Wednesday, July 8, 2026

Maharashtra Rain : नाशिक, पुणे, जळगाव, सांगलीला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली

Maharashtra Rain : नाशिक, पुणे, जळगाव, सांगलीला पावसाने झोडपले, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचले असून खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडली आहेत. तर घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

७ जुलै रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हा धोका टळला असला तरी नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामन्यात करावा लागत आहे. नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू असल्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, यात अनेक वाहने अडकून पडली आहेत. पावसामुळे नाशिक-त्रंबकेश्वर रस्ता काही काळ बंद झाला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

शहरात गेल्या दोन दिवसात १३० मिलिमीटर पर्यंत पाऊस झाला असून शहरातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. शहरातील अनेक ठिकाणचे पाणी गोदावरी नदीत मिसळत असल्याने गोदावरी नदीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक लहान, मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीत(Godavari) कोणी उतरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १५ हजार २४८ क्युसेक्स तसेच चणकापूर धरणातून ५ हजार ३४५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशात नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. जनावरे तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

जून(June) महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाने राज्यात दडी मारली होती. पण त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पुण्यासह राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात मागील ४८ तासापासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस होत आहे. तसंच घाट माथ्यावर देखील मुसळधार पाऊस होत असल्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये २२ हजार ८८० क्युसेक विसर्ग वाढवल्यामुळे पुण्यातील एकता नगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत २४९.५६ दलघमी पाण्याची आवक झाली असून, धरणाच्या विविध पाणलोट क्षेत्रांमध्ये १ हजार ६६४ मिलिमीटर (एकत्रित) पावसाची नोंद झाली आहे. धरणातील वाढती पाण्याची आवक लक्षात घेऊन हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी हतनूर धरणातील पाणीसाठा मुख्यतः मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रातील पावसावर अवलंबून असतो. बऱ्हाणपूर, देडतलाई, एरंडी, गोपालखेडा, चिखलदरा, लोहारा आणि अकोला या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस झाल्यानंतर तापी नदीमार्गे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते. त्यामुळे या भागातील पावसाचा धरणाच्या जलसाठ्यावर थेट परिणाम होत असतो.

आंबेगावच्या आदिवासी भागातील आहुपे,भीमाशंकर व पाटण खोऱ्यात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक छोटी-मोठी पूल, रस्ते वाहून गेल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुशिरे ते भोईरवाडी हा रस्ता घाटातील दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता. घोडेगाव पोलिसांनी सकाळी हा रस्ता राडाराडा काढून सुरू केला. घोडेगाव भीमाशंकर रस्ता व घोडेगाव जुन्नर रस्ता बंद करण्यात आलेला आहे. घोड नदी व बुब्रा नदीला मोठा पूर आल्यामुळे या दोन्ही नद्या आदिवासी भागात दुथडी भरून वाहत आहेत. सर्व ओढे, नाले व डोंगर दरावरून येणाऱ्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचा रस्ता बंद झाल्यामुळे संपर्क तुटला आहे. डिंभा, शिनोली, शिंदेवाडी, गोनवडी, घोडेगाव, नारोडी, पिंपळगाव घोडे, चिंचोडी, चिंचोली ,कोलदरे येथील नदीच्या काठावरील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. मागील २४ तासात डिंभा धरण साठ्यात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धरण साठा २३ टक्क्यावरून सकाळी सहा वाजता ३७ टक्क्यांवर ( ५.६५ TMC) गेला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेली भात रोपे व बंदिस्त बांध फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेटवडी येथील सतारकावस्ती शाळेकडे जाणारा पूल खचला असून पुलालगतचे डांबरीकरणही उखडले आहे. त्यामुळे शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता बंद झाला असून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. पूल खचल्यामुळे सतारकावस्ती, हिंगेवस्ती, बोरदरावस्ती, नेमनदरावस्ती, वाबळदरा वस्ती, टिजगे वस्ती, पवार वस्ती, भालेकरवस्ती, बंगलावस्ती, हिवरठिका, खालची ठाकरवाडी आणि नवीन ठाकरवाडी या परिसरातील सुमारे दोन हजार नागरिकांचा संपर्क तुटला आहे. वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. सतारकावस्ती येथील शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी दररोज १० शालेय बस व तीन लहान वाहने ये-जा करतात. मात्र शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बंगलावस्ती येथील पूल खचल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा बंद झाली असून त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सांगली जिल्ह्यात रात्रीपासून कमी झालेल्या पावसाचा जोर बुधवारी दुपारनंतर पुन्हा वाढला आहे. वारणा नदीची पाणी पातळी सततच्या पावसामुळे वाढत असल्याने सतर्क प्रशासनाकडून शिराळा येथे गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी व कार्यकर्त्यांना राज्य प्रतिसाद दलाच्या सैनिकांकडून बचाव कार्याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. पश्चिम भागात पडलेल्या संततधार पावसाने चांदोली धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्याहून अधिक झाला असून वारणा नदीचे पाणी अद्याप पात्राबाहेर आहे. गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यात सरासरी केवळ ७.३ मिलीमीटर पाऊस झाला. काल सायंकाळी एक सर आल्यानंतर पावसाने पूर्ण उघडीप दिली असून बुधवारी चार दिवसानंतर सुर्यदर्शन झाले.ढगाळ हवामान कायम असल्याने उन्हाची तीव्रताही अधिक जाणवत होती. सलग चार दिवस कमी अधिक पडत असल्याने निर्माण झालेला हवेतील गारवाही तीव्र उष्म्यामुळे गायब झाला आहे. दुपारनंतर जोरदार वारे सुरू झाल्याने पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी सांगली, मिरज शहरात जोरदार पावसाच्या सरी आल्या. शाळा सुटण्याच्या वेळी संततधार पावसामुळे शाळकरी मुलांची त्रेधा उडाली. वारणेच्या खोऱ्यात पावसाचा जोर असल्याने ओढे नाले दुथडी भरून वाहत असून वाकुर्डे येथील तलाव शंभर टक्के भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. वारणा नदी अद्याप पात्राबाहेर असून मळीतील शेकडो एकर क्षेत्रावरील उस पिकात पाणी शिरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >