Monday, May 6, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलfawn story: हरिणीचं बाळ

fawn story: हरिणीचं बाळ

कथा – रमेश तांबे

एका जंगलात एक हरिणी आपल्या बाळासोबत राहत होती. तिचं बाळ आता चांगलं हिंडू-फिरू लागलं होतं. ते उड्या मारत पळायचं. इकडे तिकडे धावायचं. छोटं छोटं गवत खायचं. गवत-मातीत लोळायचं. त्याच्याकडे पाहून हरिणीला कौतुक वाटायचं. त्यांचे दिवस आनंदात चालले होते. बाळ मोठं होत होतं.

एके दिवशी सकाळच्या वेळी गर्द झुडपात हरिणी आपल्या बाळासोबत पहुडली होती आणि अचानक काय घडले काहीच कळले नाही. हरिणीच्या शेजारीच बसलेल्या तिच्या बाळावर वाघाने झडप घातली.

बाळाच्या ओरडण्याने हरिणी भानावर आली. पहाते तर काय बाळाची मान वाघाच्या जबड्यात! ती खूप घाबरली. इकडे तिकडे पळू लागली. वाघाला ढुशा देऊ लागली. पण वाघ तसाच उभा तिच्या बाळाला जबड्यात धरून.

हरिणीचे सर्व प्रयत्न संपले. ती पळून पळून थकली. आता वाघासमोर ती निश्चयाने उभी राहिली आणि वाघाला म्हणाली, “वाघा मला ठाऊक आहे तुला भूक लागली असेल. तुझ्या बाळांना खाऊ घालायचं असेल. पण माझं एक ऐक ना. त्या माझ्या बाळाला सोड आणि मला खा. माझं मांस तुझ्या साऱ्या कुटुंबाला नक्कीच आवडेल. तू माझ्या पोटच्या गोळ्याला सोड,” असं म्हणून हरिणी खाली बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली. बाळाला सोड आणि मला खा. बाळाला सोड आणि मला खा! वाघाने क्षणभर विचार केला. कोणतेही कष्ट न करता मोठी शिकार मिळते आहे तीच घेऊया. मग वाघाने हरिणीच्या बाळाची मान आपल्या जबड्यातून सोडवली. तसं ते बाळ आईच्या दिशेने पळाले आणि आईला बिलगले. हरिण पटापट त्याचे मुके घेऊ लागली.

आईकडे पाहत बाळ म्हणाले, ‘‘आई गं, वाघोबाने मला का पकडले होते. त्याचे दात माझ्या मानेत किती जोरात रुतले होते.” हरिणी त्याचे सर्वांग चाटू लागली.

एकीकडे तिच्या डोळ्यांतले पाणी थांबत नव्हते. अन् दुसरीकडे तिचे बाळाला चाटणे सुरूच होते. ती बाळाला म्हणाली, “हे बघ बाळा, आता तुला एकट्यालाच राहायचे आहे. मी त्या वाघाला तसा शब्द दिलाय. मला तुझा जीव वाचवायचा होता, तो वाचला. जा आता यापुढे सावध राहा. काळजी घे. मी चालले!” आईचे बोल ऐकून बाळाने आकांत सुरू केला. अन् तोही हमसाहमसी रडू लागला. मग बाळ पुढे येऊन वाघाला म्हणाले, “वाघोबा हे बघ माझ्या आईला खाऊ नकोस. त्याऐवजी मलाच खा. आईच नसेल तर मी कुणाबरोबर राहू. या जंगलात मला एकट्याला खूप भीती वाटते बघ! नाहीतर असं कर आम्हा दोघांना एकाच वेळी खाऊन टाक. म्हणजे कोणालाच दुःख होणार नाही!”

बाळाचे ते बोलणे ऐकून, वाघाला आपल्या बाळांची आठवण झाली. आपलीही बाळे अशीच कोणाकडे तरी याचना करीत आहेत, असे चित्र त्याला डोळ्यांसमोर दिसू लागले. वाघ क्षणभर बावरला, मुलांची आठवण होताच त्याचे अंग शहारले. मग त्याने थोडा वेळ आपले डोळे बंद करून घेतले आणि दोघांनाही सोडून सावकाशपणे घनदाट जंगलाकडे निघून गेला. त्या पाठमोऱ्या वाघाकडे हरिणी आणि तिचं बाळ कितीतरी वेळ बघत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -