Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीजयंत पाटलांच्या दौऱ्यातून निष्पन्न काय?

जयंत पाटलांच्या दौऱ्यातून निष्पन्न काय?

दीपक मोहिते

पालघर : शुक्रवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचा उद्देश होता की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे. त्यामध्ये जलसंपदा विभागाचा कोणत्याही विषयाचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याचे वर्णन ‘ते आले, मूठभर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला व पुढच्या कार्यक्रमास निघून गेले,’ असे केल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

दिवसभर ते जिल्ह्यात होते. या दरम्यान त्यांनी वाडा तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी शेताच्या बंधावर जाऊन संवाद साधला असता तर जिल्हावासीयांची त्यांच्या पक्षाला नक्कीच आशीर्वाद मिळाले असते. पण शेतकरी ‘किस झाडकी पत्ती’ अशा वृत्तीने वावरणाऱ्या नेत्यांपेक्षा जयंत पाटीलही वेगळे नाहीत, हे काल अनुभवायला मिळाले.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे. संघटनात्मकदृष्ट्या पक्ष कमकुवत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा त्यांनी जिंकली होती. कारण समोरचा उमेदवार प्रभावी नव्हता. माजी आमदार व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हाविकासाबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले. त्याचा फटका त्यांच्या मुलाला या निवडणुकीत बसला व राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षितपणे विजयाची लॉटरी लागली. राष्ट्रवादीचा हा विजय नकारात्मक होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभावी कामगिरी करता आली नाही. डहाणू, विक्रमगड व मोखाडा या तीन तालुक्यांत थोडेफार अस्तित्व असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई, पालघर, तलासरी व वाडा तालुक्यांत अस्तित्व अत्यंत नगण्य आहे. त्यामुळेच जयंत पाटलांना शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे वाटले असावे. परिणामी शासकीय खर्चाने झालेल्या पक्षीय दौऱ्यातून काय निष्पन्न होते, ते लवकरच होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -