Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीपेणमध्ये बेकायदेशीर सावकारी व्यवसाय जोरात

पेणमध्ये बेकायदेशीर सावकारी व्यवसाय जोरात

देवा पेरवी

पेण : शहरासह तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाने जोर धरला आहे. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडता फेडता अनेकांचे कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत. जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांनादेखील या बेकायदेशीर सावकारी व्यवसायाचा फटका बसला असून धुमाळ यांनी याबाबत दीपक समेळ यांच्या विरोधात पेण पोलिसांत तक्रार केली असल्याचे डॉ. शेखर धुमाळ यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना डॉ. शेखर धुमाळ यांनी सांगितले की, पेण शहरातील गणपती कारखानदार दीपक समेळ यांच्याकडून सन २०१४ मध्ये व्यवसायासाठी तीन लाख रुपये दहा टक्के व्याजदराने घेतले होते. त्यावेळी समेळ यांनी माझ्याकडून बँक ऑफ बडोदाच्या जोहे येथील शाखेचे दोन कोरे धनादेश (चेक) व ५०० रुपयांचा कोरा बॉण्ड पेपर सिक्युरिटी म्हणून घेतले होते. सदरची रक्कम सन २०१४ सालीच व्याज व मुद्दलासह परत केली असून, यावेळी माझे कोरे चेक व बॉण्ड पेपर हे परत मागितले असता ते फाडून टाकतो म्हणून समेळ यांनी सांगितले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी ते चेक व बॉण्ड त्यांच्याकडेच ठेऊन घेतल्याचे डॉ. शेखर धुमाळ यांनी सांगितले.

तरीही दीपक समेळ यांनी जास्त पैशांच्या लालसेपोटी माझ्या २०१४ साली घेतलेल्या चेक व बाँड पेपरचा गैरवापर करून एका चेकवर सात लाख रुपये व दुसऱ्या चेकवर आठ लाख रुपये अशी खोटी रक्कम टाकून माझ्याविरोधात पेण न्यायालयात खोटी केस दाखल केली असल्याचे डॉ. शेखर धुमाळ यांनी सांगितले. पेण न्यायालयात दाखल केलेली केस मला ६ ऑक्टोबरला पोलीस हे कोर्टचा समन्स घरी घेऊन आल्यावर नंतर समजले. याबाबत मी माझे मित्र चंद्रकांत पाटील यांचे कडे सांगितला असता त्यांनी दीपक समेळ यांची भेट घेऊन विचारले असता त्यांनी मला साधारणतः तीन लाख रुपये दहा टक्के व्याजाने दिले होते असे सांगितले. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडीओही करण्यात आली असल्याने दीपक समेळ सावकारी करण्याचे कोणतेही लायसन्स नसताना बेकायदेशीरपणे सावकारी व्यवसाय करत असल्याचे सिद्ध होत आहे, असे डॉ. शेखर धुमाळ यांनी सांगितले.

तसेच, दीपक समेळ यांनी बाऊन्स केलेले चेक हे फार जुने असून त्यानंतर माझे बँक ऑफ बडोदाच्या जोहे बँकेतील अनेक चेक बुकचा वापर मी माझे व्यवसायानिमित्त केला आहे. समेळ यांनी माझ्या कोऱ्या चेकचा केलेल्या गैरवापराचा पोलिसांनी सखोल तपास करावा व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही पेण पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे.

बेकायदेशीर सावकार दीपक समेळ यांनी 000020 क्रमांकाच्या ७ लाख रुपयांच्या चेकवर १० जानेवारी २०२१ अशी तारीख टाकली आहे, तर त्या नंतरच्या दुसऱ्या चेक क्रमांक 000021 वर 8 लाख रुपये रक्कम टाकून २५ डिसेंबर २०२० रोजी दिला असल्याचे नमूद केले आहे. मी हे चेक भरून दिले असते तर चेक नं 00020 हा अगोदरचा व 000021 हा चेक त्या नंतरचा दिला असता. यावरूनच दीपक समेळ यांचा खोटेपणा उघड होत असल्याचे डॉ. धुमाळ यांनी केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.

सावकारी करणारे दीपक समेळ यांनी समाजात माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर खोट्या केसेस केल्या असून या बदनामीमुळे मला भविष्यात आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. बेकायदेशीरपणे सावकारी व्यवसाय करून अनेकांविरोधात खोट्या तक्रारी करणाऱ्या दीपक समेळ यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही डॉ. शेखर धुमाळ यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पेण पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे.

जनतेने सावकारांविरोधात पोलिसांत तक्रार द्यावी

सदर सावकारी प्रकरणाचा तक्रार अर्ज आमच्याकडे आला असून याबाबत सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल. मात्र, नागरिकांनीही अशा प्रकाराला भुलून जाऊ नये. सावकार आपल्याला त्रास देत असतील तर तातडीने पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व तक्रार दाखल करावी. – जितेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक, पेण पोलीस स्टेशन

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -