Saturday, April 27, 2024
Homeसाप्ताहिककोलाजव्यसन‘मुक्त’

व्यसन‘मुक्त’

  • स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
पाण्यासाठी दोरी रहाटाला लावली आणि घागर पाण्यात सोडली. भरलेली घागर वर खेचणार इतक्यात नको तेवढी जड येऊ लागलेली पाहून ती हादरली. भुताटकीचा प्रकार असावा असं वाटलं काहीसं, पण…

रघुला पिण्याचं आणि त्यातच असलेलं गाण्याचं व्यसन त्याच्या पत्नीचं डोकं उन्हाशिवाय तापवणारं ठरलेलं. पिता-पिता अड्ड्यावर गाणी म्हणताना अनेकदा तोल जाऊन पडलेला तेव्हा त्याला घरी आणताना बायकोच्या नाकीनऊ आलेले. बायको लोकांची धुणीभांडी करून घर कसंबसं चालवत होती.

ती उन्हातान्हातून विहिरीवर जाऊन कपडे धुवून दुपारी घरी परतायची, तेव्हा रघूची सकाळ झालेली असायची. सायंकाळी रघू जेव्हा पिऊन घरी परतायचा, तेव्हा त्याच्या गप्पा रंगात यायच्या. चार मित्रांना घेऊन तो मग सूर आळवायचा. त्याच्या संगतीने गावातील काही तरुण पोरं पण प्यायला लागलेली याच्या तक्रारी रघूच्या बायकोकडे येऊ लागलेल्या.

कुणी सुचवलेलं, हे रघूचं सारखं पिणं गावातील चांगल्या तरुणांना बिघडवणारं आहे. लोकांचे संसार धुळीला मिळतील. याचं हे व्यसन सुटण्यासाठी काही उपाय असेल, तर करून पाहावा. अनेकजण दारू सोडतात. पुन्हा पीतही नाहीत. कुणीतरी तिला पत्ताही दिलेला. रघूच्या बायकोलाही वाटलेलं. खरंच यांना घेऊन जायला हवं, दारू सोडण्यासाठी. केवढा ताप आहे डोक्याला, पिऊन गाणी काय गातात, नाचतात काय, नको नको झालंय अगदी म्हणून तिने शेवटी निर्णय घेतलाच.

पण दारू सोडणं म्हणजे एखादी कायमची शपथ घेण्यासारखंच आहे. हा माणूस काय दारू सोडणार? म्हणून ती जराशी धास्तावली.
एके दिवशी रघूला म्हणाली, ‘आपण एका ठिकाणी जाणार आहोत उद्या. तुम्हाला
यावं लागेल.’
‘कुठे नेणार कुठे तू मला’ रघूने विचारलं
‘ते तिथे गेल्यावरच कळेल.’
तिचं बोलणं रघूला कळलं न कळलं, पण रघूने बघू म्हटलं आणि तो घरातून पुन्हा पैसे घेऊन पिण्यासाठी निघून गेला. त्याच्या बायकोने मनात म्हटलं, ‘आज काय ती पिऊन घ्या, उद्यापासून कायमची सुटणार आहे. ती मनोमन खूश झाली. तिच्यासोबत आणखी दोघी-तिघी आपल्या नवऱ्यांना घेऊन यायला तयार झालेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी या आपापल्या नवऱ्यांना घेऊन जाणार होत्या. पण सायंकाळी पिण्यासाठी गेलेला रघू रात्री घरी आलाच नाही. त्याची बायको वाट पाहत राहिलेली. आपला नवरा गेला तरी कुठे म्हणून ती दारावर उभी राहून त्याची वाट पाहू लागली. पण रात्र वाढत गेली तरी रघू घरी आला नाही.

एवढ्या रात्री याला कुठे शोधायला जावं? ती धास्तावली. आजूबाजूला शेजाऱ्यांना हाका मारून तिने रघू घरी आला नाही ते सांगितलं. कुणी म्हणालं, ‘जास्त झाली असेल, तर पडला असेल कुठेतरी…’

तिलाही वाटून गेलं. असंच काहीतरी असणार. पण कुठे शोधणार तरी कुठे? शेवटी तिने शेजारच्या मुलीला सोबत घेऊन त्याची नेहमीची ठिकाणं शोधून तिथे रघू आहे का ते पाहिलं. पण रघू ना अड्ड्यावर होता ना कुठेही रस्त्यात पडलेला. तिला आता धास्ती वाटली.

उद्या सकाळीच तर जायचं होतं, व्यसन सोडण्यासाठी. पण हा माणूस आताच गायब झालाय. तिने सगळीकडे शोधाशोध केली. तिचा इलाज हरला. घरी आल्यावर रघूची वाट पाहून पाहून ती रडकुंडीला आली. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रघू आला नाही. तिने पुन्हा सगळीकडे रघूला शोधला आणि सगळे प्रयत्न हरले. तिच्या सोबत जाणाऱ्या दोघी-तिघी दरवाजात येऊन आपापल्या नवऱ्यांना घेऊन उभ्या राहिल्या. शेवटी ती म्हणाली, ‘माझे सर्व प्रयत्न हरले.’ तिने डोळे पुसले. ती म्हणाली, ‘माझा नवरा जाऊन जाऊन अजून कुठे जाणार? दारू पिऊन कुठेतरी पडला असेल’ येते तोवर माझं एका घरचं काम आवरून. तुम्ही व्हा पुढे दारूमुक्ती व्यसनकेंद्राकडे. दारूमुक्तीचं नाव ऐकून तिच्या मैत्रिणींचे आलेले नवरे हादरले. त्यांच्या तोंडची दारूच पळाली आणि आपल्या सहचारिणींकडे रागाने बघत बघत त्यांनी थेट घरेच गाठली. तशी रघूच्या बायकोने कपाळावरच हात मारून घेतला. एका घरचं पाणी आणण्यासाठी तिने हंडा-कळशी घेतली आणि ती डोळ पुसतच विहिरीकडे आली.

पाण्यासाठी दोरी रहाटाला लावली आणि कळशी पाण्यात सोडली. भरलेली कळशी वर खेचणार इतक्यात ती नको तेवढी जड येऊ लागलेली पाहून ती हादरली. भुताटकीचा प्रकार असावा असं वाटलं काहीसं, पण भेदरलेल्या मनानं ती धाडस करून विहिरीत डोकावली, तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती किंचाळली. पण स्वत:ला सावरत तिने कसाबसा तोल सावरला. पुन्हा विहिरीत पाहिलं तर रघू विहिरीच्या झाडाला अडकून कसाबसा आपला जीव सावरत राहिलेला… आणि आता विहिरीत सोडलेल्या रश्शीला धरून नुकताच त्याला आधार सापडला होता.

रघूच्या बायकोने भानावर येऊन ओरडून साऱ्यांना गोळा केले. रघूला कसाबसा बाहेरही काढला. बाहेर आल्यावर रघूने हे सारे व्यसनमुक्तीपासून दूर पळण्यासाठी केले होते हे बायकोला कळलं. पण ते टाळण्यासाठी तो दारू पिऊनच गावाबाहेर पळावं म्हणून निघाला तो थेट विहिरीत येऊन पडला. झाडाच्या फांदीला अडकला म्हणून बचावला. पण सारी रात्र त्याला विहिरीत फांदीला लटकूनच काढावी लागली. एव्हाना त्याची दारू उतरली होती. बायकोचा रागाने चढलेला पारा आणि संतापलेला चेहरा बघून स्वत:ला सावरत तो म्हणाला, ‘आता व्यसनमुक्तीची गरज नाही, मी या क्षणापासूनच दारू कायमची सोडतोय.’

त्याचं बोलणं ऐकून त्याच्या समवेतच्या अनेकांनी तिथेच शपथा वाहिल्या आणि गावातील लोकांनी नकळतच मोठ्या प्रयासानंतर एक आनंदाचा क्षण अनुभवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -