Saturday, April 27, 2024
Homeगणेशोत्सवपीओपी मूर्त्यांना ग्राहकांची पसंती...

पीओपी मूर्त्यांना ग्राहकांची पसंती…

तुलनेने कमी किंमत आणि आकर्षक मूर्त्यांमुळे मागणी कायम -वैभव ताम्हणकर                       

गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना गणेशमूर्ती बुक (नोंदणी) करण्याकरिता भाविकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारांत पर्यावरणपूरक मूर्त्यांची संख्या अधिक असली तरी पीओपी गणेशमूर्तींकडेच भक्तांचा ओढा असल्याचे दिसते. कमी किंमत आणि विविध आकर्षक पर्याय उपलब्ध असल्याने पीओपीच्या गणेशमूर्ती खरेदीकडे गणेशभक्तांचा कल दिसत आहे.

यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जावा, असे प्रयत्न मुंबई पालिकेकडून केले जात होते. मात्र वाढत्या मागणीचा विचार करता राज्य शासनामार्फत यंदाच्या वर्षासाठी पीओपीच्या घरगुती गणेश मुर्त्यांवर आणलेली बंदी मागे घेण्यात आल्याचे समजते. मात्र त्यानंतरही पर्यावरणाचा विचार करता अनेक गणेश मूर्ती शाळा आणि केंद्रांमध्ये ६० टक्के शाडू आणि ४० टक्के पीओपीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या.

मुंबई पालिकेद्वारे काही महिन्यांपूर्वीच पर्यावरणाचा विचार करता घरगुती गणेश मुर्त्यांबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये, पालिकेच्या नियमावलीनुसार ४ फुटांच्या आतील घरगुती गणेश मूर्ती एकतर शाडू मातीच्या असाव्यात अन्यथा कागदी लगद्यापासून तयार केलेल्या असाव्यात. नियमावलीत गणेश भक्तांसोबतच गणेश मूर्तिकार आणि विक्रेते यांच्यासाठी देखील काही महत्त्वपूर्ण अटी, नियम आणि सवलतीसुद्धा देण्यात आल्या होत्या. ज्याचा, पुढे जाऊन मूर्तीकारांनी विरोध देखील केला होता. पालिकेमार्फत अचानक घेण्यात आलेला हा निर्णय आर्थिक नुकसानीचा असल्याचे सांगत मूर्तीकारांनी याबद्दल आपली भूमिका पालिकेसमोर मांडली होती. परंतु, यामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आजवर ज्या गणेश मूर्तींची बुकिंग झाली आहे. त्यामध्ये, सर्वाधिक प्रमाण हे पीओपीच्या मूर्त्यांचे असल्याचे समजते.

एका मूर्तीकारांच्या म्हणण्यानुसार, आम्ही पालिकेद्वारे तयार केलेल्या नियमावलीचे, आमच्याकडून होईल तितके पालन करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, आमच्याकडे येणारा ग्राहक वर्ग आणि त्यांची मागणी पाहता आम्हाला, नाईलाजास्तव पीओपीच्या मूर्त्यांची विक्री करावी लागते. तसेच, पीओपीचा विचार करता ती मूर्ती ग्राहकांना आर्थिकरित्या परवडणारी देखील असते. सोबतच, पीओपीमध्ये ग्राहकांना मुर्त्यांचे अनेक पर्याय देखील उपलब्ध असतात. त्यामुळे, ग्राहकांची पहिली पसंती ही अजूनदेखील पीओपीच्या मूर्त्यांनाच आहे.

…आता शाडूची माती दिल्यास त्याचे करायचे काय?                                           

शासनाद्वारे काही दिवसांपूर्वी मूर्तीकारांना मोफत शाडू मातीचे वाटप करण्यात येणार होते. मात्र बऱ्याच मूर्त्या तयार असून अनेक मूर्त्यांचे काम अंतिम टप्प्यात असताना शाडूची माती दिल्यास त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले असताना अशा मोफत मिळणाऱ्या मातीचे आम्ही नेमके करायचे तरी काय? असा प्रश्नदेखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. मुख्य म्हणजे, महाराष्ट्राला पुरवली जाणारी शाडू माती हीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गुजरातमधूनच आणली जाते. त्यामुळे, महानगरपालिका कशाच्या आधारे आम्हाला माती पुरवणार होती?, अशी विचारणा मूर्तिकार करत आहेत.

आकर्षक चेहऱ्याच्या मूर्त्यांचा ट्रेंड                                                                     

दरवर्षी, विविध रुपातील गणेशमूर्त्या आपल्याला पहायला मिळत असतात. गणेशभक्तांच्या मागणीनुसार मूर्तिकार तशा मूर्ती घडवत देखील असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मूर्त्यांचा नवीन असा ट्रेंड काही दिसून येत नाही. परंतु, गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांनी साकारलेल्या आकर्षक चेहऱ्याच्या मुर्त्यांची रेलचेल दिसून येते आहे. या मूर्त्या शाडू आणि पीओपी अशा दोन्ही स्वरूपात बाजारात बहुतेक ठिकाणी उपलब्ध आहेत.

मुंबई पालिकेतर्फे घेण्यात आलेला पर्यावरणपूरक मूर्त्यांबाबतचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु, असा अचानक तडकाफडकी निर्णय घेणे हे कोणाच्याही हिताचे नाही. निदान, जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान जरी हा निर्णय घेण्यात आला असता तरीदेखील आम्ही याबाबत योग्य तो विचार केला असता. परंतु, अशा प्रकारच्या निर्णयामुळे मूर्तिकारांच्या उदरनिर्वाहावर नक्कीच प्रश्न निर्माण होऊ शकतो.
– चव्हाण, मूर्तिकार (कांदीवली)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. या बाबतीतही सरकार उदासीनच दिसतंय. खरं तर सरकारचं धोरण काहीही असलं तरी सहज विघटन होईल अशाच मूर्त्यांची मागणी गणेश भक्तांनी केली पाहिजे. अन्यथा विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यावर वाहात आलेले आपल्या देवाचे अस्ताव्यस्त पडलेले अवयव यापुढेही पाहावे लागतील. यासाठी पर्यावरण रक्षण आणि भक्ती अशा दोन्ही गोष्टी सध्या होतील असाच गणेशोत्सव आपण साजरा करायला हवा.

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -