Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभविष्यात विकासाच्या प्रक्रियेत पाण्याची उपलब्धता मोठा घटक ठरणार

भविष्यात विकासाच्या प्रक्रियेत पाण्याची उपलब्धता मोठा घटक ठरणार

सुभाष म्हात्रे

जागतिक जलदिन शुक्रवारी २२ मार्च रोजी साजरा होत असल्याने या दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, त्यासाठीचे नियोजन, पाण्याची काटकसर, वाया जाणारे पाणी, भूगर्भातील खालावलेली पाणीपातळी, त्यासाठी पावसाळ्यात भूगर्भातील पाणी पातळी कशी वाढेल आदींबाबतचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

औद्योगिक, तांत्रिक, वैज्ञानिक, कृषी इत्यादी सर्व क्षेत्रात तिसरे जग सुद्धा विकासाच्या प्रक्रियेत गतिमान आहे. या गतिमान विकासाच्या आणि प्रगतीच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या समस्येचे स्वरूप लक्षात घेतले आणि वेळीच उपाययोजना केल्यास पुढील काळ सर्वांसाठी सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ शकेल. कारण पाणी ही मर्यादित नैसर्गिक संपत्ती आहे. जगात उपलब्ध असलेल्या पाण्याची विभागणी ही नैसर्गिकरीत्या दुर्दैवाने अत्यंत विषमतेने झाली आहेत. म्हणूनच जगातील अनेक देशात त्याची टंचाई जाणवत आहे.

भूगर्भातील भूजलाचे साठे हे दरवर्षी पडणारे पर्जन्यमान, भौगोलिक रचना व भूजलधारक खडकांची पाणी साठवणूक क्षमता, तसेच पर्जन्यमानाचे एकूण दिवस यावर मुख्यत्वे अवलंबून असतात. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पिण्याचे पाणी हे भूजलाद्वारे उपलब्ध होते. भूगर्भात असणारी भूजल संपत्ती ही दीर्घकाळ उपलब्ध होण्यासाठी भूजल उद्भवाचे संरक्षण करणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते. तथापी पावसाळ्यामधील पर्जन्यमानाच्या प्रमाणात तूट आल्यास भूजल साठवणूक कमी प्रमाणात होऊन ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत पडलेले पर्जन्यमान व भूजल पातळी यांचा बारकाईने अभ्यास केल्यास भूजलावर आधारित पिण्याच्या पाण्याचे उद्भव किती काळापर्यंत टिकू शकतात यांचा ढोबळ अंदाज बांधणे शक्य होते. तसेच कोणकोणत्या परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र व अति तीव्र दुर्भिक्षता जाणवण्याची संभाव्यता आहे याचाही ढोबळ अंदाज वर्तविणे शक्य होते. तसेच अशा संभाव्य टंचाईच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे शक्य होते व त्याप्रमाणे कृती आराखडा करणेही सुलभ होते.

पृथ्वीवरील जलचक्र आणि जलसंपत्ती समुद्रावरील पाण्याची वाफ होऊन ती ढगाच्या रूपाने आकाशात दिसते. पाण्याच्या बाष्पीभवनातून तयार झालेल्या या ढगांना हवा लागताच ढग पावसाच्या रूपात बरसतात. पडणाऱ्या पावसाचे काही पाणी भृपृष्ठाच्या विविधतेप्रमाणे जमिनीत कमी वा जास्त प्रमाणानुसार मुरुते, त्यालाच आपण भूजल म्हणतो. त्या ठिकाणी भृपृष्ठावरील पाणी जमिनीवरून वाहत शेवटी नदीनाल्याद्वारे समुद्राला मिळते. या पाण्याची पुन्हा वाफ होते. या पद्धतीने हे जलचक्र पृथ्वीच्या निर्मितीपासून अव्याहतपणे चालू आहे. पाणी हेच या सृष्टीचे, जलचराचे उगमस्थान आहे. समुद्रातूनच जीवसृष्टीची निर्मिती झाली. सृष्टी ७१ टक्के पाणी आणि २९ टक्के जमीन यांनी बनलेली आहे. पृथ्वीवर असलेल्या पाण्यापैकी ९७.२ टक्के खारेपाणी आहे. २ टक्के पाणी बर्फाच्या रूपाने उत्तर दक्षिण ध्रुवावर साठलेले आहे. उरलेले पाणी ०.६२ टक्के भूजल, ०.०९ टक्के तळी, ०.००८ टक्के सरोवरे, ०.०१ टक्के पाणी नद्यांतून पाहावयास मिळते. यावरून मानवी, व्यापारासाठी पाणी किती कमी प्रमाणात उपलब्ध आहे हे लक्षात येईल.

पाण्याची उपलब्धी आणि गरज जगात दरवर्षी सर्वसाधारणपणे ४७,००० घनकिलोमीटर इतकी जलसंपत्ती उपलब्ध होते. भारतात १,८६९ घनकिलोमीटर जलसंपत्ती प्राप्त होते. जगाच्या एकूण जलसंपत्तीपैकी भारतात ४ टक्के जलसंपत्ती आहे. दरवर्षी जगभर ३,२४० घनकिलोमीटर पाणी वापरले जाते. यापैकी ६९ टक्के पाणी शेतीला, २३ टक्के पाणी हे औद्योगिकरणासाठी, तर ८ टक्के पाणी घरगुती वापरासाठी वापरले जाते.

महाराष्ट्रातील पाऊस पाणी
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे ३ लाख ७ हजार चौरस किलोमीटर आहे. पर्जन्यमानाच्या आधारे राज्याचे चार भाग पडतात. म्हणजे भारताच्या एकूण भौगोलिक पश्चिमेला समुद्रकिनारपट्टी असलेला कोकणचा प्रदेश जेथे पर्जन्यमान सरासरी ३००० मि.मि. आहे. कोकणलगत सह्याद्रीच्या रांगांनी दुभागलेला पश्चिम महाराष्ट्र येथे सरासरी ६०० मि.मि., तर पश्चिम महाराष्ट्राला लागून मराठवाडा आहे, तेथे सरासरी ९०० मि.मि. पाऊस पडतो. राज्याच्या पूर्वेला विदर्भात सरासरी १२०० मि.मि. पाऊस होतो. या सर्वांचा हिशोब केल्यास महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी ३८० अब्ज घनमीटर पाऊस पडतो. त्यापैकी ११६००० घनमीटर पाणी नद्यांतून वाहून जाते, असे पाणी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असते.

पाणीटंचाईची मीमांसा
दिवसेंदिवस पाण्याची उपलब्धी कमी होण्याची जी मुख्य कारणे आहेत, त्यात लोकसंख्येची वाढ हे प्रमुख कारण आहे. पाण्याच्या उपलब्धीचा विचार केल्यास असे लक्षात येते की, १०० वर्षांपूर्वी इतकेच पाणी आजही जगात उपलब्ध आहे. तरीही दिवसेंदिवस पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. लोकसंख्या वाढली म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यांच्या गरजाही वाढल्या. या सर्व गरजा पाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. लोकसंख्या वाढीमुळे घरगुती वापरासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. राहणीमान उंचावत असल्यामुळे दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्वीच्या निष्कर्षाप्रमाणे ग्रामीण भागात दरडोई दरदिवशी सरासरी ४० लिटर पाणी लागत होते. आता ही गरज ७० लिटरच्याही पुढे गेली आहे. शहरामध्ये हे प्रमाण १०० लिटरपासून १५० ते २०० लिटरपर्यंत गेले आहे. घरगुती वापराप्रमाणेच शेतीच्या उत्पादन वाढीसही जास्त पाण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकसंख्या वाढल्यामुळे खाणारी तोंडेही वाढली, म्हणूनच अधिक धान्य पिकविणे भाग पडले. त्यामुळे कृषी विकासासाठी जास्त पाणी वापरले जाऊ लागले. विकसित देशातही ६९ टक्के, तर भारतात ८३ टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. विकसित देशाबरोबर विकसनशील देशातही अन्न धान्याव्यतिरिक्त जीवनाच्या इतर गरजाही वाढल्या आहेत. या गरजा भागविण्यासाठी औद्योगिक प्रक्रिया गतीमान करावी लागली. विकसित देशात २३ टक्के पाणी औद्योगिकीकरणासाठी वापरले जाते. भारतामध्येही औद्योगिकीकरणाची प्रक्रिया झपाट्याने गतीमान होत आहे. सध्या यासाठी २.६० टक्के पाणी वापरले जाऊ लागले आहे. वीज ही औद्योगिकीकरणाचा आधार आहे. संपन्न जीवन जगण्यासाठी दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत आहे. वीजनिर्मितीसाठी सध्या ३.५ टक्के पाणी वापरले जाते.

पाणीटंचाईवरचा नेमका उपाय
उपलब्ध पाण्यातूनच विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल, तर लोकसंख्येला सर्वप्रथम आळा घालण्याचे उपाय अमलात आणावे लागतील. कारण विकासाचा उपभोग लोकांनी घ्यावयाचा असतो. वाढत्या लोकसंख्येची वाढती गरज, पाणी टंचाईशिवाय दुसरे काहीही या जगाला देऊ शकत नाही. म्हणूनच लोकसंख्येला आळा घालण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण भारतामध्ये दरडोई दरदिवशी ५२५ ग्रॅम धान्य लागते. ४५० ते ५०० घनमीटर पाणी दरडोई सरासरी लागते. लोकसंख्येला आळा बसल्यास हे पाणी वाचविता येईल. शेतीला पाणी देण्याच्या पद्धतीतही बदल करावा लागेल. कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा उपयोग झालाच पाहिजे. अधिक आणि चुकीच्या पाणी वापराच्या पद्धतीमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. निष्काळजीपणे पाणी वापरल्यामुळे पाणी वाया जाते. त्याचा पुन्हा उपयोग करता आला पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -