मुंबई: कर्णधार रोहित शर्माने केलेल्या जबरदस्त ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना २०५ धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहितने तडाखेबंद खेळी साकारली. त्याने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह ९२ धावा तडकावल्या.
विराट कोहली या सामन्यात पुन्हा शून्यावर बाद झाला. त्याची शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ. ऋषभ पंतही १५ धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ बॉलमध्ये ३१ धावांची पटापट खेळी केली. तर शिवम दुबेने २२ बॉलमध्ये २८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १७ बॉलमध्ये नाबाद २७ धावांची खेळी केली.
१४व्या षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद १५५ इतकी होती. मात्र शेवटच्या ६ षटकांत केवळ ५० धावाच बनू शकल्या. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूडने चांगली गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत केवळ १४ धावा दिल्या आणि एक विकेट मिळवला. तर मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.ऑस्ट्रेलियासमोर आता विजयासाठी २०६ धावांचे आव्हान आहे.