Tuesday, April 30, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखIran-Israel War : शापित मध्यपूर्व भूमी

Iran-Israel War : शापित मध्यपूर्व भूमी

मध्यपूर्व ही भूमी नेहमीच शापित आहे आणि मानवी रक्ताची ती भुकेलीही आहे. त्यामुळेच तेथील राष्ट्रे सातत्याने एकमेकांवर हल्ले चढवत असतात आणि मानवाधिकारांचा अत्यंत निर्लज्जपणे भंग होत असतो. यात कोणतेही एक राष्ट्र दोषी आहे असे नाही, तर सारेच देश अगदी अमेरिकासुद्धा या रक्तरंजित लढाईत आनंदाने भाग घेत असते. इराणने इस्रायलवर केलेला क्षेपणास्त्रांचा प्रखर हल्ला हा याच वास्तवाचा आविष्कार आहे आणि आंतरराष्ट्रीय पटलावर त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. इराणने इस्रायलच्या भूमीवर क्षेपणास्त्रे आणि लष्करी तळावर हल्ले केले. पण इराणपेक्षा इस्रायलची तांत्रिक आणि लष्करी शक्ती कितीतरी पटींनी अधिक असल्याने इस्रायलचे इराणला वाटले तेवढे नुकसान झालेले नाही. इराणने तीनशे हल्ले केले पण इराणच्या क्षेपणास्त्रांचा मारा मध्येच इस्रायली लष्कराने हाणून पाडला आणि इराणला केवळ इस्रायलवर सूड घेण्याचे समाधान मिळाले. पण प्रत्यक्षात नुकसान असे इस्रायलचे झालेले नाही. इराण-इस्रायल यांच्यातील वैराचा इतिहास पाहिले असता असे लक्षात येईल की, इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध चार टप्याटप्प्यात विभागले गेले आहेत. पहिला टप्पा हा १९४७ ते १९५३ असा दोन्ही देश द्विधावस्थेत होते, तर दुसरा टप्पा हा पहेलवी राजघराण्याच्या काळातील मित्रत्वाचा होता. तिसरा टप्पा दोन्ही देशांतील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली तो १९७९ ते १९९० या काळात होता. पण इराणने इस्रायलला कधीच सहन केलेले नाही. या काळाला शीतयुद्धाचा काळ असेही म्हणतात. सारी मुस्लीम राष्ट्रे इस्रायलला घेरून आहेत आणि तरीही इस्रायल हे चिमुकले राष्ट्र सर्वांना पुरून उरले आहे. अर्थात त्याला कारण हेही आहे की इस्रायलचे लष्करी सामर्थ्य अफाट आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्याला लाभली आहे. इराण लोकसंख्येच्या दृष्टीने इस्रायलपेक्षा कितीतरी मोठा आहे. पण लष्करी ताकद आणि तंत्रज्ञानदृष्ट्या इस्रायल हा इराणलाच काय पण साऱ्या मुस्लीम राष्ट्रांना भारी ठरत आला आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील वैर धुमसत असले तरीही त्यात एक संतुलन साधले गेले आहे. मुस्लीम राष्ट्रांचा कांगावा असा असतो की जेव्हा इस्रायल त्यांच्यावर उत्तरादाखल कारवाई करते तेव्हा अमेरिका आणि इस्रायलला ते दोष देत असतात. पण कळ तर त्यांनीच काढलेली असते. इस्रायल जेव्हा संकटात सापडतो तेव्हा अमेरिकेसह सारा युरोप संतप्त होऊन उठतो. याचे कारण मुस्लीम राष्ट्रांची ताकद वाढलेली नको आहे. मध्य आशिया हा नेहमीच अशांत प्रांत असतो आणि आताही सध्या तेथे जोरदार ताणाताणी सुरू झाली आहे. त्याला काही तज्ज्ञ वादळापूर्वीची शांतता असे संबोधत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील शत्रुत्व तर प्रसिद्धच आहे. इराणने इस्रायलच्या विरोधात हल्ला करून इस्रायलला डिवचले तर आहे. पण इराणच्या नौदलाने इस्रायलचे एक जहाज ताब्यात घेऊन आता युद्धाची ठिणगी पेटवली आहे.

एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात घमासान सुरू असताना आता आखातात युद्ध होणे हे चांगले लक्षण नाही. यातून जगाचा विनाश होणार आहे, हे तर सत्य आहेच. पण संयुक्त राष्ट्रसंघ ही जागतिक शांतता राखण्यासाठी स्थापन झालेली संघटना याच काळात निष्प्रभ व्हावी हा चांगला योगायोग नाही. इराणची लोकसंख्या मोठी असली तरीही त्याची ताकद तुलनेने इस्रायलपुढे काहीच नाही. त्यात अमेरिकेची इस्रायलला मदत असते. त्यामुळे हा संघर्ष खरा इस्रायल आणि इराण यांच्यात असल्याचे वाटत असले तरीही तो खरा आहे तो इराण आणि अमेरिका यांच्यात. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने भीषण हल्ला चढवून इस्रायली नागरिकांना ठार मारले आणि कित्येकांना ओलिस ठेवले. तेव्हापासून इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला धार आली. इराणने हमासला नेहमीच समर्थन दिले आहे आणि पॅलेस्टाईनला इराणचेच समर्थन आहे. हमासने इस्रायलविरोधात संघर्ष सुरू केल्यापासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष नुसताच पेटला नाही, तर त्या यज्ञात किती जणांच्या आहुती पडतील ते कुणीच सांगू शकत नाही. इराण-इस्रायल यांच्यातील या ताज्या संघर्षाचे अर्थातच भारताला परिणाम भोगावे लागणार आहेत. अगदी लगेच नाही तरीही काही दिवसांनी पेट्रोल प्रचंड महाग होऊ शकते. कारण इराण हा आपला तेल पुरवठादार देश होता. पण आता अमेरिकेने त्याच्यावर निर्बंध लादल्यामुळे भारत त्या देशातून पेट्रोल आयात करू शकत नाही. इराणकडे अण्वस्त्रे असल्याचा अमेरिकेसह साऱ्या जगाला संशय आहे आणि यामुळे सारा युरोप इराणविरोधात पेटून उठला आहे. इराणच्या अणू कार्यक्रमावर अमेरिकेची बारीक नजर आहे. कदाचित त्यावरून जगाची नजर हटवण्यासाठीच इराणने इस्रायलवर हल्ला केला असावा. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात मध्य पूर्व पुन्हा पेटला आहे आणि कायम अशांत असलेला हा प्रदेश पुन्हा अशांततेकडे निघाला आहे. इराण हा देश इस्रायलविरोधात हेजबोल्ला दहशतवाद्यांना कायम पोसत आला आहे. हमासने जरी इस्रायलविरोधात ७ ऑक्टोबरला हल्ला केला तरीही त्याचा खरा पडद्याआडचा खलनायक हेजबोल्ला ही दहशतवादी संघटनाच होती. आता इराणचे बहुतेक हल्ले परतवून लावल्याचे आणि काही क्षेपणास्त्रे मध्येच पाडली असल्याचा दावा इस्रायलने केला आहे आणि यात सत्य आहे. कारण इराणच्या लष्करी ताकदीपेक्षा इस्रायलची ताकद कितीतरी पटींनी मोठी आहे. गाझा पट्टीतील हल्ले इस्रायल थांबवत नाही तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू, असे इराणने जाहीर केले असले तरीही तितका काळ संघर्ष पुढे रेटण्याची इराणची ताकद नाही. अमेरिका जर यात उतरली तर इराण बेचिराख होऊन जाईल. त्यामुळे जगाची विभागणी अरब राष्ट्रे विरोधात पाश्चात्त्य देश म्हणजे युरोप अशी होईल. हे होणे कुणालाच परवडणारे नाही. दोन्ही देशांनी सामंजस्याची भूमिका घेऊन युद्ध टाळावे, अशीच प्रत्येक मानवताप्रेमींची इच्छा असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -