Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिककोलाजKonkan : श्री क्षेत्र परशुराम

Konkan : श्री क्षेत्र परशुराम

कोकण (Konkan) भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे. प्रत्यक्षात गुजरातपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमी आहे. कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते.

असं म्हणतात की, कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.

आज अनेक ठिकाणी समुद्र हटवून बांधकामं होतात आणि त्याला आपण ‘रिक्लेमेशन’ म्हणतो. याच परिभाषेत बोलायचं झालं तर रिक्लेमेशनचा निर्माता म्हणून भगवान परशुरामांकडेच पाहावं लागतं. त्यांनी समुद्र हटवून कोकण प्रदेश निर्माण केला. येथील भूमी लागवडीयोग्य बनवली. म्हणूनच शेतीमधले क्रांतिकारक संशोधनही त्यांनीच केल्याचे मानता येईल. परशुरामांच्या काळात यज्ञाला प्रतिष्ठा मिळाली. यज्ञ म्हणजे अग्निपूजा. म्हणूनच अग्नीचे आद्य संशोधक म्हणूनही त्यांच्याकडेच पाहिलं जातं. त्यांनीच येथील शेतीला आकार दिला. हजारो वर्ष समुद्राच्या अंमलाखाली असलेल्या या जमिनीचा खारपणा कसा घालवायचा? जमिनीचा पोत कसा सुधारायचा? याचे धडे येथील जनतेला दिले. या प्रदेशाला सधनता बहाल केली. परशुरामाने निर्माण केलेल्या या लाल मातीची ख्याती सर्वदूर होत असतानाच आपल्याकडची  भूमी हिरावून घेतल्याचे दु:ख सागराला होतेच. येथील अनेक जीवांना यमसदनी धाडत भार्गवरामांनी कोकणचे जनजीवन सुरळीत केले असले तरी या भूमीचा आक्रोश होताच. याचा परिणाम हा या भूमीला भोगावा लागला. प्राक्तनाच्या ओझ्याचा शाप माथी घेऊनच कोकण वावरू लागले आहे.

विष्णू पुराणात जग कल्याणासाठी भगवान विष्णूंनी दहा अवतार घेत समाजमनात एक सृष्टी निर्माण केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन असे पहिले पाच अवतार. पाचवा अवतार म्हणजे वामन हा जरी मनुष्यावतार असला तरी तो अपूर्णावस्थेतील मानला जातो. त्यादृष्टीने पूर्ण मानव म्हणून भगवान विष्णूंनी जो सहावा अवतार घेतला, तो भगवान परशुरामांचा.

एका कथेप्रमाणे माता रेणुका हिच्यावर शस्त्र फिरविल्यानंतर परशुरामांना पश्चाताप झाला. त्यांनी तब्बल २१ वेळा पृथ्वी निशस्त्र केली, याबाबतच्या अनेक पुराणकथा आपल्याला माहितीच आहेत. परशुरामांनी हा पराक्रम गाजवला असला तरी त्यांचा मूळ पिंड ऋषींचाच होता. त्यामुळे भानावर आल्यावर त्यांना आपल्या हातून नरसंहार घडल्याचा पश्चाताप झाला. मग पापाचं परिमार्जन करण्यासाठी जिंकलेली सगळी भूमी कश्यप ऋषींना दान देऊन परशुराम तपश्चर्येला निघाले. कश्यप ऋषींना दान दिलेली भूमी त्यांच्या मालकीची झाली. एकदा दान केलेल्या भूमीवर आपला हक्क नाही, म्हणून मग तपश्चर्या करायची कोठे? मनात एकच विचार, आपण प्रतिसृष्टी निर्माण करायची. आपला स्वत:चा प्रदेश असणे आवश्यक आहे. आपल्याला नवनिर्माण करणे गरजेचे आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची दैवी ताकद असणारे परशुराम आर्यावर्ताचा प्रदेश पावलोपावली मागे टाकीत दक्षिणेकडे आले. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अरबी समुद्राच्या फेसाळ लाटा आदळत होत्या. या धवल फेसाळ लाटातून संपूर्ण आर्यावर्त प्रदेश अरबी समुद्राला जणू काय आव्हानच होते.

वाशिष्ठीच्या शीतल जलाने आणि महेंद्रगिरी पर्वताने परशुरामांना मोहित केले. या प्रदेशात परशुरामांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा मनोमनी निश्चय केला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना सतत धडक देणाऱ्या अरबी समुद्राला त्यांनी आपणास थोडासा भूप्रदेश दे अशी विनंती केली. पण गर्विष्ठ सागराने त्यांची विनंती अव्हेरली. उन्मत्तपणे त्याच्या फेसाळ लाटा सह्याद्रीच्या छाताडावर आदळत होत्या. परशुराम चिडले. आपले धनुष्य उचलले. प्रच्यंताला बाण लावला आणि महेंद्रगिरी पर्वताच्या पठारावरून अरबी समुद्रावर सोडला. असे चौदा बाण त्यांनी समुद्रावर सोडले. अरबी समुद्र उत्तरेकडील कच्छपासून कन्याकुमारीपर्यंत पाच-सहा योजने मागे सरकला आणि त्यातून प्रवाळयुक्त लाल जमीन वर आली. सहा योजने रुंद आणि चारशे योजने लांब असा प्रदेश निर्माण झाला. या प्रदेशास परशुरामांनी आपल्या आईच्या कोकणाईच्या नावावरून या अपरांत प्रदेशाचे नाव ‘कोकण’ ठेवले.

वाशिष्ठी नदीच्या काठावर चिपळूण-गुहागर येथे पहिली आर्य संस्कृती वसली. ही संस्कृती विकसित होत असतानाच परशुरामांचे पिता जमदग्नी यांनी वनौषधीचा लावलेला शोध आणि त्यातून निर्माण करण्यात आलेली वनौषधी सह्याद्रीच्या डोंगरकपारीत प्रसारित केली, तर हिमालयाच्या प्रदेशात निर्माण झालेली साळी. हे भात आजचे आपले प्रमुख अन्न ठरले आहे. हे साळीचे भात परशुरामांनी आपल्या कोकण प्रांतात आणले तिची लागवड केली.

त्रेता युगातील वास्तू विशारद असलेले महामुनी भृगू! तत्कालीन नगररचना, पाणीसाठे, करणे, सह्याद्रीच्या कुशीतून वाहणारे निर्मळ झऱ्याचे पाणी लहान लहान बांध घालून अडविण्याची पद्धती भृजूसहितेतील. तर मातीची कौलारू चौकाची घरे, घराच्या समोर अंगण आणि त्या अंगणात दररोज दर्शन घ्यावे लागणारे वृंदावन, घराच्या सान्निध्यात केळी, पोफळी, बागबगीचा असावा ही भृगू संहितेतील नगररचनाही त्यांनीच या प्रदेशात साकारली. हेच कोकणचे वैशिष्ट्य आहे. याच भूमीतील महिंद्र पर्वतावर परशुरामांनी आपली तपश्चर्या केली. हा महिंद्र पर्वत म्हणजे आताचे चिपळूण तालुक्यातील परशुराम मंदिर जेथे आहे, तो परिसर असल्याचे मानले जाते. परशुराम चिरंजीव आहेत त्यामुळे ते रोज सकाळी तीर्थयात्रेला जातात आणि संध्याकाळी या ठिकाणी परत येतात अशी समजूत आहे. परशुराम यांच्याबद्दल ब्रिटिश अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यांमधून थोडी वेगळी माहिती पुढे येते.

एकेकाळी या भागामध्ये नाग वंशीयांची दाट वस्ती होती. मात्र जंगलातील हिंस्त्र श्वापदे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटा यामुळे हा समाज भयभीत होता. सततच्या या भीतीमुळे त्यांनी देवाचा धावा सुरू केला. त्यांची हाक ऐकून भगवान परशुरामांनी त्यांना अभय दिलं आणि त्यांच्यासाठी कायम इथेच वास्तव्य केलं, असे क्रॉफर्ड नावाच्या एका ब्रिटिश गव्हर्नरने आपल्या ‘लिजेंड्स ऑफ कोकण’ या पुस्तकात नमूद केले आहे. पुराणातील कथा, इतिहास संशोधक यांची, शापवाणीबाबत अनेक मतमतांतरे आहेत. मात्र, एक खरे की, कोकणची संपन्नता, प्रगल्भतेचा इतिहास पाहता या शापवाणीचा ग्लोबल युगातही प्रत्यय येतो. काहीसा आध्यात्माचा भाग सोडला अथवा गृहीत धरला तरीही, परशुरामाने कोकण हे आपल्या क्रोधातून समुद्राला हटवून निर्माण केले.  यामुळे क्रोधाप्रमाणे लाल रंगाची माती असलेली भूमी पुढे आली. या भूमीत जेव्हा आदिशक्तीचे आगमन झाले तेव्हा या भूमीची तप्तता पाहून ती अस्वथ्य झाली. संतापून आदिशक्तीच्या मुखातून ‘जळो ते कोकण’ असे नकळत शब्द निघाले. मग काय साक्षात आदिमायेची वाणी शाप बनून कोकणावर कहर बरसवू लागली. कोकण जळू लागले. प्रकृतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले. घडलेला प्रकार पाहून सर्व देवतांनी आदिमायेला विनवणी केली. मातेने या भूमीला ‘जळो पण पिको’ असा उपशाप दिला. आजही कोकणात याची अनुभूती पाहायला मिळते. कोकणातील शेती करण्याआधी शेताचे भाग जाळले जातात, मगच त्यात पीक घेतले जाते. अशी एक कथा सांगितली जाते? तर दुसरी एक पुराणकथा आहे.

संपन्न कोकण केल्यानंतर परशुरामाने येथील जनतेचा निरोप घेतला. या दरम्यान त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती. निघतेवेळी भगवानांनी एक महामंत्र दिला. संकटसमयी हा मंत्र म्हणावा. मी प्रकट होईन असे सांगितले. संपन्नता असल्यामुळे जनता आनंदित होती. अशा वेळी भगवानांनी सांगितलेला मंत्र खरा आहे का नाही, याची खात्री करण्यासाठी या भूमीतील काही मंडळी एकत्र होऊन गाऊ लागली. भगवान प्रकट झाले. संकट काय म्हणून विचारू लागले. यावेळी जनता हसू लागली. भगवान आम्हाला संकट कोणतेच नाही. तुम्ही हा मंत्र दिला तो खरा आहे की नाही, हे पाहायचे होते. असे सांगताच परशुराम क्रोधीत झाले. त्यांनी येथील जनतेला शाप दिला. तुम्हाला एकत्र येणे यापुढे संगनमताने जमणार नाही आणि उत्कर्षाचा उपभोग घेता येणार नाही.संपन्नता असूनही कोकणचे असलेले चित्र पाहता, या परशुरामाची सातत्याने पुन्हा पुन्हा जाणीव होते. हे सत्त्व आजही या भूमीत पाहायला मिळते.

चिपळूण तालुक्यातील क्षेत्र परशुराम चिपळूणपासून १० कि.मी. अंतरावर आहे. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचे संदर्भ आढळतात. हे मंदिर ३०० वर्षापूर्वीचं आहे. मंदिरात काळ, काम आणि परशुराम अशा तीन मूर्ती आहेत. देवळातच बाहेरच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. हा मारुती दक्षिणाभिमुख आहे. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात दक्षिणाभिमुख मारुतीची स्थापना केली. बहुधा शिवछत्रपतींबरोबर भगवान परशुरामाचे दर्शन घेण्यासाठी आले असताना समर्थ रामदासांनीच या मारुतीची स्थापना केली असावी. मंदिराच्या प्राकारात परशुरामांची आई देवी रेणुकामातेचे मंदिर आहे. तेथे पूर्वी जाखमातेचे मंदिर होते. हे सुंदर मंदिर साडेतीनशे वर्षांपूर्वी मंदिराच्या प्राकाराजवळच तलावाजवळ बांधण्यात आले. मंदिराच्या प्राकारातच गणपतीचे छोटे मंदिर आहे.

श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे. परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. ५७० मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ. स. ५७० मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसविले गेले. दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञऋषींना आणले गेले. तेच पुढे चित्त्पावन म्हणून प्रसिद्ध झाले, असे डॉ. जोग यांचे प्रतिपादन आहे.  अश्वमेध, राजसूय यांसारखे सर्वात मोठे यज्ञ केले जात. तेव्हा यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्रतिष्ठापना यज्ञभूमीजवळ केली जात असे त्याबरोबर चारहि वेद जिच्यात सामवले आहेत, अशा वेदवासिनी किंवा विंध्यावासिनी देवीचे मंदिरही जवळच बांधले जात असे. यज्ञभूमीचा रक्षणकर्ता म्हणून कार्तिकेय ओळखला जातो. स्वाभाविकच यज्ञस्थळाजवळ भगवान परशुराम आणि विंध्यवासिनीबरोबर कार्तिकेयाचे मंदिरही बांधले जात असे. चिपळूणमधीलवर उल्लेख केलेल्या अश्वमेध यज्ञासाठीच या तिन्ही देवतांची मंदिरे चिपळूणच्या उत्तरेला बांधण्यात आली, असे संशोधक डॉ. जोग यांचे म्हणणे आहे. परशुराम अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेल्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे.

-सतीश पाटणकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -