Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखटाळ्या आणि थाळ्या, टिंगलखोरांना चपराक

टाळ्या आणि थाळ्या, टिंगलखोरांना चपराक

एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या विशाल भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील शंभर कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आणि जगभरांतून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना देशातील जनतेचे आभार मानले. शंभर वर्षांत प्रथमच आलेल्या मोठ्या महामारीवर मात करण्यासाठी जनतेने एकजूट दाखवली आणि लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला, हे सर्व आश्चर्यकारक होते. गेले वर्षभर भारताला कोरोनाच्या संकटाने ग्रासले होते. एवढ्या मोठ्या देशात लस कशी व कोठून येणार? काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या विशाल देशात गावोगावी लस कशी पुरवली जाणार? विदेशातून लस आणायची म्हटले, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोण पुरवठा करणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरणासाठी एवढा निधी कुठून आणणार? असे अनेक प्रश्न जगाला पडले होते. या प्रश्नांवर शंभर कोटी लसींचे डोस पूर्ण करून देशाने सडेतोड उत्तर दिले, असे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सांगितले, तेव्हा प्रत्येक देशवासीयाला अभिमान वाटला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या एकोणीस महिन्यांत देशाला संबोधित केलेले हे दहावे भाषण होते. त्यांनी केलेल्या वीस मिनिटांच्या भाषणात शंभर कोटी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा टप्पा कसा गाठला, हाच प्रमुख मुद्दा होता. शंभर कोटी लसीची मात्रा देणारा देश, अशी भारताची जगात प्रतिमा निर्माण झाली आहे. भाषणाची सुरुवात ‘कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य अहिता:’ अशी करून देशाने केलेल्या कर्तव्य पालनात मोठे यश प्राप्त केले, असे सांगितले. देशाच्या सामर्थ्यांचे हे प्रतिबिंब आहे, ही नव्या भारताची प्रतिमा आहे आणि जी आपली संकल्पसिद्धी आहे, त्यासाठी भारतीय जनता कशी प्रयत्नांची पराकाष्ठा करते, त्याचे हे उदाहरण आहे, असे सांगून त्यांनी जनतेचे कौतुकच केले. कोरोना महामारीने जगातील मोठ-मोठ्या प्रगत देशांना ग्रासले, लक्षावधी लोकांचे मृत्यू झाले. अशा मोठ्या संकटाला भारत देश कसा तोंड देऊ शकेल, अशी चिंता जगाला पडली होती. लसीकरणाची मोहीम भारताने युद्धपातळीवर राबवली आणि देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे, यासाठी मोदी सरकारने योजना राबवली. लसीकरणाचे नियोजन मोठ्या कौशल्याने केले गेले.

लसीकरणात भेदभाव होणार नाही, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव केला जाणार नाही, याची मोदी सरकारने काळजी घेतली. शहरी-ग्रामीण भागात लसीकरण मोहीम तेवढ्याच प्रभावीपणे राबवली जाईल, असा आराखडा आखला गेला. पंतप्रधानांच्या भाषेतच सांगायचे झाले, तर लसीकरण मोहिमेत व्हीआयपी कल्चर येणार नाही, याची दक्षता सरकारने घेतली. ज्यांना सरकारच्या माध्यमातून लस घ्यायची नाही, त्यांना खासगी इस्पितळात लस उपलब्ध करून दिली गेली, ज्यांना पैसे देऊन लस घ्यावयाची आहे, त्यांना एक पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला. पण सर्वसामान्य लोकांना देशभरात कुठेही लस मोफत मिळेल, अशी व्यवस्था सरकारने केली. लसीकरण मोहिमेत जनभागीदारी हे सर्वात मोठे योगदान ठरले. लसीकरणाविषयी जनजागृती करणे, त्याची अद्ययावत माहिती जनतेला देणे यासाठी लोकप्रतिनिधी यांनी समाज माध्यमातून जे काम केले, त्याला तोड नव्हती. लस कुठे, केव्हा व किती जणांना मिळणार तसेच कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन कोणती लस मिळणार, याचीही माहिती समाज माध्यमांवरून दिली जात होती व आजही दिली जात आहे. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाने देशात प्रवेश करून उग्र स्वरूप धारण केले, तेव्हा जनतेत मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधताना लोकांना आपल्या घरातून टाळ्या वाजवायला सांगितल्या, नंतर घराच्या गच्चीत किंवा बाल्कनीत येऊन थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. नंतर एकदा त्यांनी दीपप्रज्ज्वलन करण्याची हाक दिली. अहोरात्र राबणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य व सुरक्षा कर्मचारी यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी जनतेला आवाहन केले. पंतप्रधानांच्या अशा सर्व आवाहनांना देशातील जनतेने उदंड प्रतिसाद दिला. पंतप्रधान असे का सांगतात, असा प्रश्न कोणाही विचारला नाही; पण भाजपविरोधकांनी त्यांना राजकीय रंग देऊन टाळ्या वाजवून अणि थाळ्या बडवून कोरोना पळून जाणार आहे का, असा प्रश्न विचारला. टाळ्या, थाळ्या आणि दीपप्रज्ज्वलनाच्या आवाहनाची विरोधी पक्षांनी टिंगलटवाळी केली. टाळ्या – थाळ्या वाजविण्याच्या आवाहनावर अनेकांनी टोमणे मारले. तेव्हा पंतप्रधान गप्प बसले. त्यांनी अशा नतद्रष्ट विरोधकांना एका शब्दानेही प्रत्युत्तर दिले नाही. सारा देश कोरोनाशी लढत असताना टाळ्या व थाळ्या वाजविणाऱ्यांची टिंगलटवाळी विरोधकांना सुचते कशी, हा खरा प्रश्न होता.

या प्रश्नाला लसीकरण मोहिमेने १०० कोटींचा टप्पा ओलांडून सडेतोड उत्तर दिले आहे. याच टाळ्या व थाळ्यांतून देशातील जनतेचे एकात्मतेचे दर्शन साऱ्या जगाला घडले. देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना लस मिळेल, अशी पहिली घोषणा करून पंतप्रधानांनी देशाला फार मोठा दिलासा दिला होता. सर्वांना विनामूल्य लस मिळेल या घोषणेने लोकांना आधार दिला आणि लसीकरणाच्या खर्चाचा बोजा राज्यांवर पडणार नाही, असे जाहीर करून राज्यांनाही मोठा विश्वास दिला. विश्वविक्रमी लसीकरणाचे शिल्पकार म्हणून सारे जग पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -