Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मिळणार महिन्याला वीस हजार

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना मिळणार महिन्याला वीस हजार

वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय वाढविण्याची घोषणा केली होती.

ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वृध्दावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून “आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या ११ हजार रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो. आता नऊ हजार रुपयांनी ही रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असून निकष व कार्यपध्दतीनुसार प्रत्यक्ष पात्र अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. ही मासिक अर्थसहाय्याची रक्कम “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” मधील ५० कोटी इतक्या मुदत ठेवीच्या रकमेवरील व्याजाच्या रकमेतूनच देण्यात येईल. ही रक्कम डीबीटीने संबंधित पत्रकारांच्या खात्यात जमा होईल. गेल्या वर्षी मार्चमध्येच हा निधी ३५ कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आला आहे.

राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते. या वाढीव निधीमुळे त्यांना चांगले अर्थसहाय मिळेल.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ परिवारांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार

देशभरातील पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्या शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यासंदर्भात आवाज उठवला होता. अखेर आज शासनाने याबद्दलचा जीआर काढून हा विषय मार्गी लागला असे सांगितले आहे. पत्रकारांच्या या यशाबदल राज्यभरातल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सदस्यांनी अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून पदाधिकारी, पत्रकार यांनी आनंद व्यक्त केला.

राज्यातील पत्रकार संघटना आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने सेवानिवृत्त पत्रकारांचा मानधन वाढीबाबतचा विषय शासनाकडे रेटून धरला होता. नुकतेच झालेले हिवाळी अधिवेशन, त्या अगोदर तीन वेळा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने धरणे आंदोलन केल्यानंतर शासनाने पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन एक समिती स्थापन केली होती. यावेळी संघटनेने पत्रकारांच्या आरोग्य, मुलांचे शिक्षण, निवासाचा प्रश्न, निवृत्ती वेतनाचा प्रश्न यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली होती. पत्रकारांच्या आरोग्य योजनेत देखील भरीव वाढ करण्याची मागणी केली होती.

पत्रकार संघटनांच्या यापूर्वी करण्यात आलेल्या विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, देवेंद्र फडणवीस, माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या भेटी घेऊन त्यांना राज्यातील पत्रकारांच्या समस्यांबाबत सांगितले होते. बारामती येथे सुमारे दोन हजार पत्रकारांच्या उपस्थितीत अधिवेशन घेण्यात आले. यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनातील मुद्द्यांवर आधारित आपल्या मागण्या शासनाकडे पाठवा त्यावर गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते.

ज्येष्ठ पत्रकारांना सामाजिक सुरक्षा सुविधा देण्याच्या दृष्टीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना अंतर्गत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीमधील ठेवीवरील व्याजाच्या रकमेतून दरमहा ११ हजार रुपये एवढे अर्थसहाय पात्र जेष्ठ पत्रकारांना देण्यात येत होते. यावर विधान परिषदेत व्हॉईस ऑफ मीडियाचा आवाज आमदार धीरज लिंगाडे यांनी उचलला होता. शासनाचे लक्ष वेधले होते. दहा मार्च रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार अधिक अधिस्वीकृती धारक पात्र जेष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिले जाणारे अकरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य वीस हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दुरध्वनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -