Monday, August 17, 2026

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण व्हावा, हे आपले स्वप्न असून त्यासाठी आधुनिक सहापदरी महामार्ग विकसित केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या नवीन महामार्गामुळे पुणे, संभाजीनगर आणि पुढे नागपूरपर्यंतचा प्रवास इतका जलद होईल की नागरिकांना विमानाने प्रवास करण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. याशिवाय मुंबई ते बंगळुरू हा प्रवास केवळ पाच तासांत शक्य करणारा रस्ता उभारला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ६० हजार कोटींचा निधी

पुणे शहर आणि लगतच्या परिसरात वाढलेली वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही मोठी चिंता असल्याचे सांगत गडकरी यांनी यावर तातडीने उपाययोजना जाहीर केल्या. येत्या दोन वर्षांत पुणे परिसरासाठी तब्बल ६० हजार कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यात ३१,६०० कोटी रुपयांच्या शिरूर ते पुणे प्रकल्पाचा मुख्य समावेश आहे.

प्रमुख प्रकल्प आणि निधीचा सविस्तर तक्ता 

हडपसर-यावत मार्ग: ५,२६५ कोटी रुपये

तळेगाव-चाकण-शिक्रापूर (५३ किमी): ४,००० कोटी रुपये

शिरूर ते संभाजीनगर (१९२ किमी): १५,००० कोटी रुपये

खेड ते नाशिक फाटा (३० किमी): ८,००० कोटी रुपये

रावेत ते नऱ्हे: ६,००० कोटी रुपये

पुणे ते सोलापूर मार्ग: ८,००० कोटी रुपये

अटल सेतू ते बंगळुरू कनेक्टिव्हिटीची नवी योजना

राज्यातील महामार्गांच्या विस्ताराविषयी माहिती देताना गडकरी म्हणाले की, अटल सेतू ते पागोटे चौक आणि तिथून पुढे पुण्याला जोडणारा नवीन मार्ग तयार केला जात आहे. हाच रस्ता पुढे बंगळुरूपर्यंत जोडला जाणार असून, या महामार्गामुळे मुंबईहून बंगळुरूला अवघ्या पाच तासांत पोहोचणे शक्य होईल. यासोबतच शिळफाटा ते पनवेल आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या सुधारणेसाठी ६० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

रस्त्यांच्या देखभालीसाठी AI चा वापर आणि टोलवर स्पष्ट भाष्य

महामार्गांच्या बांधकामात आणि देखभालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. सॅटेलाईटशी जोडलेली वाहने रस्त्यांवरील खड्डे आणि त्रुटी त्वरित शोधून काढतील. टोलच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, "पूर्वी मुंबई ते पुणे प्रवासासाठी ६ ते ७ तास लागायचे, जे आता अडीच तासांवर आले आहेत. जर नागरिकांना जागतिक दर्जाच्या रस्ते सुविधा हव्या असतील, तर त्यासाठी टोल द्यावाच लागेल."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >