Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेसमस्यांच्या विळख्यात अडकले मीरा रोड रेल्वे स्थानक

समस्यांच्या विळख्यात अडकले मीरा रोड रेल्वे स्थानक

सरकते जिने, इंडिकेटर बंद, स्कायवॉक, स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान

भाईंदर : आशिया खंडात २०० टक्क्यांनी वाढणारे शहर म्हणून विक्रम करणाऱ्या मीरा रोड शहाराने जगाच्या नकाशात विकासाचे शहर म्हणून आपले स्थान निर्माण केले असले तरी या शहराचे रेल्वे स्थानक मात्र समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. बंद असलेले सरकते जिने आणि इंडिकेटर, फेरीवाल्यांच्या गराड्यात असलेला स्कायवॉक आणि स्टेशन परिसर, स्टेशनबाहेर असलेले स्वच्छतागृह यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची भौगोलिक हद्द सोडल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील येणारे पहिलेच रेल्वे स्थानक म्हणजे मीरा रोड आहे. मुंबईतील सर्व सोयी सुविधा उपलब्ध असूनही मुंबईच्या तुलनेत सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडणाऱ्या घरांच्या किंमती, राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांनी केलेली विकास कामे यामुळे गेल्या १५ वर्षांत २०० टक्क्यांनी लोकसंख्येत वाढ झाली. त्या तुलनेत मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासाच्या दृष्टीने विविध उपाय योजना मागच्या काही वर्षात करण्यात आल्या असल्या तरी रेल्वे प्रशासनाकडून देखभालीत होणाऱ्या हेळसांडीमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रेल्वे स्थानकातील दोन पुलांवर चढण्यासाठी सरकते जिने बसवण्यात आले आहेत. यात दहिसरच्या बाजूला असणाऱ्या व मधल्या पुलाचा समावेश आहे. तिसऱ्या म्हणजेच भाईंदरच्या दिशेला असणाऱ्या पुलाचा सर्वाधिक वापर केला जातो तरी त्यावर सरकत्या जिन्याची सुविधा नाही. तसेच स्थानकात पुलावरून उतरण्यासाठी एकही सरकता जिना बसवण्यात आलेला नाही. गेले काही दिवस सरकते जिने दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक, गर्भवती महिला, रुग्ण आणि दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत आहे.

लिफ्टची सुविधा देखील फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर आणि एकाच दिशेला उपलब्ध असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. स्थानकातील इंडिकेटर्स बरेचदा बंद असतात. स्कायवॉक असला तरी त्याचा वापर प्रवाशांपेक्षा फेरीवाले जास्त करतात. स्कायवॉक रात्री १ वाजेपर्यंत फेरीवाल्यांच्या गराड्यात असतो त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांना स्कायवॉक वरून जाण्यासाठी कसरत करावी लागते. स्टेशन बाहेरचा परिसर फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्यामुळे रिक्षा, बस स्टँडपर्यंत जाणे सुद्धा मुश्किल होते. रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या खाजगी सार्वजानिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो.

मीरा रोड रेल्वे स्थानकात रोजची सरासरी तिकीट व पास विक्री १ लाख १४ हजार ६६७ रूपये एवढा मोठा महसूल असूनही मीरा रोडच्या रेल्वे प्रवाश्यांची समस्यांच्या विळख्यातून कधी सुटका होणार अशी चर्चा लोकलमध्ये नेहमीच सुरू असते.

आता एक नंबर प्लॅटफॉर्मवर भाईंदरच्या दिशेने सरकता जिना बसवण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी त्या प्लॅटफॉर्मवर जाणारा पूल बंद ठेवण्यात आला आहे. मात्र याची कल्पना प्रवाशांना देण्यासाठी ४ नंबर प्लॅटफॉर्मवर माहिती फलक लावणे आवश्यक असताना तसे केलेले नाही. त्यामुळे विरारकडे जाणारे प्रवासी पूल चढून आल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात येते. यात वृद्ध, दिव्यांग, गर्भवती महिला अशा प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उतरून येणाऱ्या गाडीची वाट पहावी लागते. नाहीतर त्या प्लॅटफॉर्मवरून पुन्हा पूल चढून चार नंबरवर उतरण्याचा द्रविडी प्राणायाम करावा लागतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -