Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीम्हाडा कोकण मंडळाची आज सोडत

म्हाडा कोकण मंडळाची आज सोडत

मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या वितरणाची संगणकीय सोडत आज शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहात आयोजित सोडत कार्यक्रमामध्ये ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त २५,०७८ पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे.

या सोडतीला राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम स्थळी उपस्थित अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वेब कास्टिंगची लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी ६ नंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतचा संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तात्काळ प्राप्त होणार आहे. ‘संगणकीय सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी सोडत कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -