यांची रत्नागिरी व कणकवली येथे सभा झाली. या सभांमध्ये त्यांनी नारायण राणेंवर टीका करताना, जी शिवराळ भाषा वापरली, ती ऐकून कोकणी माणसाची मान खाली गेली. लाज वाटली पाहिजे, आडवा करीन, गाडून टाकीन अशी भाषा वापरून मते कशी मिळतील? राणेंना शिव्यांची लाखोली वाहून मते वाढणार नाहीत, तर कमी होतील, हे सांगायला सुद्धा ठाकरेंच्या जवळ कोणी नाही.

कोकणातील विकास प्रकल्पांना सतत विरोध करायचा, विमानतळ असो किंवा रिफायनरी, प्रत्येक प्रकल्पाला विरोध करून कोकणातील तरूण मुलांना काय बेरोजगार ठेवायचे का? भाजपा नेत्यांवर गरळ ओकून काही साध्य होणार नाही, ‘अब की बार भाजपा तडीपार’ म्हणून मतदार उबाठा सेनेला साथ देणार नाहीत. विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. ठाकरेंच्या शिव्या-शापांना कोकणातील मतदार बळी पडणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -