Wednesday, May 8, 2024
Homeअध्यात्मगर्विष्टाला धडा शिकविला

गर्विष्टाला धडा शिकविला

  • समर्थकृपा : विलास खानोलकर

स्वामी सेवक कानफाट्या सुरुवातीस आला तेव्हा समर्थ डोक्यावर पांघरूण घेऊन झोपले होते. नित्य जागृत असलेल्या स्वामींना झोप कसली? ते झोपेचे सोंग होते. पण अहंभावी, नाथपंथी कानफाट्याला श्री स्वामींची सर्व ज्ञाती, नित्य जागृतता लक्षात आली नाही. त्याने श्री समर्थ झोपले आहेत, असे समजून त्यांच्या अंगावर लाल धाबळी पांघरली, त्या सरशी श्री स्वामींनी त्यास चेटूक करतोस काय? असे म्हणत फटकारले. यातून त्यांना असे सूचित करावयाचे आहे की, ‘नभी बावरे जो अणुरेणू काही। रिता ठाव या राघवेवीण नाही।। असे हे माझे विराट स्वरूप तुला कळत नाही का? ते जाणून न घेता अहंकाराची, तामसीपणाची धाबळी माझ्या अंगावर घालून मला झाकू पाहतोस? अरे, मूर्खा! मला झाकू शकेल, असे या जगात काही नाही. तुला तुझ्या हठयोग साधनेचा गर्व झालेला दिसतो. पण, गोरक्षनाथांसारख्या श्रेष्ठांचाही अहंकार ज्या दत्तप्रभूंनी नाहीसा केला, त्यांचे विशुद्ध ब्रह्मस्वरूप म्हणजे ‘मी’ आहे हेही तू विसरलास? तुझी साधना वाईट नाही. त्या साधनेद्वारे आत्मारामाला पाहावे. तिथे हे असले नाटक, अहंभावीपणा कशासाठी? ही तर तुझ्या साधनेची चेटूक-चेष्टा झाली. श्री स्वामी समर्थांनी ‘चेटूक’ हा शब्द उच्चारून कानफाट्याची एक प्रकारे झाडाझडती घेतली. तेव्हापासून तो त्यांचा अंकित झाला; परंतु दुर्दैव असे की त्यांच्या सान्निध्यात राहूनही त्यात फारसा बदल झाला नाही. पुढे त्यास सेवेकऱ्यांकडून चांगलाच मार मिळाला. सात वर्षे तुरुंगात काढावी लागली. तुरुंगातून सुटल्यावर श्री स्वामींचा त्यास सहवास आणि सेवा न मिळता घर परतावे लागले. श्री स्वामी महाराजांच्या नावाची शेखी मिरवित ‘अहंपणा’ दाखविणाऱ्यांनी कानफाट्यावर गुजरलेल्या प्रसंगातून योग्य तो बोध घ्यावा व वेळी आत्मपरीक्षण करावे. वेळ पडली तर मूर्खांना स्वामी धडा शिकवितात, पण गरीब आज्ञाधारकाला मदतच करतात.

नका घेऊ स्वामींची परीक्षा
स्वामीच देती गुरुंना दीक्षा ।।१।।
स्वामीच परीक्षेचे परीक्षक
स्वामीच सर्वांचे अधीक्षक ।।२।।
संकटास स्वामी देती धडक
स्वामी श्रीमंतासाठी कडक ।।५।।
गरिबासाठी धावती तडक
स्वामींची वाद्ये वाजती कडक।।६।।
नाथ सांप्रदायाचे प्रज्वलक
स्वामी स्वतः निष्कलंक ।।३।।
भक्तांनाही बनवीती निष्कलंक
स्वामींच्या हाती प्रेमाचा फलक ।।४।।
ढोल-ताशा तडक भडक
शांत स्वामी शत्रूला कडक ।।७।।
स्वामी भक्तीची प्रेमळ सडक
भक्त हृदयात स्वामीनाम धडकधडक ।।८।।

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -