Monday, May 6, 2024

मदतीचा हात

सहजपणे आपण कोणाला दिलेला मदतीचा हात किंवा थोडासा वेळ खूप काही शिकवून जातो. आपण केलेल्या छोट्याशा समाजकार्यातून आपल्याला पुण्य लाभेल आणि आपला तो दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल!

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

आज मी बाहेर पडताना, एका वयस्कर बाईने आमच्या सोसायटीच्या गेटवर फूल विकणाऱ्या एका बाईला एक मलम आणून दिला आणि तिला सांगितले की, “कपाळावर ते मलम लाव.” बरं वाटेल. मी पाहतच राहिले. या फुलवालीच्या डोक्याला पाटी उतरवताना जबरदस्त मार लागून, टेंगूळ आलेले होते. ते दुखत होते, हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. ते टेंगूळ खरं तर इतके दिसण्यासारखे होते की, जाता-येता प्रत्येकाला दिसले असेलच. पण नेमकं या बाईला तिच्या त्या टेंगुळाला लावण्यासाठी ट्यूब द्यावीशी वाटली!

संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत होते. सोसायटीच्या गेटवर एक फुलवाली नेहमीच हार-फुले विकत असते. त्या बाईकडे पाहिल्यावर माझ्या नेहमी मनात येते की, ही बाई तिचा संसार कसा सांभाळत असेल? तिचा नवरा दारूडा आहे आणि मुलगा घर सोडून गेलेला आहे, ही गोष्ट मला माहीत आहे. माझ्या मनात आले की, जर शंभर माणसं तिच्यासमोरून जात असतील, तर त्यातला एक तरी माणूस फुलं घेत असेल का? नाही. मग साधारण पाचशे ते हजार माणसे समोरून गेल्यावर, एखादा माणूस फुलं घेत असेल, असा अंदाज करूया. दहा ते पंधरा रुपयांचा गजरा किंवा एखादा वीस रुपयांचा हार घेतल्यावर त्यामागे तिला नेमके किती पैसे मिळत असतील? किती तास बसल्यावर तिची, किती फुलं विकली जात असतील किंवा न विकलेली फुलं दुसऱ्या दिवशी कोमेजून जात असतील त्याचे किती नुकसान होत असेल. ज्या दिवशी ही बाई आजारी पडते किंवा नातेवाइकांच्या-घरगुती कार्यक्रमात असते, त्या दिवशी तिची विक्री कशी होत असणार? ही फुलं विक्रीसाठी ती किती दुरुन आणत असेल? गजरे-हार गुंफत असताना तिची नजर कशी गिऱ्हाईकांवर टिकून असेल? किती तरी प्रश्न माझ्या मनात पिंगा घालत असतात.

आपण म्हणतो की, समाजकार्य केले पाहिजे किंवा काही लोक दावा करतात की, आम्ही खूप समाजकार्य करतो. पण ही घटना पाहिल्यावर, मला असे वाटले की, हे सुद्धा एक समाजकार्य नव्हे का? त्या टेंगुळासाठी ती फुलवाली निश्चितपणे कोणत्याही डॉक्टरकडे जाणार नव्हती किंवा स्वतःहून मेडिकलमध्ये जाऊन त्याला लावण्यासाठी औषध घेणार नव्हती. तिचे टेंगूळ तसेही बरे झाले असते, पण कदाचित या मलममुळे तो लवकर बरा होईल किंवा मलम लावल्यामुळे आणि ते मुख्यत्वे कोणी तरी स्वतः विकत घेऊन दिल्यामुळे तिला वेगळे मानसिक समाधान मिळेल, जे मला वाटते फार महत्त्वाचे आहे.

मग मी मला या प्रसंगात स्वतःला ठेवून पाहिले की, मी तिच्या पुढून जाताना माझे तिच्याकडे लक्ष गेले असते का? लक्ष गेले असते तरी मला टेंगूळ दिसले असते का? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, त्या टेंगुळाला लावण्यासाठी समोरच्या मेडिकलमधून मी कोणते तरी मलम तिला आणून दिले असते का? असे प्रश्न माझ्या मनात उभे राहिले.

हा प्रसंग लिहिताना जाणवते की, अशी जगात अनेक माणसे असतात, त्यांना छोट्याशा आनंदाची गरज असते किंवा आपल्या उपकाराची म्हणा ना; परंतु ते समजून घेण्याची आपली कुवत नसते किंवा दानत नसते. फक्त या प्रसंगानंतर आपण (मी सुद्धा) लक्षात घेऊया की, सहजपणे आपल्याला कोणाला मदतीचा हात देता आला किंवा थोडासा वेळ देता आला तर तो देऊया जेणेकरून थोडेसे समाजकार्य केल्याचे आपल्याला पुण्य लाभेल आणि आपला तो दिवस सार्थकी लागल्याचे समाधान लाभेल!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -