Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपचे रणशिंग - नीलेश राणे

मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपचे रणशिंग – नीलेश राणे

रत्नागिरी : राज्यातील देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी पक्ष आंदोलन उभारणार आहे, अशी घोषणा पक्षाचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, मुन्ना चवंडे, सचिन करमकर, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रांतून स्पष्ट होत आहे. तरीही ठाकरे सरकार त्या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवाशी खेळत असून दाऊदच्या हातचे बाहुले झाले आहे. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा.

राणे म्हणाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणाऱ्या नवाब मलिक याचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला असून तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडविले होते. या कटाच्या अंमलबजावणीकरिता स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घोऊन मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षड्यंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे. नवाब मलिकने केलेला व्यवहार हा त्या षड्यंत्राचाच एक भाग होता, हे ईडीच्या आरोपावरून स्पष्ट होते. असे असतानाही नवाब मलिक यांचे मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या या हस्तकाला संरक्षण देत आहेत. संपूर्ण ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणाऱ्या नवाब मलिक यांची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणाऱ्या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, अशी मागणीही श्री. राणे यांनी केली. नवाब मलिक यांना वाचविण्याकरिता आणि सत्ता टिकविण्याकरिता आपण महाराष्ट्राचा अपमान करत असून देशद्रोह्याची तरफदारी करत आहोत, याची ठाकरे सरकारला जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे. आघाडी सरकारच्या या लाळघोटेपणामुळेच महाराष्ट्राची नामुष्की होत असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कणाहीन नाही, हे दाखविण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादास हातभार लावणाऱ्या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याएवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असा उपरोधिक सल्लाही श्री. राणे यांनी ठाकरे सरकारला दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -