Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनसकारात्मक दृष्टिकोन देणारी होलिस्टिक हीलर

सकारात्मक दृष्टिकोन देणारी होलिस्टिक हीलर

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

जग हे अटीतटीच्या स्पर्धेने व्यापलेले आहे. सुखी, समृद्ध आयुष्य जगण्याची धडपड चालू असताना आव्हान अडथळ्यासारखे आल्यावर हतबल व्हायला होणे स्वाभाविकच आहे. या हतबलतेपोटी भावनेच्या भरात चुकीची पावले उचलली जातात. मात्र योग्य मार्गदर्शन, प्रचंड सकारात्मकता या बळावर आयुष्यात येणारी हतबलता दूर करता येते. होलिस्टिक हीलर डॉ. मनीषा वैद्य-किणी गेली २५ वर्षे आव्हानं, हतबलता, नैराश्येवर मात करण्याचे मार्गदर्शन ‘होलिस्टिक हीलिंग’ या उपचार पद्धतीतून करीत आहेत. व्यक्तीला आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देत आहेत.

होलिस्टिक हीलिंगविषयी डॉ. मनीषा सांगतात, “आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाणे होते. रुग्णाला त्यांच्या औषधोपचाराने फरक पडतो. होलिस्टिक हीलिंग हीदेखील एक प्रकारची नैसर्गिक उपचारपद्धती आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक स्तरांच्या एकत्रीकरणाने होलिस्टिक हीलिंगमध्ये उपचार केले जातात. आपल्या जीवनातील सर्व स्तर एकमेकांशी जोडलेले आहेत. एक स्तर असंतुलित झाल्यावर त्याचा परिणाम इतर स्तरांवर होतो. होलिस्टिक हीलिंग ही उपचाराची एक व्यापक आणि सर्वसमावेशक पद्धत आहे. या उपचारपद्धतीच्या उपयोगाने मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधत व्यक्तीला निर्भय केले जाते.

देवाचा शोध घेण्याच्या नादात डॉ. मनीषा होलिस्टक हिलर झाल्या. “माझं सगळं बालपण मुंबईतील विलेपार्ल्यात गेलंय. आमच्या घरचं वातावरण कलेचं होतं. आई नम्रता वैद्य उत्तम गायची, तर वडील विजय वैद्य ढोलक वादनात माहीर होते. वडिलांची गणेश चित्रशाळा होती. घरीच मूर्ती बनविण्याचे काम चाले. शाडू मातीच्या रेखीव मूर्ती आम्ही बनवत असू. त्यावेळी आईसोबत मी बाबांना गणपती घडविण्यासाठी मदत करीत असे. माझं काम गणपतीचे दागिने बनविणे असे. हे दागिने बनविताना सहजच माझ्या मनात एकदा एक प्रश्न आला ‘देव म्हणजे काय?’ या प्रश्नावर आईचं उत्तर होतं ‘आपल्या आयुष्यातील वाटाड्या’ आईचे ते उत्तर माझ्या बालमनाला न समजणारं होतं. पार्ल्यातील महिला संघ शाळेतील शालेय शिक्षणामुळे माझ्यावर मराठी आणि इंग्रजी भाषेचे उत्तम संस्कार झाले. कॅथलिक परिसरात बालपण गेल्यामुळे ख्रिस्ती प्रार्थना तोंडपाठ झाल्या होत्या. घरी आई-बाबांच्या तोंडून ऐकलेली स्तोत्र कानावर पडून ती देखील लक्षात राहिली आहेत.” “स्तोत्र म्हटल्यावर काय होतं?” या प्रश्नावर आईचे उत्तर होतं, “आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जेची कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे आपल्याकडून सकारात्मक कार्य घडतात.” शाळेतल्या मैत्रिणींबरोबर चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेलाही गेले. आई-बाबांनी कधी आपला धर्म सोडून इतर धर्माच्या देवळात जायचे नाही, त्यांच्या प्रार्थना म्हणायच्या नाहीत अशी बंधनं घातली नाहीत. ते खुल्या विचारांचे होते.”

लग्नानंतरही मनीषा यांनी होलिस्टिक हीलिंग करिअर सुरू ठेवलं. मनीषा सांगतात, “लग्नापूर्वी घरोघरी जाऊन ग्रुप ट्युशन्स घ्यायचे. लग्नानंतर घरूनच ट्युशन्स घेण्यास सुरुवात केली. जसा वेळ मिळेल तसा अध्यात्माचे अत्याधुनिक शिक्षण घेणे चालूच होते. टॅरो रीडिंग नंतर न्यूमरॉलॉजी, फ्लॉवर थेरपी, ग्राफोलॉजी, यंत्रमंत्र हीलिंग, बायोसाल्ट थेरपी, क्रिस्टल थेरपी, एंजल बोर्ड रीडिंग, क्रिस्टलबॉल ग्रेझिंग, रेकी यांसारख्या विविध थेरपीज मी शिकले. वास्तू शास्त्र शिकले. आपण शिकलेले ज्ञान अचूक आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सुरुवातीला मोफत सेवा द्यायचे. जशी माझ्या भाकितांमध्ये अचूकता यायला लागली तसे मला या क्षेत्रातील जाणकारांनी ‘होलिस्टिक हीलर’ ही पदवी दिली. कालांतराने होलिस्टिक हीलर हा व्यवसाय पूर्णवेळ म्हणून निवडला.”

‘होलिस्टीक हीलर’ म्हणून काम करण्याच्या अनुभवाविषयी मनीषा सांगतात, “२०१६ मध्ये ‘मॅजिकली कायनेटिक’ कंपनीची स्थापना केली. कायनेटिक्स म्हणजे ‘गतीशास्त्र’ जे, सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. आयुष्यात येणारी संकटं, आव्हानं ही नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहेत. त्या आव्हानांचा तोडगा काढण्यासाठी अधिक सखोल अभ्यास सुरू केला. या अभ्यासामुळे वास्तुविज्ञान आणि टॅरोविज्ञानामध्ये पीएच. डी. पूर्ण करता आली. टॅरो सायन्सच्या आणि वास्तू सायन्सच्या पीएच. डी.साठी लिहिलेल्या थिसिसवर ‘एनर्जी मेडिसिन’ पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. रेकी तसेच मनी रेकीत ग्रँडमास्टर पदवी मिळालेली आहे.

‘मॅजिकली कायनेटिक’ हा डॉ. मनीषा यांचा आयएसओ सर्टिफाईड ब्रँड आहे. या ब्रॅण्डच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या सेवांविषयी त्या सांगतात, “मी जितकी चांगली होलिस्टिक हीलर आहेत. तितकाच चांगला माझा वास्तू शास्त्रातही हातखंडा आहे. “मॅजिकली कायनेटिकच्या माध्यमातून वास्तू रीडिंगची सेवा पुरवते. वस्तू सायन्समध्ये पीएच. डी. असल्यामुळे त्या दृष्टीने गरजवंताना मार्ग दाखवतो. क्रिस्टल थेरपिस्ट असल्यामुळे या उपचार पद्धतीसाठी लागणारे नैसर्गिक स्फटिकही पुरवते, जे ग्राहकांना हीलिंगसाठी उपयोगी पडतात. तसेच इतर थेरपीचे वेगवेगळे पर्यायही ‘मॅजिकली कायनेटिक’च्या माध्यमातून दिले जातात. रेकी ग्रँडमास्टर असल्यामुळे रेकीच्या माध्यमातून हीलिंग करतो.

टॅरोमध्ये निदान करण्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करून योग्य ते मार्गदर्शन दिले जाते. ‘मॅजिकली कायनेटिक’ च्या माध्यमातून होलिस्टिक हीलिंगचे प्रशिक्षणही दिले जाते. संस्थेचे विद्यार्थी भारतातच नाही; तर जगभरात सर्वत्र विखुरलेले आहेत. ऑफलाइन, ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून होलिस्टिक हीलिंगचे प्रशिक्षण दिले जाते. माझ्या मार्गदर्शानुसार दोन विद्यार्थ्यांनी टॅरो या विषयातून पीएचडी पूर्ण केली आहे. होलिस्टिक हीलिंगचे ५०० पेक्षा अधिक तंत्र आहेत. त्यातील २५० पेक्षा अधिक तंत्रांवर मी स्वतः काम करीत असून इच्छुकांना सुद्धा शिकवते.” होलिस्टिक हीलिंग या क्षेत्रात काम करण्याचा डॉ. मनीषा यांच्या आयुष्यावरही सकारात्मक परिणाम झाला आहे. त्या सांगतात, “होलिस्टिक हिलर म्हणून काम करताना उद्दिष्ट सापडले. संकटांकडे आव्हानं म्हणून पाहू लागले. माणसानुरूप त्याच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचे चढउतार वेगळे असतात. त्यांचा अभ्यास करू लागले. अतिशय संयमाने आव्हानांचा गुंता सोडवू लागले.”

टॅरो क्वीन, रेकी क्वीन, वास्तू शिरोमणी, प्रतिष्ठित आयकॉन टॅरो आणि डिव्हिनेशन, वास्तू प्रवीण, इंद्रप्रस्थ गौरव पुरस्कार, वास्तू गौरव पुरस्कार अशा १०० पेक्षा जास्त पुरस्कारांनी डॉ. मनीषा यांचा गौरव करण्यात आलेला आहे. इजिप्तमध्ये होलिस्टिक हीलिंगशी संबंधित युनिक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्सची एक कार्यशाळा घेण्यात आली होती. त्या कार्यशाळेत डॉ. मनीषा यांचा सहभाग होता. दुबईमध्ये वास्तुवाचस्पति या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. २०२३ मध्ये व्हिएतनाम मध्ये ‘इंटरनॅशनल लिजंड इन होलिस्टिक फिल्ड २०२३’ या पुरस्काराने गारविण्यात आले आहे.

होलिस्टिक हीलिंगचा प्रचार-प्रसार करताना डॉ. मनीषा वैद्य-किणी यांनी कित्येकांच्या आयुष्याला आकार दिलाय. होलिस्टिक हीलिंगच्या गेल्या २५ वर्षांतील सेवेत त्यांनी लोकांना विज्ञानाधिष्ठीत बनविले आहे. लोकांना जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. ‘डॉ. मनीषा किणी रिव्हायव्ह फाऊंडेशन’च्या संस्थापिका आहेत. संस्था मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित कार्य करते. ‘डॉ. मनीषा यांच्या कार्यमुळेच त्या आजच्या घडीला ‘लेडी बॉस’ ठरल्या आहेत.
theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -