मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरात अर्थात शिवतीर्थावरून लवकरच गोड बातमी येणार आहे. म्हणजेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे हे आई-बाबा होणार आहेत. अमित ठाकरेंना नुकतीच मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता त्यांच्या खासगी आयुष्यामधील प्रमोशनची बातमी समोर आली.
राज आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आजी-आजोबा होणार आहेत. दोघेही या बातमीमुळे फार आनंदात असून एप्रिल महिन्यात ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीतील पाहुण्याचे आमगन होणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी राहण्यासाठी आले आहेत. अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.